You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बुरसटलेल्या परंपरेला छेद : भारतीय स्त्रिया आता कुटुंबीयांसोबत जेवतात
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी
एकत्र जेवणं हा कुटुंबाची वीण घट्ट करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. पण स्त्रियांनी सगळ्यांत शेवटी जेवायचं हा प्रकार आपल्याकडे अजूनही आहे. ही पद्धत आता हळूहळू बदलते आहे.
या विचित्र परंपरेमुळे लाखो भारतीय घरांतील स्त्रिया कुपोषित आहेत; पण आता ही परंपरा मोडीत काढण्यासाठी जनजागृती केली जात आहे. त्याचे चांगले परिणाम गावागावांतून दिसू लागले आहेत.
खरं तर ही पद्धत कधी आणि कशी सुरू झाली कोणालाच कल्पना नाही, पण इतर पुरुषसत्ताक पद्धतींसारखी ही पद्धतसुद्धा लोकांच्या मनात खोलवर रुजली आहे.
मी लहान असतांना माझी आजी, आई, काकू आणि माझ्या वहिनी स्वयंपाक करत. सगळ्यांचं जेवण झाल्यावरच त्या जेवत असत.
खरंतर म्हणजे स्वयंपाक झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवण्याचीही एक पद्धत आपल्याकडे आहे. त्यामुळे पुरुषांच्या आधी हा मान देवाचा असतो. मात्र स्वयंपाक करणाऱ्यांना मान सोडा, पण जेवायची संधीसुद्धा सगळ्यात शेवटी मिळते.
माझ्या लहानपणी आमच्या घरी गाय होती. माझे आजोबा जेवायला बसायचे, तेव्हा पानात वाढलेल्या प्रत्येक पदार्थांतला एकेक घास वेगळा काढून एका पोळीत ठेवायचे.
ही पोळी गाईला घास म्हणून दिली जायची. गाईला ती पोळी खाऊ घातल्यावरच ते जेवत.
या स्त्रियांनी शेवटी जेवायच्या पद्धतींमुळे अनेकदा घरात वाद व्हायचे. कारण पुरुषांना उशीर झाला, तर घरातल्या स्त्रियांनासुद्धा ताटकळत बसावं लागायचं. त्यांना कितीही भूक लागली तरी त्यांना वाट बघावीच लागायची.
ही परिस्थिती फक्त आमच्या घरी नव्हती, तर शेजारपाजारच्या घरीसुद्धा हीच पद्धत होती. एवढंच काय, भारतातल्या बहुतांश भागात हीच पद्धत अजूनही आहे.
काही कुटुंबांत तर आणखी विचित्र पद्धत आहे. स्त्रियांनी नवऱ्याच्या उष्ट्या ताटातलं खाण्याची ही पद्धत!
जुनी परंपरा
या परंपरा कधी आणि का सुरू झाल्या याचा शोध घ्यायचा प्रयत्न सुरू केला, तर उत्तर येतं - असाच नियम आहे. अनेक शतकांपासून हीच परंपरा आहे.
आजच्या शहरांतल्या सुशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या स्त्रिया त्यांना हवं तेव्हा, हवं ते खाऊ शकतात. पण ग्रामीण भागात स्त्रियांनी शेवटी जेवण्याची पद्धत अजूनही सुरूच आहे.
आमच्या घरी पूर्वी ही पद्धत होतीच, पण या पद्धतीचा फारसा दुष्पपरिणाम होत नव्हता. कारण आमच्या घरात पुरेसं अन्न असायचं. पण जे गरीब आहेत, त्या घरातील स्त्रिया आणि कधी मुलंही भुकेली राहतात.
राजस्थान न्युट्रिशन प्रोजेक्टच्या वंदना मिश्रा सांगतात, "या पद्धतीमुळे पुरुषांच्या प्राधान्य देण्याच्या नादात स्त्रिया उपाशी राहतात". न्युट्रिशन प्रोजेक्ट फ्रीडम फ्रॉम हंगर इंडिया ट्रस्ट आणि ग्रामीण फाऊंडेशन यांच्यातर्फे चालवला जातो.
वंदना मिश्रा सांगतात, "मार्च 2015 मध्ये राजस्थानातल्या बांसवाडा आणि सिरोही या जिल्ह्यांतील 403 गरीब आदिवासी महिलांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात असं दिसलं की, पोटभर अन्न मिळणारे लोक आणि उपाशी लोक एकाच घरात आहेत."
या प्रकल्पाचे बांसवाडा येथील अधिकारी रोहित समरिया 'बीबीसी'शी बोलतांना म्हणाले, "पुरुषांचं असं म्हणणं असतं की, आम्ही कामाला जातो आणि मुलं शाळेत जातात. त्यामुळे आम्ही अगोदर जेवणं आवश्यक आहे."
याबाबत जनजागृती कशी केली तेही समरिया सांगतात, "आम्हाला अगोदर जेवणं आवश्यक आहे असं म्हणणाऱ्या पुरुषांना आम्ही पुरुषांचं आणि स्त्रियांचं ताट वाढून दाखवलं की, स्त्रिया कसं जे काही उरलंसुरलं आहे तेच खातात."
...आणि कुटुंब एकत्र जेवू लागलं
ही पद्धत मोडून काढण्यासाठी राजस्थान न्युट्रिशन प्रोजेक्टनं एक अतिशय सोपा उपाय केला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना एकत्र जेवण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
दोन वर्ष सुरू असलेला प्रकल्प नुकताच संपला आणि त्याचा ग्रामीण भागावर काय परिणाम झाला हे पाहण्यासाठी मी मागच्या महिन्यात आदिवासी बहुल बांसवाडा जिल्ह्यातील अंबापारा इथे गेले होते.
मंशू दामोरच्या घरी जेव्हा मी पोहोचले, तेव्हा तो एक स्थानिक पालेभाजी निवडत बसला होता. त्यानं ती नंतर चिरूनही ठेवली. त्याची बायको आणि सून स्वयंपाकघरात जेवणाची इतर तयारी करत होत्या.
त्यांच्याकडे जेवणाला त्या दिवशी हीच भाजी, आमटी आणि रोटी होती.
परिस्थिती बदलते आहे...
अंबापारा हे भारतातल्या सर्वात जास्त मागासलेल्या खेड्यांपैकी एक आहे. इथे 89 टक्के लोक अजूनही उघड्यावर शौचास बसतात. बालविवाह तर नेहमीचेच. शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि स्त्रिया आजही पुरूषांसमोर येतांना चेहऱ्यावर पदर घेऊन येतात.
अशा परिस्थितीत जेव्हा राजस्थान न्युट्रिशन प्रोजेक्टच्या प्रतिनिधींनी एकत्र जेवण्याची कल्पना मांडली, तेव्हा ती अर्थातच क्रांतिकारी होती.
दामोर मला सांगत होते की, त्यांच्या लग्नाला 35 वर्ष झाली तरी ते तोपर्यंत एकदाही पत्नी बरजूसोबत एकत्र जेवायला बसलेले नव्हते. तेव्हा आता त्यांची सून त्यांच्या बाजूला बसून जेवणार ही कल्पनाच त्यांना करवत नव्हती.
ते सांगतात, "लोक म्हणायचे की, एखादी बाई तिच्या सासऱ्यांबरोबर कशी जेवू शकते? हे आमच्या परंपरेला धरून नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला मी पण याला विरोधच केला. मला हे सगळं विचित्र वाटत होतं."
रोहित समरिया सांगतात की, आम्ही गावातल्या या पुरुषांना घरातल्या स्त्रियांसोबत एकत्र जेवायला सांगून खरं तर त्यांच्या वागणुकीत बदल घडवू इच्छितो.
"आपल्या पुरूषसत्ताक पद्धतीत पुरुषांनी स्त्रियांची काळजी घेणं ही पद्धतच नाही. तेव्हा हा भेद मिटवण्यासाठी जागृती करणं अत्यावश्यक आहे", ते म्हणतात.
स्त्रियांनाही बदल स्वीकारणं कठीण
पुरुषच नाही तर स्त्रियांनासुद्धा हा बदल स्वीकारायला जड जात आहे. पण आता ग्रामस्थांनी आग्रह धरल्यामुळे त्यासुद्धा प्रयत्न करत आहेत.
आता त्या स्त्रियांच्या आयुष्यात खूपच फरक पडला आहे.
दामोर यांची सून सांगत होती, "मी स्वयंपाक करायचे. मी जेवायला बसेपर्यंत अगदी थोडंसं अन्न शिल्लक असायचं. घरातले पुरुष सगळी भाजी संपवून टाकायचे. मग मी फक्त मीठाबरोबर रोटी खायचे. आता मात्र सगळ्यांना समप्रमाणात जेवण मिळतं."
त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रमिला दामोर म्हणाल्या की, आम्ही दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच एकत्र जेवलो.
"मी जेव्हा याविषयी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी घरी जाऊन स्वयंपाक केला आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं की, आजपासून आपण एकत्र जेवणार. पहिल्यांदाच एकत्र जेवून खूप छान वाटलं", रमिला दामोर सांगत होत्या.
सकारात्मक बदलांच्या दिशेने
त्या गावातल्या इतर स्त्रियांशी मी बोलले, तेव्हा त्यांच्याकडेसुद्धा ही पद्धत सुरू झाली होती.
या प्रकल्पाची दोन वर्षं पूर्ण झाल्यावर एक सर्वेक्षण केलं, त्याचे निकाल अतिशय प्रेरणादायक आहेत. महिलांना पोटभर अन्न मिळण्याचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे. पर्यायाने मुलंसुद्धा आता भरपेट जेवतात.
हा बदल फक्त या प्रकल्पापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामुळे इतर सकारात्मक बदलसुद्धा झाले आहे.
दामोर म्हणतात की, आता त्यांची सून आता पूर्ण चेहरा झाकत नाही. "ती आता मला बा आणि माझ्या बायकोला आई म्हणून हाक मारते. पूर्वी ती आम्हाला हाहू (सासरेबुवा) आणि हाहरोजी (सासूबाई) म्हणायची. "
कुटुंबाला बांधून ठेवण्यात एकत्र जेवण करण्याचा खूप मोठा वाटा आहे ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)