पाकिस्तानात महिन्याला 1 लाख रुपये कमावणाऱ्यांना केवळ 100 रुपये टॅक्स

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तनवीर मलिक आणि मुहम्मद सुहैब
- Role, बीबीसी उर्दू
पाकिस्तानमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पाकिस्तानच्या केंद्र सरकारने हा अर्थसंकल्प सादर केला आहे. पण हा अर्थसंकल्प सर्वाधिक चर्चेत आलाय तो नोकरदार वर्गाच्या टॅक्स कपातीमुळे.
अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, आता 1 लाख रुपये प्रति महिना म्हणजेच 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना आयकर भरण्यापासून सूट देण्यात येणार आहे.
या वित्त विधेयकानुसार 6 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आयकरातून पूर्णपणे सूट आहे. तर 12 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना प्रति वर्ष 100 रुपये नाममात्र टॅक्स भरावा लागेल.
इथं विशेष म्हणजे, अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात टॅक्स स्लॅबबद्दल कोणताही तपशील दिलेला नाही. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या वित्त विधेयकानुसार आयकर स्लॅबची संख्या 12 वरून 7 वर करण्यात आली आहे.
कोणाला किती आयकर भरावा लागणार?
पहिल्या स्लॅबमध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांचा वार्षिक पगार 6 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांच्यावर कोणताही आयकर लागू नाही.
दुसरा स्लॅब त्यांच्यासाठी आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त पण 12 लाखांपर्यंत मर्यादित आहे. अशा लोकांना वार्षिक टॅक्स म्हणून केवळ 100 रुपये भरावे लागतील. त्यांना टॅक्सच्या कक्षेत आणण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.
ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12 लाख ते 24 लाख रुपयांपर्यंत आहे असे लोक तिसऱ्या स्लॅबमध्ये येतील. 12 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना 7 टक्के दराने टॅक्स भरावा लागेल.
24 लाख ते 36 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारे लोक चौथा स्लॅब मध्ये असतील. त्यांना 84 हजार फिक्स टॅक्स आणि 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 12.5 टक्के दराने टॅक्स भरावा लागेल.
पाचवा स्लॅबमध्ये वार्षिक उत्पन्न 36 ते 60 लाखांदरम्यान असणारे लोक असतील. या लोकांना 2 लाख 34 हजार फिक्स टॅक्स भरावा लागेल. तर 36 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 17.5 टक्के दराने टॅक्स भरावा लागेल.
मागच्या वित्त विधेयकात 60 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांसाठी हाच स्लॅब ठेवण्यात आला होता. मात्र या वित्त विधेयकात तो बदलण्यात आला आहे.
सहावा स्लॅब अशा लोकांसाठी आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 60 लाख ते एक कोटी 20 लाख आहे. या लोकांना 6 लाख 54 हजार रुपये फिक्स टॅक्स आणि 60 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 22.5 टक्के टॅक्स भरावा लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
सातवा आणि शेवटचा स्लॅब वार्षिक उत्पन्न 1 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त असलेल्या लोकांसाठी आहे. या स्लॅबमध्ये येणाऱ्यांना 20 लाख 4 हजार फिक्स टॅक्स आणि 1 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 32.5 टक्के टॅक्स भरावा लागेल.
आता या स्लॅबचा सर्वसामान्यांच्या पगारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो ते पाहू.
पाकिस्तानी लोकांच्या पगारातून नेमका किती टॅक्स कापला जाणार?
जर एखाद्या व्यक्तीचं मासिक उत्पन्न पन्नास हजार रुपये असेल तर त्याला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र, हे उत्पन्न दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत असेल तर वर्षभरात फक्त 100 रुपये आयकर भरावा लागेल.
यापूर्वी दरमहा 1.5 लाख रुपये कमावणाऱ्यांना 7500 रुपये मासिक टॅक्स भरावा लागत होता. मात्र, आता ही रक्कम दरमहा 3500 रुपये करण्यात आली आहे.
जे लोक दरमहा 2 लाख रुपये कमावतात त्यांना पहिल्या महिन्यात 15,000 रुपये टॅक्स भरावा लागत होता. आता ही रक्कम कमी होऊन दरमहा 7,000 रुपयांवर आली आहे.
असे लोक ज्यांचं मासिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये आहे, त्यांना पूर्वी 23,541 रुपये टॅक्स भरावा लागत होता. पण आता त्यांना दरमहा 13,250 रुपये आयकर भरावा लागेल.
दरमहा 3 लाख रुपये कमावणारे लोक पूर्वी 32,500 रुपये प्रतिमहिना आयकर भरत होते. आता ही रक्कम 13 हजार रुपयांनी कमी होऊन त्यांना दरमहा 19,500 रुपये टॅक्स भरावा लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
यापूर्वी 3.5 लाख रुपये महिना कमावणाऱ्यांना 42,500 रुपये टॅक्स भरावा लागत होता. तो टॅक्स आता 28,250 रुपयांवर येईल.
पूर्वी दरमहा 4 लाख रुपये कमावणारे लोक दरमहा 52,500 रुपये टॅक्स भरत होते. आता ही रक्कम 37,000 रुपयांवर येईल.
कमी उत्पन्न असलेल्या लोकांना दिलासा
टॅक्स स्लॅबमध्ये जे बदल करण्यात आलेत त्याबाबत बोलताना, टॅक्स एक्स्पर्ट डॉ. इकराम-उल-हक बीबीसीला सांगतात की, आयकर स्लॅबमधील बदलामुळे कमी उत्पन्न असलेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे.
ते असं ही म्हणाले की "उच्च-उत्पन्न गटातील टॅक्स तर्कसंगत करण्यासाठी, स्लॅबमध्ये कपात करणं ही खरं तर आयएमएफच्या अटींपैकी एक अट होती."

फोटो स्रोत, AFP
ते सांगतात की, सध्या असलेल्या महागाईच्या जमान्यात कमी पगार असणाऱ्यांसाठी हा एकप्रकारचा दिलासा आहे. डॉ. इकराम सांगतात त्याप्रमाणे, "देशाचा टॅक्सबेस वाढविण्याच्या दिशेने हे पाऊल आहे. कारण आता टॅक्स स्लॅबच्या वरच्या टप्प्यात वाढ झाली आहे."
पर्सनल टॅक्स काय असतो?
आयएमएफने पर्सनल टॅक्समध्ये सुधारणा करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. पर्सनल टॅक्सची माहिती देताना, टॅक्स एक्स्पर्ट डॉ. इकराम-उल-हक सांगतात की, पर्सनल टॅक्स म्हणजे पगारदार वर्गावर आयकराचा दर वाढवणे.
डॉ इकराम-उल-हक पुढे सांगतात की, "पर्सनल टॅक्स मध्ये सुधारणा म्हणजे, आयएमएफला जास्त पगार असलेल्या लोकांवर जास्तीचा टॅक्स लावायचा आहे."
इथं लक्षात घेतलं पाहिजे की, आयएमएफने नोकरदार वर्गाकडून टॅक्स वसूल करण्याची मागणी नवीन नाहीये. याआधीही ही मागणी करण्यात आली होती, मात्र इम्रान खान सरकारने ही मागणी मान्य केली नव्हती.
नोकरदार वर्गाकडून 130 ते 150 अब्ज रुपये जमा करावेत असं आयएमएफकडून सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सरकारने सेल्स टॅक्समध्ये दिली जाणारी सूट बंद करण्याचं मान्य करून नोकरदार वर्गाची मागणी फेटाळण्यात आली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








