पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' कारणामुळे नेपाळ विमानतळावर उतरले नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी
    • Author, राघवेंद्र राव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (16 मे) बुद्ध जयंतीनिमित्त नेपाळमधील गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान लुम्बिनी येथे गेले होते. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून हेलिकॉप्टरमधून प्रवास करत ते लुम्बिनीच्या एका हॅलिपॅडवर उतरले.

या दौऱ्यात त्यांनी मायादेवी मंदिरात पूजा केली आणि बौद्ध संस्कृतीच्या एका केंद्राच्या शिलान्यास कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लुम्बिनी पोहचण्याच्या काही तास आधीच नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी जवळपास 20 किमी अंतरावर भैरहवा येथे नेपाळच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाचं नाव गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ असं आहे.

या उद्घाटन कार्यक्रमात नरेंद्र मोदी सहभागी झाले नसल्याने आणि या विमानतळावर ते उतरले नसल्याने चर्चांना उधाण आलं.

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये राहणारे राजकीय विश्लेषक सी. के. लाल यांनी बीबीसीला सांगितलं, "शेजारी देशाचे पंतप्रधान स्वत: येत आहेत, ही प्रतिष्ठेची बाब आहे. ते उद्घाटन होत असलेल्या विमानतळावर उतरले नाही. उद्घाटनादिवशी या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताचे पंतप्रधान आले असते तर नेपाळसाठी ही अभिमानाची गोष्ट होती."

चीनचे कनेक्शन

सुमारे 7 कोटी डॉलर खर्च करून भैरहवा येथे बनवण्यात आलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला. हे विमानतळ भारत-नेपाळ सीमेपासून अवघ्या 5 किमी अंतरावर आहे. लुम्बिनी येथे आंतरराष्ट्रीय प्रवेशाच्यादृष्टीने हे विमानतळ बांधण्यात आलं आहे.

भैरहवा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ
फोटो कॅप्शन, भैरहवा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ

या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांसठी नेपाळ सरकारने 42 देशांशी करार केला आहे. नेपाळसाठी ही एक महत्त्वाची घटना आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या विमानतळावर उतरले नाहीत किंवा त्यांची उपस्थिती तिथे नव्हती याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम एका चिनी कंपनीने केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

भैरहवा येथील या विमानतळावर चीनची छाप जागोजागी दिसते. 15 मे रोजी बीबीसीने याठिकणी आढावा घेतला तेव्हा आढळलं की काही वाहनांवर चिनी कंपनीचे नाव चिनी आणि इंग्रजी भाषेत लिहिलं आहे.

नेपाळ नागरिक उड्डाण प्राधिकरणाचे अधिकार सांगतात की, "भैरहवा येथील देशांतर्गत विमानतळाच्या बांधकामासाठी पाच दशकांपूर्वी भारताने सहाय्य केलं होतं. म्हणूनच असाही एक अंदाज बांधला जातोय की नेपाळने आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवताना चिनी कंपनीला प्राधान्य दिलं."

नेपाळच्या स्थानिक माध्यमांकडूनही नरेंद्र मोदी यांनी भैरहवा विमानतळावर न जाण्याचं कारण चिनी कंपनीची भागीदारी असल्याचं सांगण्यात येत होतं.

विमानतळावरील काही वाहनांवर चिनी कंपन्यांची नावं आहेत.
फोटो कॅप्शन, विमानतळावरील काही वाहनांवर चिनी कंपन्यांची नावं आहेत.

काही दिवसांपूर्वीच नेपाळच्या 'काठमांडू पोस्ट' या वृत्तपत्राने लिहिलं, नागरिक उड्डाण प्राधिकरणाच्या माजी प्रमुखांनी या घटनाक्रमाला नेपाळचे 'राजकीय अपयश' असल्याचं म्हटलं आहे.

सुरक्षेचं कारण

नरेंद्र मोदी नेपाळ जाण्यापूर्वी भारतीय माध्यमांनी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांना प्रश्न विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुशीनगर येथून हेलिकॉप्टरने लुम्बिनी का जात आहेत जेव्हा की नेपाळमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी पोहचणं अपेक्षित होतं? यावर ते म्हणाले, "पंतप्रधानांचे दौरे आणि त्यासंबंधी लॉजिस्टिक व्यवस्थेच्या प्रश्नावर मी किंवा कोणीही बोलणं योग्य नाही. कारण यात सुरक्षेसह अनेक बाबींचा समावेश असतो."

नेपाळ अधिकाऱ्यांची सारवासारव

बीबीसीने नेपाळ सरकारच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ते या घटनांकडे कसं पाहतात. डीसीएल कर्ण नेपाळ उड्डाण प्राधिकरणाचे प्रवक्ते आहेत. ते म्हणाले, "चिनी कंपनीबद्दल बोलायचं झाल्यास अनेकांनी यात काम केलं आहे. अमेरिकन कंपनी, थायलंडची कंपनी, सिव्हिल वर्क चिनी कंपनीने केलं आणि टर्मिनल इमारतही त्यांनी बांधली. यात चिनी कंपनीची कुठेही एका रुपयाचीही गुंतवणूक नाही. या प्रकल्पासाठी आम्ही एडीबीकडून निधी घेतला आहे आणि आमचा अंतर्गत स्रोत वापरला."

नेपाळ नागरिक उड्डाण प्राधिकरणाचे प्रवक्ते डीसीएल कर्ण
फोटो कॅप्शन, नेपाळ नागरिक उड्डाण प्राधिकरणाचे प्रवक्ते डीसीएल कर्ण

ते म्हणाले, "या विमानतळाला चीनशी जोडण्याचा संबंध येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाशी जोडणंही योग्य नाही. दोन्ही कार्यक्रम स्वतंत्र होते."

एअरस्पेसचा मुद्दा

भैरहवा येथील या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नेपाळने अनेकदा भारताचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी मागितली आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारताने अद्याप परवानगी दिलेली नाही.

जाणकारांचं म्हणणं आहे की, हा मुद्दा राजकीय परिस्थिती निर्माण करू शकतो.

राजकीय विश्लेषक सीके लाल
फोटो कॅप्शन, राजकीय विश्लेषक सीके लाल

राजकीय विश्लेषक सीके लाल म्हणाले, "असंही होऊ शकतं की नरेंद्र मोदी यांना आपल्या सल्लागारांच्या विरोधात भूमिका घ्यायची नसावी. सल्लागारांनी कदाचित पंतप्रधानांना या विमानतळावर न जाण्याचा सल्ला दिलेला असू शकतो. "

ते पुढे सांगतात, "भारताने या विमानतळासाठी आपली एअरस्पेस वापरण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी स्वत: या एअरस्पेसचा वापर केला असता तर भारताने परवानगी दिली असा तर्क काढण्यात आला असता आणि या मुद्यावर दोन्ही देशांमध्ये नंतर वाद निर्माण झाला असता."

गेल्या काही वर्षांत भारत आणि चीन दोन्ही राष्ट्रांनी नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसते. त्यामुळे अशा परिस्थितीत भौरहवा विमानतळाशी संबंधित या घटनांचा भारत आणि नेपाळच्या संबंधांवर काय परिणाम होतो हे पहावं लागेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)