आपली उंची का वाढते याचं कोडं उलगडणार

उंची, विज्ञान, शास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उंची
    • Author, फिलिपा रॉक्सबी
    • Role, आरोग्य पत्रकार

माणसांची उंची दिवसेंदिवस वाढत का आहे? आणि आधीच्या तुलनेत तारुण्यावस्थेत लवकर का येत आहेत? याचं कोडं मानवी मेंदूच्या सेन्सरद्वारे सोडवता येऊ शकतं, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

पोषक आहार आणि आरोग्यातील सुधारणांमुळं 20 व्या शतकामध्ये युकेमधील नागरिकांची सरासरी उंची 3.9 इंच (10 सेंटिमीटर) ने वाढली आहे. तर इतर देशांमध्ये ही वाढ 7 ते 8 इंच एवढी आहे.

मात्र, हे नेमकं का आणि कशामुळं घडतं? हे समोर आलेलं नाही.

याबाबतचा अभ्यास केल्यास स्नायूंचा आकार वाढवण्यासाठी आणि वाढीसाठी लागणाऱ्या विलंबावर उपचारासाठी औषधांची माहिती मिळू शकते असं युकेमधील शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

चांगल्या प्रकारचा पोषक आणि पुरेसा आहार यामुळं मानवाची उंची उत्तमरित्या वाढू शकते, तसंच ते लवकर परिपक्वही होतात याबाबत शास्त्रज्ञांना पूर्वीपासूनच माहिती आहे.

उदाहरण द्यायचं झाल्यास, दक्षिण कोरियामध्ये गरीब ते विकसित देश असा बदल घडत गेल्यामुळं याठिकाणच्या नागरिकांच्या सरासरी उंचीत चांगलीच वाढ झाली आहे. मात्र, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील लोकांच्या सरासरी उंचीमध्ये 100 वर्षांनंतरही फारशी वाढ झालेली नाही.

'अधिक मुलं जन्माला घाला'

आपण खाल्लेलं अन्न मेंदूच्या हायपोथालमस या भागापर्यंत पोहोचतं आणि ते शरीराच्या पोषक आरोग्याबाबत संकेत किंवा माहिती देतं आणि त्यामुळं शारीरिक वाढ होते.

हा नवा शोध 'नेचर' या पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजच्या संशोधकांच्या नेतृत्वात लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन आणि व्हँडरबिल्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. त्यानुसार मेंदूंच्या रिसेप्टर्समुळं ही प्रक्रिया होत असल्याचं समोर आलं.

उंची, विज्ञान, शास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेंदू

याला MC3R असं म्हणतात. अन्न आणि लैंगिक विकास आणि शारीरिक वाढ यातील अत्यंत महत्त्वाचा हा दुवा आहे.

"आपलं सर्वकाही उत्तम चाललं आहे, आपल्याकडे खूप अन्न आहे त्यामुळं लवकर शरीराची वाढ होऊ द्या, लवकर तारुण्यात या आणि भरपूर मुलं जन्माला घाला, असं ते शरीराला सांगत असतात," असं या शोधाचे अभ्यासक आणि कॅम्ब्रिजमधील प्राध्यापक सर स्टिफन ओराहिली यांनी सांगितलं.

"ही केवळ जादू नाही. तर हे सर्व कसं घडतं हे दर्शवणारी संपूर्ण प्रक्रियेची आकृती (मेंदूतील वायरिंग किंवा जाळं) आमच्याकडे आहे."

मेंदूचे रिसेप्टर्स योग्य पद्धतीनं काम करत नसतील तर, लोकांची उंची तुलनेने कमी राहते हे संशोधकांना अभ्यासात आढळून आलं आहे. तसंच त्यांची तारुण्यात येण्याची प्रक्रियाही इतरांच्या तुलनेत उशिराने सुरू होते.

ही माहित खरी आहे का? याचा शोध घेण्यासाठी संशोधकांच्या टीमनं युके बायोबँकमध्ये असलेल्या जवळपास पाच लाख लोकांच्या अनुवांशिक माहितीचा अभ्यास केला. आनुवांशिक आणि आरोग्याबाबत याठिकाणी प्रचंड माहिती उपलब्ध आहे.

ज्या मुलांमध्ये मेंदूच्या रिसेप्टर्समध्ये अडथळा आणणारं जीन म्युटेशन (जनुकांचं उत्परिवर्तन) आढळतं, ती मुलं इतरांच्या तुलनेत उंची आणि वजन कमी असलेली असतात. तसंच कमी वयात हे परिणाम होतात, असं आढळून आलं आहे.

संशोधकांना अभ्यासादरम्यान अशी एक व्यक्तीदेखील आढळली. त्या व्यक्तीमध्ये MC3R च्या दोन्ही जीन्समध्ये म्युटेशन आढळलं होतं. ते अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक असतं. यामुळं या व्यक्तीची उंची अत्यंत कमी होती. शिवाय त्यांची तारुण्यात येण्याची प्रक्रिया 20 व्या वर्षानंतर सुरू झाली होती.

भविष्यासाठी औषधे

पण हे काही केवळ मानवांमध्येच घडत नाही. संशोधकांनी याबाबत उंदराचाही अभ्यास केला, आणि त्यातही अशीच प्रक्रिया असल्याचं आढळून आलं आहे.

या संशोधनामुळं ज्या मुलांना शारीरिक वाढ आणि तारुण्यात येण्यासंबंधी समस्या असतील त्यांच्या उपचारासाठी मोठी मदत होणार आहे. शिवाय गंभीर आजारांमुळं कमकुवत बनलेल्या आणि शरिर बळकट होण्याची गरज असलेल्यांनाही याचा फायदा होणार आहे.

"अशा प्रकारच्या रुग्ण किंवा व्यक्तींमध्ये शारीरिक क्षमता वाढण्यासाठी औषधाच्या माध्यमातून MC3R सक्रिय केल्यास, त्याचा कॅलरीज वाढून स्नायू किंवा इतर कमकुवत उती (टिश्यू) मजबूत होण्यात मदत होऊ शकते का? याबाबत भविष्यात संशोधन व्हायला हवं," असं प्राध्यापक ओराहिली म्हणाले.

शास्त्रांनी यापूर्वी भूकेवर नियंत्रण असलेल्या मेंदूच्या रिसेप्टरचा शोध लावला आहे. त्याला MC4R म्हणतात. ज्यांच्यामध्ये हे रिसेप्टर्स नसतात ते शक्यतो लठ्ठपणाच्या समस्येनं ग्रस्त असतात.

लोकांची उंची वाढतच राहणार?

मानवाच्या उंचीला कमाल मर्यादा आहे. अनुवांशिक क्षमतेनुसार लोकांची ही मर्यादा ठरत असते.

मात्र, ते घडण्यासाठीच्या प्रक्रियेवर आरोग्य आणि आहार याचा मोठा परिणाम होत असतो.

गरीब कुटुंबांमधील मुलांना पुरेसे अन्न आणि त्यातून पुरेशा कॅलरीज मिळाल्या तर त्यांना अनुवांशिकतेनुसार त्यांच्या पालक किंवा आजी आजोबांसारखी उंची मिळू शकते.

साधारणपणे उंच लोक अधिक काळ जगतात आणि त्यांना हृदय विकार होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर ते अधिक कमाईही करू शकतात.

पण मानवाची वाढ ही कायमच होत राहणार नाही.

युरोपातील इतर अनेक देशांप्रमाणे युकेमध्येही गेल्या शतकात सरासरी उंचीमध्ये वाढ झाली आहे. मात्र, गेल्या दहा वर्षामध्ये ही सरासरी उंची स्थिर झाली असल्याचे संकेत मिळत आहेत.

इतर ठिकाणचा विचार करता गेल्या शतकात उंचीत सर्वाधिक वाढ ही दक्षिण कोरियातील महिला आणि इराणचे पुरुष यांच्यात आढळून आली आहे.

जगातील सर्वात उंच व्यक्ती हे नेदरलँडमध्ये जन्मणारे पुरुष (71.8 इंच) आहेत. तर सर्वात कमी उंची ग्वाटेमालामध्ये जन्मणाऱ्या महिलांची (55.1इंच) आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)