'ब्लडी फूल' म्हणणाऱ्या बदकाबद्दल ऐकलंय? हे बदक कुठे सापडलं?

फोटो स्रोत, Library Stock Images/BBC
ऑस्ट्रेलियातील मस्क डक या प्रजातीच्या बदकाच्या आवाजाची ध्वनिफीत (ऑडिओ) समोर आली आहे. या बदकाला रिपर असंही म्हटलं जातं. या ऑडिओमध्ये बदक "यू ब्लडी फूल" असे शब्द उच्चारत असल्याचं समोर आलं आहे. संशोधकांनी हा ऑडिओ प्रसिद्ध केला आहे.
बदकाचा हा आवाज 34 वर्षांपूर्वी रेकॉर्ड (ध्वनिमुद्रीत) केलेला आहे. ही प्रजाती आवाजांची नक्कल करण्यात सक्षम असल्याचा हा पहिलाच पुरावा समोर आला आहे.
डॉ. पीटर फुल्लागर यांनी 1987 मध्ये कॅनबरा जवळ असलेल्या टिडबिनबिल्ला नेचर रिझर्व्ह या ठिकाणी रिपरचा हा आवाज रेकॉर्ड केला होता.
पण त्यांनी रेकॉर्ड केलेला हा आवाज नेदरलँडमधील लेडेन विद्यापीठाचे प्राध्यापक कॅरेल टेन केट यांनी नुकताच नव्यानं प्रसिद्ध केला आहे.
प्राध्यापक टेन केट हे पक्ष्यांच्या शब्द उच्चारण्याची किंवा नक्कल करण्याची क्षमता याबाबत संशोधन करत आहेत. या अभ्यासादरम्यान त्यांना काही महत्त्वाची माहिती मिळाली. बोलण्याची क्षमता असलेल्या मस्क डक बाबत त्यांना माहिती मिळाली. तसंच हे बदक इतर काही आवाज काढू शकतं अशीही माहिती त्यांना मिळाली.
"हे एक मोठं आश्चर्य होतं... या क्षेत्रातील अभ्यासकांकडून याबाबत आतापर्यंत दुर्लक्ष झालं," अशी माहिती प्राध्यापक टेन केट यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिली.
"ही एक अत्यंत खास अशा शोधाबाबत, पुन्हा नव्यानं मिळालेली ही माहिती होती."

फोटो स्रोत, Library Stock Images/BBC
आवाजाची नक्कल करणं हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. डॉल्फीन, व्हेल, हत्ती आणि वटवाघूळ हे वेगवेगळे आवाज शिकण्यास सक्षम असतात याचे पुरावे आहेत. पण निसर्गातील बहुतांश सस्तन प्राण्यांमध्ये मात्र हे वैशिष्ट आढळून येत नाही.
तर, काही पक्षी आणि प्रामुख्यानं पोपट हे आवाजांची नक्कल करण्यात सक्षम असतात.
"पण तसं असलं तरी या गटासाठी, आवाज शिकणं किंवा नक्कल करणं ही दुर्मिळ बाब आहे," असं प्राध्यापक टेन केट म्हणाले.
"साँग बर्ड, पोपट आणि हमिंगबर्ड हे काही ठराविक आवाज शिकू शकतात हे आपल्याला माहिती आहे. अनेक प्रजातींचा यात समावेश होतो. पण त्याचं मुख्य कारण म्हणजे, या गटातील प्रजातींमध्ये जन्मतःच आवाज शिकण्याची क्षमता असते."
पक्ष्यांच्या 35 पैकी केवळ 3 प्रजातींमध्ये आवाज काढण्याची किंवा शिकण्याची क्षमता असल्याचं अभ्यासकांना यापूर्वीपर्यंत वाटत होतं. पण प्राध्यापक टेन केट यांनी आता या गटामध्ये रिपर या एका नव्या सदस्याचा समावेश केला आहे.
"अशा गटातील प्रजातींच्या आवाज शिकण्याच्या क्षमतेचं निरीक्षण करण्याच्या दृष्टीनं, हा शोध अधिक उल्लेखनीय ठरतो," असंही ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








