तालिबान: अफगाणिस्तानातून माणसांना बाहेर नेण्यासाठी आता अमेरिका प्रवासी विमानांचा वापर करणार

अफगाणिस्तान, अमेरिका,

फोटो स्रोत, US MARINE CORPS/REUTERS

फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानमधून बाहेर जाण्यासाठी अनेक नागरिक प्रयत्नात आहेत.

अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका आता प्रवासी/व्यावसायिक विमानांचा वापर करणार असल्याचं अमेरिकेने म्हटलंय.

अमेरिकेचा संरक्षण विभाग असलेलया पेंटागॉनन म्हटलं की 18 प्रवासी विमानं अफगाणिस्तानातल्या लोकांना सुरक्षित देशांमध्ये घेऊन जातील.

अजूनही हजारो अफगाण लोक काबूल विमानतळाच्या बाहेर गर्दी करत आहेत. तालिबानाने 15 ऑगस्टला देशाची सत्ता हस्तगत केल्यानंतर तिथल्या लोकांना त्वरेने देशाबाहेर जायचं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी, 22 ऑगस्टला म्हटलं की जवळपास 28 हजार लोकांना गेल्या आठवड्यात सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं.

"काळजाला घरं पडणारी दृश्यं आपण रोज बघतो आहोत, पण वेदना सहन केल्याशिवाय इतक्या लोकांना बाहेर काढण्याचा सध्या तरी कुठला रस्ता नाहीये," बायडन यांनी पत्रकारांना सांगितलं. "आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे आणि या घडीला काहीही होऊ शकतं."

काबूल विमानतळाच्या बाहेर हजारो लोकांच्या रांगा लागल्या आहेत. या विमानतळाच्याबाहेर कमीत की 20 लोकांचा मृत्यू झालाय असं नाटो फौजांच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितलं. काही जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याच्याही बातम्या आहेत.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी इथली परिस्थिती निवळली होती.

अफगाणिस्तान, अमेरिका, काबूल

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, काबूल विमानतळावरचं दृश्य

यूकेचे संरक्षण मंत्री जेम्स हेपी यांनी म्हटलं की तालिबान आता हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांना नीट रांगेत उभं करतंय. त्यामुळे तिथली गोंधळाची परिस्थिती आटोक्यात आहे. त्यामुळे कामात गतिमानता आली आहे आणि ज्या लोकांना देश सोडून बाहेर पडायचं आहे त्यांना लवकर पुढे जाता येतंय.

युकेच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की 15 ऑगस्टपासून त्यांनी 5,725 लोकांना देशाबाहेर काढलं आहे.

युकेचे जवळपास 1000 सैनिक काबूलमध्ये तैनात होते.

नागरी विमानांचा उड्डाणासाठी वापर

रविवारी, 22 ऑगस्टला अमेरिकेच्या संरक्षण खात्याने म्हटलं की अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आता ते प्रवासी विमानांचा वापर करणार आहेत.

अशाप्रकारे नागरी प्रवासी विमानांचा वापर याआधी 2013 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यानंतर आणि 1990-91 च्या आखाती युद्धात केला गेला होता.

अफगाणिस्तान, अमेरिका, काबूल

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानमधून बाहेर जाण्यासाठी हजारो नागरिक प्रयत्न करत आहेत.

अमेरिकेच्या संरक्षण खात्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार 18 विमानं यात वापरली जाणार आहेत. यातली चार विमानं यूनायडेट एअरलाईन्स, तीन-तीन विमानं प्रत्येकी अमेरिकन एअरलाईन्स, अॅटलास एअर, डेल्टा एअर आणि ओम्नी एअर्सची आहेत तर दोन विमानं हवायन एअरलाईन्सची आहेत.

"या विमानांमुळे अडकलेल्या लोकांना वेगळ्या देशात घेऊन जाता येईल. यातलं कुठलंच विमान काबूल विमानतळावर उतरणार नाही," असं बायडन म्हणाले.

अफगाणिस्तानजवळच्या जवळपास दोन डझन देशांमध्ये तात्पुरती 'प्रक्रिया कार्यालयं' उभी केली आहेत. इथे अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांची तपासणी केली जाईल आणि त्यांना पुढे पाठवलं जाईल.

"ज्या अफगाण लोकांनी अमेरिकेला मदत केली आम्ही त्यांच्या नवीन घरात त्यांचं स्वागत करू. हीच आमची ओळख आहे," बायडन म्हणाले.

व्हाइट हाऊस सुरक्षा सल्लागार जेक सलिव्हन यांनी हजारो अमेरिकन नागरिक अफगाणिस्तानात अडकले असल्याचं म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर आता ही बातमी आली आहे.

वृत्तवाहिनी सीएनएनच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं की, "नक्की किती लोक अडकलेत हे सांगता येणार नाही, पण त्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याचे पूरेपूर प्रयत्न सुरू आहेत."

जेक सलिव्हन यांनी असंही म्हटलं की काबूल विमानतळावर इस्लामिक स्टेट हल्ला करू शकते ही शक्यता अगदीच खरी आणि गंभीर आहे.

तालिबानचे अधिकारी आमिर खान मुताकी यांनी काबूल विमानतळावर उडालेल्या 'अभूतपूर्व गोंधळासाठी' अमेरिकेला जबाबदार ठरवलं आहे.

त्यांनी अंतर्गत तालिबानमध्ये असलेल्या असंतोषावरही भाष्य केलं. ते म्हणाले, "काही निर्णय तालिबान चळवळीच्या दीर्घकालीन फायद्यासाठी आणि तालिबानची अफगाणिस्तानात असणारी भूमिका लक्षात घेऊन घेतलेत."

तालिबान भविष्यातल्या सरकारस्थापनेसाठी 'सगळ्या गटांशी' चर्चा करतंय असंही त्यांनी म्हटलं.

अमेरिका 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची मोहीम चालवणार आहे. पण ही मुदत वाढवावी म्हणून अमेरिकेवर सगळीकडून दबाव येतोय. बायडन यांनी म्हटलं की ही मुदत वाढवावी म्हणून चर्चा सुरू झाल्यात पण "आपण आशा करूया की तशी वेळ येणार नाही."

बोरिस जॉन्सन यांनी बोलवली जी-7 गटाची बैठक

तालिबानाने जितक्या सहजपणे अफगाणिस्तानात पुन्हा सत्ता हस्तगत केली हे पाहून जगातल्या अनेक देशांना आणि लोकांना धक्का बसला आहे.

यूके पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी जी-7 देशांच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलावली. त्यांनी ट्वीट करून म्हटलं की, "अफगाण लोकांनी गेल्या 20 वर्षांत जे कमावलं त्याचं रक्षण करण्यासाठी, अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आणि मानवतावादी संकट टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे."

अफगाणिस्तान, अमेरिका, काबूल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

यूकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी मात्र फौजा मागे घेण्याच्या निर्णयाबद्दल अमेरिकेवर सडकून टीका केली आहे.

"जगात नजर फिरवून पाहिलं तर लक्षात येतं की फौजा मागे घेण्याच्या निर्णयामुळे त्याच लोकांना आनंद झालाय जे पाश्चात्य देशांचे विरोधक आहेत."

31 ऑगस्टपर्यंत आपल्या फौजा मागे घेण्याचा अमेरिकेचा विचार आहे.

पण युकेसह अनेक मित्रराष्ट्रांनी म्हटलंय की अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ही मुदत वाढवली पाहिजे. सध्या काबूल विमानतळ अमेरिकन फौजांच्या ताब्यात आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)