World Lion Day : सिंह ना जंगलाचा राजा आहे, ना तो जंगलात राहतो...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आल्फी शॉ
- Role, बीबीसी अर्थ
ग्रीक नायक हर्क्युलस हातून मारल्या गेलेल्या निमियन सिंहापासून ते इजिप्तमधील युद्धदेवता माहेसपर्यंत सिंहांच्या अनेक प्रतिमांनी जगभरातील मिथकांना जन्म दिलाय.
जवळपास सर्वच संस्कृती किंवा दंतकथांमध्ये सिंहाचा उल्लेख दिसून येतो. गेल्या काही वर्षांत सुद्धा सिंहाच्या भोवताली अनेक मिथकं गुंफली गेलीच.
अनेक पिढ्यांनी सिंहाच्या कथा सांगितल्या. आज आपण या कथांसोबत जोडल्या गेलेल्या मिथकांमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
'सिंह राजा नाही'
'लायन किंग' हा क्लासिक सिनेमा भले तुम्हाला कितीही आवडत असेल आणि त्याची गोष्ट तुम्हाला भले खरी वाटत असेल, मात्र मुफासा किंवा राजकुमार सिंबासारखा सिंहांचा कुणी इन-चार्ज किंवा प्रभारी नसतो. किंबहुना, आफ्रिकेतील कुटल्याही प्राण्यांमध्ये अशी पद्धत नाही.
सिंहांमध्ये राजा-राणी हा प्रकारच नसतो. कुठल्याही रँकिंगविना असलेल्या बरोबरीत ते राहतात.
अमुक सिंहाचं आता वर्चस्व आहे, असा पदक्रम सिंहांमध्ये नसतो. म्हणजेच, सिंहांमध्ये एखादा सिंह राजा आहे, असं काही नसतं. किंवा हेच सिंहिणीसाठी लागू होतं. कुठलीही सिंहिणी राणी वगैरे नसते. कुणी युवराज सिंह नसतो. कुणालाच कुठलीच रँक नसते.

फोटो स्रोत, MARIE-ANGE OSTRÉ/GETTY
सिंहांबाबत सर्वात भारी गोष्ट म्हणजे, सिंहांचा समाज समतावादी असतो, जिथं सर्व सिंह बरोबरीत राहतात.
असं होऊ शकतं की, एखाद्या सिंहाला एखादी सिंहीण आवडत असावी आणि तिचं तो रक्षण करत असेल. पण याचा अर्थ असा नाही की, तो जंगलाचा राजा आहे.
अत्यंत कुतुहलजनक अशी ही प्रजात आहे. पण माणसांना हे कळत नाही की, सिंह किती सहकार्यानं राहतात आणि कुठल्याही पदक्रम न बाळगता रँकिंगविना जंगलात वावरतात.
वृक्ष नसलेल्या जंगलाचे राजे
सिंहांना 'जंगलाचे राजे' म्हटले जाते. हजारो कथांमध्ये हेच सांगितलं गेलंय. मात्र, सिंहांसाठी हे बिरुद वापरणं चूक आहे. कारण सिंह जंगलात राहत नाहीत आणि त्यांच्यात कुणी राजा नसतो.
सिंह घनदाट जंगलापासून दूर, उंच गवताळ मैदानी प्रदेशात राहतात. टेकड्यांच्या प्रदेशात राहतात. मात्र, हे निश्चित की, ते घनदाट जंगलात राहत नाहीत.
सिंहांबाबत हा गैरसमज अनुवादामुळे जगभर पसरलाय. विशेषत: हिंदीतल्या अनुवादाचं आपण उदाहरण घेऊ.

फोटो स्रोत, SIMON BLAKENEY/BBC NHU 2018
इंग्रजीतला जंगल (Jungle) शब्द मूळ हिंदी भाषेतला आहे. पण हिंदीत जंगलचा अर्थ होतो - बंजर जमीन.
हा शब्द गवताच्या मोठमोठ्य माळरानांसाठी सहज लागू होतो. त्यामुळे इथं सिंहाला जंगलाचा राजा म्हणणं वावगं ठरत नाही. मात्र, घनदाट जंगलाशी त्याचा संबंध जोडला जातो, ते चूक आहे.
अल्बि-नो
आफ्रिकेत पांढऱ्या सिंहांना पवित्र मानलं जातं. एक गैरसमज असाही आहे की, हे सिंह अल्बि-नो म्हणजेच रंगहीन आहेत.
खरंतर अल्बि-नो सिंहही असतात. मात्र, पांढरे सिंह हे ताकदवान प्राण्यांतील वेगळी प्रजात आहे. पण त्यांना अल्बि-नो म्हणता येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पांढऱ्या सिंहाचा विकासक्रम उलट्या दिशेतील बदलाप्रमाणे दिसून येतो. त्याला ल्यूसिज्म म्हटलं जातं. यात सिंहाच्या शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होतं.
मेलेनिन सिंहाच्या शरीरावरील केस आणि डोळ्यांच्या रंगांना नियंत्रित करतं. मेलेनिन कमी झाल्यास सिंहाचा मूळ रंग फिकुटत जातो आणि तो पांढरा दिसतो.
खरंतर डोळ्यांच्या रंगावरून पांढऱ्या सिंहांचा आणि अल्बि-नो सिंहांची ओळख होते. पांढऱ्या सिंहांचे डोळे निळे असतात, तर अल्बि-नो सिंहांचे डोळे लालबुंद असतात.
आयाळ असणं यशाचं प्रतिक
सिंहाच्या मानेवरील केसांना आयाळ म्हणतात. यातून सिंहामधील यौन आकर्षणाचं प्रमाण मोजण्याच्या दृष्टीनंही या आयाळीकडे पाहिलं जातं.
नर सिंहाच्या मानेवर जितकी झुपकेदार, घनदाट आयाळ असेल, तितकं सिंहिणीला आकर्षिक करण्याची त्याची क्षमता जास्त मानली जाते. मात्र, नव्यानं मिळालेल्या काही पुराव्यावरून लक्षात येतं की, हा नियम सर्व ठिकाणी लागू होत नाही.

फोटो स्रोत, SIMON BLAKENEY/BBC NHU 2018
त्सावो (केनिया) मध्ये आयाळरहित सिंहांनी केवळ सिंहिंणींना आकर्षितच केलं नाही, तर इतर सिंहांपासून आपल्या क्षेत्राचं संरक्षण करण्यातही यश मिळवल्याचं दिसून आलंय.
मानेवर आयाळ असणं म्हणजे सिंह असण्याची निश्चिती सुद्धा नाही. सिंहिणींच्या मानेवरही आयाळ आढळून आलीये. विशेषत: बोत्सवानाच्या ओकवांगो डेल्टाच्या सिंहिणींमध्ये. या सिंहिणी साधारणत: सिंहांशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी होतात आणि त्यांना बछडे होण्याची शक्यता फार कमी असते.
स्वत: शिकार करणं
सिंहांबाबत असंही मानलं जातं की, सर्व शिकार सिंहिणी करतात. मात्र, नव्यानं सापडलेल्या पुराव्यांनुसार हा समज पूर्णपणे बरोबर नाही.

फोटो स्रोत, LOUIS RUMMER-DOWNING/BBC NHU 2018
सिंहिणीची प्राथमिक भूमिका शिकार करण्याची आहे. मात्र, सिंह त्याच्या क्षेत्राचं रक्षण करतो. शिवाय, सिंह शिकार करण्यासही सक्षम असतो.
एवढंच नव्हे, तर संशोधनात असेही संकेत मिळाले आहेत की, शिकारीच्या बाबतीत यश सिंह आणि सिंहिणीमध्ये सारखंच आहे.
सिंह शिकारीलाही जातो आणि यशस्वी होऊन परततोही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








