21 जून वर्षातला सर्वांत मोठा दिवस का आहे?

21 जून सर्वात मोठा दिवस

फोटो स्रोत, Getty Images / Anton Petrus

21 जून हा 2021 वर्षातला सर्वांत मोठा दिवस असणार आहे. याला इंग्लिशमध्ये Summer Solstice म्हटलं जातं. पण हे नेमकं का घडतं?

समर सॉलस्टाईस ही एक खगोलीय घटना आहे.

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो.

21 जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. जगातल्या अनेक देशांमध्ये या दिवशी दिवस 12 तासांपेक्षाही मोठा असतो.

यानंतर दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणजे वर्षाच्या या पुढच्या काळामध्ये सूर्य दक्षिण गोलार्धात सरकू लागतो.

Summer Solstice म्हणजे काय?

Solstice हा शब्द sōlstitium या लॅटिन शब्दावरून आला आहे.

या लॅटिन शब्दातल्या sōl या शब्दाचा अर्थ होतो सूर्य.

sistere या शब्दाचा अर्थ 'to stand still' म्हणजे स्तब्ध उभं राहणं.

साधारण 20 जून ते 22 जून दरम्यानच्या एका दिवशी दरवर्षी समर सॉस्टाईस घडतं. म्हणजे 20, 21 वा 22 पैकी एक दिवस हा त्या वर्षातला सर्वांत मोठा दिवस असतो.

यावर्षी 21 जून हा उत्तर गोलार्धात सर्वांत मोठा दिवस असेल. भारतात 21 जून 2021ला दिवस 13 तास 12 मिनिटांचा असेल.

21 जून सर्वात मोठा दिवस

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर गोलार्धातल्या प्रत्येक देशासाठी हा कालावधी वेगवेगळा असेल.

तर दक्षिण गोलार्धात या दिवशी सर्वांत मोठी रात्र असेल.

पृथ्वीचा उत्तर धृव हा 21 जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो. यादिवशी सूर्य कर्कवृत्तात ( Tropic of Cancer) थेट डोक्यावर येतो आणि यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो.

नॉर्वेमधला मिडनाईट सन

फोटो स्रोत, Getty Images /suzyco

फोटो कॅप्शन, नॉर्वेमधला मिडनाईट सन

नॉर्वे, फिनलंड, ग्रीनलंड, अलास्का आणि उत्तर ध्रुवाजवळ इतर प्रदेशांमध्ये याच सुमारास 'मिडनाईट सन' (Midnight Sun) म्हणजे मध्यरात्रीही सूर्य पहायला मिळतो.

तर आर्क्टिक प्रदेशातल्या भागांमध्ये सूर्यास्तच होत नाही.

पृथ्वी अक्षामधून कललेली असल्याने हे घडतं.

21 जूनचं महत्त्व काय?

अनेक देशांमध्ये 21 जूनचा दिवस हा ऋतुबदलाचा दिवस मानला जातो.

मराठी पंचांगांमध्येही 21 जूनची नोंद 'वर्षा ऋतू प्रारंभ' अशी केलेली असते.

पश्चिमेतल्या देशांमध्ये 21 जूनच्या दिवशी 'Spring' म्हणजे वसंत ऋतू संपून 'Summer' म्हणजेच उन्हाळा सुरू होतो. हा उन्हाळा 21 वा 22 सप्टेंबरला Autumn Equinox ने संपतो. या दिवशी दिवस आणि रात्र समान तासांचे असतात. यानंतर पश्चिमेकडच्या देशांमध्ये Autumn म्हणजे पानगळीचा मोसम सुरू होतो.

22 डिसेंबर हा वर्षातला सर्वांत लहान दिवस असतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)