You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सद्दाम हुसेन यांनी आपल्या दोन्ही जावयांची हत्या का घडवून आणली?- मुलगी रगदचा मोठा खुलासा
इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांची मोठी मुलगी रगद हुसेन शाळेत शिकत असतानाच तिचं लग्न करून देण्यात आलं होतं.
त्यावेळी तिचं वय फक्त 15 वर्षे होतं. रगद यांच्या लग्नाच्या वेळी इराक आणि इराणमध्ये युद्ध सुरू होतं. फेब्रुवारी 1996 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी रगद यांनी आपल्या कुटुंबीयांच्या सांगण्यावरून पतीसोबत घटस्फोट घेतला. पण त्यानंतर दोनच दिवसात रगदच्या पतीची हत्या करण्यात आली.
रगद यांचं लग्न सद्दाम हुसेन यांचे चुलत भाऊ हुसेन केमेल अल माजिद यांच्याशी झालं होतं. हुसेन केमेल त्यावेळी सद्दाम हुसेन यांच्या सुरक्षाव्यवस्थेचं काम पाहायचे.
सद्दाम यांच्या दुसऱ्या मुलीचं लग्न हुसेन केमेल यांचा भाऊ केमेल अल माजिद यांच्याशी झालं होतं. दोन्ही मुलींचं लग्न, घटस्फोट आणि त्यांच्या पतींची हत्या अशी दुःखद कहाणी आहे.
पुढे 2018 मध्ये रगद सद्दाम हुसेन यांचं नाव तत्कालीन इराक सरकारने मोस्ट वॉन्टेड यादीत घातलं होतं.
रगद हुसेन यांनी अल-अरबियाला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या खासगी जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत खुलासा केला आहे.
सद्दाम हुसेन यांनी रगद यांच्यावर विवाहासाठी दबाव टाकला होता की हे लग्न त्यांनी स्वेच्छेने केलं होतं, हा प्रश्नही यावेळी रगद यांना विचारण्यात आला.
लग्न आपल्या मर्जीने
या प्रश्नाचं उत्तर देताना रगद सांगतात, "माझ्या वडिलांनी त्यांच्या पाचही मुलांवर लग्नाबाबत कधीच दबाव टाकला नाही. त्यांच्या मुलींसमोर कुणी लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यास त्या गोष्टीसुद्धा त्यांनी आम्हाला सर्वांना विचारल्या. त्यांनी आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. मी त्यावेळी कुमारवयीन होते. उन्हाळ्यातली ती एक दुपार होती. वडिलांनी दरवाजा ठोठावला आणि ते माझ्या खोलीत आले. मी झोपले होते. त्यांनी अत्यंत प्रेमाने मला उठवलं. ते माझ्या बाजूला बसले, त्यांनी म्हटलं, तुझा प्रियकर आहे ना? त्यांनी त्याचं नावही सांगितलं."
त्यांनी पुढे म्हटलं, "लग्न नात्यातच होणार असल्याने इतकी अवघड परिस्थिती नव्हती. हे नातं स्वीकारावं की नाही, हा निर्णय सर्वस्वी माझा असल्याचं वडिलांनी मला सांगितलं. निर्णय झाल्यानंतर त्याबद्दल आईला कळव असं ते म्हणाले.
हुसेन केमेल अल-माजिद माझ्या वडिलांच्या सुरक्षा दलात होते. त्यांची भेट सद्दाम हुसेन यांच्याशी रोजच होत होती. माझे वडील बाकीच्या अंगरक्षकांना जेवणासाठी बोलवत तेव्हा तेसुद्धा यायचे.
आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करू लागलो होतो. माझ्या आईला त्याबद्दल माहीत होतं. तेव्हा मी लहानच होते. पण प्रेमाचं रुपांतर लगेचच लग्नात झालं. मी त्यावेळी शाळेत शिकायचे. लग्नानंतरसुद्धा मी शिक्षण सुरू ठेवलं. पुढे मी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. माझे पती शिक्षणाच्या बाजूने नव्हते. पण तरीही मी शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी इराकमध्ये सुरक्षेला कोणताच धोका नव्हता. म्हणून शाळा-कॉलेजला जाण्यायेण्यावर कोणतीच बंधनं नव्हती. माझे पती माझ्यावर प्रेम आणि आदर दोन्ही करायचे. ते माझ्या आई-वडिलांचाही आदर करायचे.
वडिलांच्या प्रेमाची बरोबरी नाही
माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्याची बरोबरी कुणालाच करता येणार नाही. त्यांनी मला जितकं प्रेम दिलं, त्याची तुलना माझ्या पती किंवा मुलांसोबत करता येणार नाही.
रगद म्हणाल्या, "इराक-ईराण युद्धादरम्यान मी लहान होते. शाळेत शिकायचे.
रगद यांनी त्यावेळच्या आपल्या काही आठवणीही सांगितल्या.
"तेव्हा आमचं आणखी एक घर होतं. तिथंही आम्ही येत-जात असायचो. एकेदिवशी खूपच बॉम्बहल्ले झाल्याने मी शाळेला गेले नाही. तेव्हा माझे वडिल सैनिकी पोशाखात माझ्याकडे आले आणि त्यांनी मला शाळेला न गेल्याचं कारण विचारलं.
मी युद्धाच्या धोक्याबद्दल त्यांना सांगितलं. त्यावेळी इतरांची मुले शाळेला जात आहेत, त्यामुळे तुलाही शाळेत जायला हवं, असं माझे वडील मला म्हणाले होते. तू शाळेला जाशील, तर इतरांच्या मुलांनाही शाळेत जाण्यासाठी धाडस येईल. तू त्यांचीही काळजी घ्यायला हवी, असंही ते म्हणाले. फक्त सद्दाम हुसेनची मुले असल्यामुळे आम्हाला विशेष वागणूक मिळावी, असं माझ्या वडिलांना कधीच वाटलं नाही. माझ्या भावंडांचा जीव तर इराकच्या संरक्षणासाठीच तर गेला आहे."
रगद कधीच राजकीय निर्णयांमध्ये सहभागी होत नव्हत्या. पण माणुसकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग होता, असं त्यांनी सांगितलं. अनेक विषयांवर माझा पतीसोबतही वाद होत असे, असंही त्यांनी सांगितलं.
पती आणि वडील आमनेसामने
पती हुसेन केमेल आणि वडील सद्दाम हुसेन यांच्या नात्यातील कडवटपणाबद्दलच्या अनेक गोष्टीही रगद यांनी सांगितल्या.
रगद यांनी म्हटलं, "पती मारले गेले, अशी मी एकटीच नव्हते. त्यावेळी इराकमध्ये अनेक महिलांनी आपल्या पतीला गमावलं होतं. वडील आणि मुलांनाही त्यांनी गमावलं.
माझे पती 1995 च्या ऑगस्ट महिन्यात जॉर्डनला गेले. त्यांना जाताना मला त्याबद्दल कळवलं. ते इथं राहिले तर कुटुंबातच त्यांच्याबाबत काहीतरी अनुचित घडेल, असं मला वाटलं. म्हणून मी तिथं जाण्याबाबत सहमती दर्शवली. सद्दाम हुसेनची मुलगी असल्याने मीसुद्धा दुसऱ्या देशात जावं, हे शक्य नव्हतं. पण जॉर्डनमध्ये आमचं स्वागत अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं. मी बाहेरची आहे, असं कधीच वाटलं नाही. पण पत्रकार परिषदेच्यावेळी ही गोष्ट सार्वजनिकरित्या सांगण्यात आली. त्यावेळी काय काय सांगितलं जाणार आहे, याची मला कल्पना नव्हती."
या पत्रकार परिषदेत हुसेन केमेल यांनी सद्दाम हुसेन यांच्याविरोधात वक्तव्यं केली होती. केमेल हे जॉर्डनला आल्याने सद्दाम सरकार बिथरलं आहे, असं ते म्हणाले. इराकच्या सैनिकांनी सत्ता परिवर्तनासाठी तयार राहावं, असंही केमेल यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
जॉर्डनमध्ये शरणागती
हुसेन केमेल अल माजिद आणि त्यांचे भाऊ सद्दाम केमेल अल माजिद 1995 च्या ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात इराक सोडून जॉर्डनला आले होते. दोन्ही भावंडांसोबत त्यांच्या पत्नी रगद आणि राणा या दोघीसुद्धा होत्या.
दोन्ही अल-माजिद बंधू सद्दाम हुसेन यांचे सर्वात मोठे विश्वासू मानले जात. लष्कराचं सगळं काम ते दोघेच पाहायचे. इराकचा शस्त्रास्त्रविषयक कार्यक्रम ही माजिद बंधूंचीच कल्पना होती, असं सांगितलं जातं. दोघे जॉर्डनला आले तेव्हा त्यांच्यासोबत इराक लष्करातील 15 अधिकारीही सोबत होते.
जॉर्डनमध्ये त्यांना किंग हुसेन यांनी अभय दिलं होतं. यामुळे सद्दाम हुसेन विशेष नाराज झाले होते. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी किंग हुसेन यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं.
अखेर रगद यांचे पती हुसेन केमेल आणि वडील सद्दाम हुसेन यांच्यात कटुता येण्यामागचं काय कारण होतं?
याचं उत्तर देताना रगद सांगतात, "माझ्या पतीचं नाव मोठं होऊ लागलं होतं. इराकमध्ये वडील सद्दाम हुसेन यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचंच नाव होतं. हुसेन कुटुंबीयांशी जवळीक असल्यामुळे त्यांची एक भूमिका होती. त्यांच्यात निर्णयक्षमता होती. कोणतीही भूमिका ठामपणे बजावण्याचं धाडस त्यांच्यात होतं. आमचं लग्न झालं त्यावेळी केमेल स्पेशल सिक्युरिटीचे प्रमुख होते. ईराणविरुद्ध झालेल्या युद्धातही केमेल हेच प्रमुख होते. सद्दाम हुसेन यांची सुरक्षा हीच या पथकाची जबाबदारी होती. त्यांच्यावर संपूर्ण देशाच्या सुरक्षेची जबाबदारी होती."
पतीच्या हत्येचा निर्णय माझ्या कुटुंबीयांचा होता
हुसेन केमेल यांच्यासोबत घटस्फोट घेण्याच्या निर्णयाबाबत रगद हुसेन सांगतात, "केमेल इराक सोडल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण राखू शकले नाहीत. एका महिन्यातच त्याचा अंदाज आला. घटस्फोटाचा निर्णय मी 1996 मध्ये इराकला परतल्यानंतर घेतला. मी माझ्या वडिलांशी बोलले आणि निर्णय घेतला. वडील अत्यंत दुःखी होते. त्यांच्याशी बराच वेळ चर्चा झाली. त्यांना बोलताही येत नव्हतं, इतके ते दुःखी होते. यादरम्यान माझा भाऊही तिथेच होता. आता मी घटस्फोट घ्यायला हवा, असान निर्णय त्यावेळी झाला."
जॉर्डनहून परतल्यानंतर तीनच दिवसांत केमेल अल माजिद आणि त्यांचे भाऊ सद्दाम केमेल अल माजिद यांची हत्या करण्यात आली.
सद्दाम केमेलचं लग्न सद्दाम हुसेन यांची दुसरी मुलगी राणा हिच्याशी झालं होतं.
पती केमेल हुसेन यांच्या हत्येचा निर्णय कुटुंबीयांचाच होता, असं रगद हुसेन यांनी मुलाखतीत सांगितलं.
ही हत्या घडवून आणण्यात रगद यांचा भाऊ उदै सद्दाम हुसेन यांचा हात होता, असंही रगद यांनी सांगितलं.
त्या सांगतात, "माझ्या पतीची हत्या झाली, त्यावेळी मी फक्त 25 वर्षांची होते. मला किती दुःख झालं, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. माझ्या वडिलांनाही याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी मला धीर देण्याचाही प्रयत्न केला.
2003 ला अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यानंतर रगद जॉर्डनला निघून गेल्या. तेव्हापासून त्या तिथेच आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)