कोरोना काळात लोक जास्त दारू पीत आहेत का?

लॉकडाऊनदरम्यान भारतात दारूची दुकानं जेव्हा उघडण्यात आली, तेव्हा प्रचंड गर्दी झाली. दारूची दुकानं कधी उघडतायत, याची वाट लोक पाहत होते.

सोशल डिस्टन्सिंग किंवा किती काळ रांगेत उभं रहावं लागतंय, याची पर्वा न करता लोक घराबाहेर पडले.

पण या लॉकडाऊनच्या काळात इतर अनेक देशांमध्येही दारूची खरेदी-विक्री वाढल्याचं उघडकीला आलंय. मार्च 2020 मध्ये ब्रिटनमध्ये दारू विक्रीत 22% वाढ झाली होती. तर अमेरिकेत दारु विक्री 55% पर्यंतची वाढ झाली होती.

याविषयीची अनेक मीम्स सोशल मीडियावर फिरली. खरंतर हा काळ सगळ्यांनी चिंता करावा असा आहे. पुढे काय होईल हे कोणालाच माहित नाही.

लोक घाबरलेले आहेत, काळजीत आहेत आणि घरात अडकून राहिल्याने चिंता वाढतेय. कोरोना लॉकडाऊनच्या या कठीण काळात दारूची सोबत लोकांनी निवडली आणि जगभरातली दारू विक्री वाढली.

दारूवर पुस्तक लिहिणाऱ्या अॅनी ग्रेस म्हणतात, "दारू जेव्हा आपल्या शरीरात जाते तेव्हा दिलासा मिळाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की आजूबाजूचा तणाव निवळतोय. डोकं रिलॅक्स होतं."

पण हा दिलासा काही काळापुरताच असतो. पुढच्या वीस वा तीस मिनिटांतच आपलं शरीर अल्कोहोल बाहेर काढणं सुरू करतं. म्हणूनच आपल्याला आणखीन दारू पिण्याची इच्छा होते.

मेंदू आणि नशा

आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग असणाऱ्या मेंदूवर दारूचा परिणाम होतो. संदेशांची देवाणघेणाण करणाऱ्या न्यूरोट्रान्समीटरवर या अल्कोहोलचा परिणाम होतो.

या न्यूरोट्रान्समीटरचा काम करायचा वेग मंदावतो. म्हणूनच दारू प्यायल्यानंतर लोकांना शांत वाटतं. शरीरात अल्कोहोल गेल्यानंतर 'डोपामाईन' नावाचं हार्मोन स्त्रवतं. आणि यामुळे आणखी दारू पिण्याची तलफ निर्माण होते.

ऑस्ट्रेलियाच्या ड्रग अँड अल्कोहोल रिसर्च सेंटरचे मायकल फॅरेल म्हणतात, "अनेकदा आपली चिंता काही काळापुरती विसरण्यासाठी लोक दारू पितात. पण विरोधाभासाची गोष्ट म्हणजे त्यांची काळजी दूर होण्याऐवजी आणखी वाढते. आणि दारू प्यायली नाही, तर ते अधिक चिंतीत होतात."

लोक दारू का पितात?

ही गोष्ट फक्त लॉकडाऊनपुरतीच मर्यादित नाही. आपलं मनोधैर्य वाढवण्यासाठी दारू पिणारे जगभरात अनेक आहेत. दारू प्यायला नंतर पुढचा काही काळ या लोकांना आपण शूर असल्याचं वाटतं, म्हणूनही दारूची सवय लागते.

सध्या लॉकडाऊनमुळे आपलं 'रूटीन' नेहमीसारखं नाही. म्हणूनही दारू पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जसं लॉकडाऊन आहे म्हणून लोकं वस्तूंची साठेबाजी करतायत, दारूबाबतही तेच घडतंय. दारू घरात असेल, तर लोक ती पिणारच.

दारू पिण्यासाठी नियमांचं उल्लंघन

आपण वागतोय ते योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी लोक आपल्या आजूबाजूला तशाच सवयींची लोक शोधतात, असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. हीच गोष्ट दारूसाठीही लागू होते.

म्हणूनच एरवी एक वा दोन पेग घेणारी व्यक्तीही आजूबाजूची वाढती दारू विक्री पाहत, आपण जास्त दारू पिणं योग्य असल्याचं ठरवू लागतो.

जागतिक साथीदरम्यान दारू पिणं किती धोकादायक?

दारू प्यायल्याने आपल्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. असं झालं तर रोग आपल्यावर सहजपणे हल्ला करू शकतात.

इटलीमध्ये नुकतंच याविषयी एक संशोधन करण्यात आलं. यात असं आढळलं की थोड्या प्रमाणात दारू प्यायली तरी कोव्हिड -10ला बळी पडण्याची शक्यता वाढते.

कारण दारूची सवय असणाऱ्यांची फुफ्फसं योग्य रीतीने काम करत नाहीत. आणि कोव्हिड 19च्या साथीमध्ये फुफ्फसंच पहिल्यांदा या रोगाच्या भक्ष्यस्थानी पडतात.

जर तुम्हाला तुमची रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल, तर दारूपासून दूर रहा असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अॅडव्हायजरीमध्ये म्हटलंय.

कारण यामुळे कोव्हिड - 19 चा सगळ्यात गंभीर टप्पा म्हणजेच अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) ला तुम्ही बळी पडू शकता.

घरी राहून सतत दारू प्यायल्याने दुसरीकडे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं वाढण्याची भीती आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाल्याचं चीनपासून ते अमेरिका - फ्रान्सपर्यंत पहायला मिळालंय.

दारूचे हे धोके लक्षात घेत दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, भारत आणि ग्रीनलँडसारख्या अनेक देशांनी लॉकडाऊनच्या काळात दारू विक्रीवर बंदी लावली.

पण अनेकांना दारूची इतकी तलफ होती की त्यांनी थिनर आणि इतर रसायनं पीत आपली तलफ शांत करण्याचा प्रयत्न केला, आणि यात त्यांचा जीव गेला.

जिथे दारूविक्रीवर बंदी लावण्यात आली नव्हती, तिथेही साधारण एक तृतीयांश लोक कमी प्रमाणात दारू पीत असल्याचं दिसून आले.

तर 20 टक्के लोक पहिल्यापेक्षा जास्त मदय सेवन करत होते. म्हणजेच दारूची विक्री वाढवण्याचं प्रमाण जास्त होतं. आणि ही गोष्ट काळजीची होती.

दारूची सवय चांगली नसल्याचं मायकल फॅरल आणि अॅनी ग्रेस सांगतात. जर तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर ही सवय आणखीनच वाईट. अशांसाठी अनेक ठिकाणी ऑनलाईन मदतही देण्यात येतेय.

अॅनी ग्रेस म्हणतात, "अडचणीच्या काळात लोकांचा निर्धार आणखी ठाम होतो. कारण अनेकदा दबावाखाली आपण चांगल्या सवयी स्वीकारतो."

आशा करूयात की हा लॉकडाऊनचा काळ आपल्याला दारू आणि इतर वाईट सवयींपासून मुक्त करेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)