अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमती कोरोना व्हायरस लॉकडाऊन मुळे गेल्या शून्याखाली

इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमती शून्याखाली घसरल्या आहेत. म्हणजेच आता कच्च्या तेलाचं उत्पादन करणारे देश त्यांच्याकडून खरेदी करणाऱ्यांना पैसे देऊन तेल विकत घेण्याची विनंती करत आहेत.

लॉकडाऊनमुळे सध्या जगभरात लोक आपापल्या घरांमध्ये आहेत, विमानसेवा ठप्प आहेत आणि त्यामुळे इंधनासाठी, परिणामी कच्च्या तेलासाठी असलेली मागणी रोडावली आहे. कच्च्या तेलाची घटलेली मागणी आणि तेल साठवून ठेवण्याची मर्यादित क्षमता, यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ही विक्रमी घसरण झाली आहे.

अमेरिकन तेलाच्या किमतींबाबत वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट (WTI) ला बेंचमार्क म्हणजे पाया मानलं जातं. इथे तेलाच्या किंमतीत घसरण होऊन किंमत प्रति बॅरल शून्याखाली म्हणजेच ऋणात्मक 37.63 डॉलर्स झाली आहे.

कारण आपल्याजवळच्या तेलाची विक्री झाली नाही तर उत्पादन करण्यात आलेलं तेल साठवायचा कुठे, असा मोठा प्रश्न उत्पादकांसमोर मे महिन्यात उभा राहू शकतो.

तेल साठवून ठेवण्याबाबतच्या अडचणी लक्षात घेत आता तेल उत्पादक कंपन्यांनी वाढीव स्टॉक ठेवण्यासाठी टँकर्स भाड्यावर घेतले आहेत. पण यासगळ्याचा परिणाम अमेरिकेतल्या तेलाच्या किमतींवर झाला आणि या किमती अगदी शून्याच्याही खाली गेल्या.

त्यामुळे आता उत्पादित तेल कुठे साठवयाचं आणि या तेलाच्या घसरलेल्या किंमती या दोन्हींची चिंता आता अमेरिकन कंपन्यांना आहे.

सोमवारी अमेरिकेत झालेल्या या घसरणीचा परिणाम जगभरातल्या तेल बाजारांमध्ये झाला.

तेलाचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असणाऱ्या 'ब्रेंट'मध्येही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 8.9% घसरण नोंदवण्यात आली. इथे तेलाच्या किमती घसरून प्रति बॅरल 26 डॉलर झाल्या आहेत.

कमी झालेल्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं कच्च्या तेलाचं उत्पादन घटवण्यात यावं का, याविषयी तेल उत्पादक देशांमध्ये सुरुवातीला वाद झाले होते. यानंतर तेल उत्पादक 10 टक्क्यांनी कमी करण्याबाबत तेल उत्पादन करणाऱ्या 'ओपेक' आणि इतर देशांमध्ये एकमत झालं. जगभरातलं कच्च्या तेलाचं उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पण उत्पादन कमी केल्यानेही तेल उत्पादकांसमोरच्या अडचणी कमी झाल्या नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बीबीसीचे आर्थिक प्रतिनिधी अँड्र्यू वॉकर सांगतात

सध्या जगामध्ये गरजेपेक्षा वा वापरापेक्षा जास्त इंधनसाठा आहे. शिवाय आर्थिक घसरणीमुळे जगभरातली इंधनासाठीची मागणी घटलेली आहे.

तेल उत्पादन करणाऱ्या ओपेक आणि रशियासारख्या इतर देशांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घटवण्याचं ठरवलं होतं. अमेरिकेनेही असं केलं. पण तरीही सध्या जगात गरजेपेक्षा जास्त तेलसाठा आहे.

आणि इतकं तेल वापरलं जाणार का, फक्त हाच प्रश्न नाही. तर लॉकडाऊन शिथील होऊन पुरेशी मागणी निर्माण होईपर्यंत इतकं तेल साठवून ठेवता येणार का, ही देखील मोठी चिंता आहे.

साठवण क्षमता झपाट्याने संपतेय आणि तेल उत्पादन सुरूच असल्याने भविष्यात कच्च्या तेलाच्या किंमती आणखी खाली येण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलासाठीची जगभरातली मागणी वाढली तरच ही परिस्थिती सुधारेल. पण सध्यातरी हे जगभरातल्या आरोग्यसंकटावर अवलंबून आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)