कोरोना व्हायरस : कोव्हिडच्या काळात मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं?

    • Author, क्रस्टी ब्रुअर
    • Role, बीबीसी न्यूज

जगभरातल्या 188 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरलेला आहे. यामुळे जगभरात 8 लाखांपेक्षा अधिक बळी गेलेयत. साहजिकच टीव्ही - इंटरनेट - व्हॉट्सअॅप सगळीकडेच कोरोनाचीच चर्चा आहे.

पण सातत्याने कोरोनाबद्दल ऐकणं, वाचणं यामुळे अनेकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय.

विशेषत: अस्वस्थता आणि ओसीडी (ऑब्सेसिव्ह कंप्लसिव्ह डिसऑर्डर) आजार असणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होतो आहे. त्यामुळेच या 'कोरोनाग्रस्त' काळात तुमचं मानसिक आरोग्य कसं राखाल?

कोरोनासंदर्भात माहिती मिळवणं साहजिक आणि आवश्यकही आहे. मात्र सातत्याने होणाऱ्या कोरोनाविषयक माहितीच्या भडिमारामुळे अनेक मानसिक आजार वाढू लागले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मानसिक आरोग्यासंदर्भात माहिती, सल्ला तसंच सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय,

  • तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल किंवा तणाव वाटेल अशा बातम्या वाचणं, पाहणं टाळा.
  • सार्वजनिक ठिकाणी वावरताना काय काळजी घ्यावी याकरता माहिती मिळवा. त्यानुसार तुमच्याकरता आणि घरच्यांसाठी योग्य पावलं उचला.
  • दिवसातून ठराविक वेळीच याविषयीचे अपडेट्स पहा. सतत तेच पाहात वा वाचत राहू नका.

अँक्झायटी UK या संस्थेचे निकी लिडबेटर याविषयी सांगतात, "ज्यांना अँक्झायटी डिसॉईडर म्हणजेच अतिशय बेचैन होण्याचा, जास्त काळजी करण्याचा त्रास आहे त्यांना एखादी गोष्ट आपल्या काबूत नाही असं वाटणं वा अनिश्चितता सहन करू न शकणं याचा त्रास होतो. म्हणूनच आधीपासून अशी 'अँक्झायटी डिसॉर्डर' असणाऱ्यांना जास्त त्रास होणं समजून घ्यायला हवं."

"काय घडेल हे माहित नसल्याने त्याची काळजी करणं वा काहीतरी घडण्याची वाट पाहणं, ही अँक्झायटीची मूळ कारणं आणि सध्या कोरोना व्हायरसमुळे हे प्रचंड प्रमाणात सगळीकडेच दिसत आहे," रोझी विदरली सांगतात. 'माईंड' या मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या त्या प्रवक्त्या आहेत.

मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय करायला हवं?

मोजक्या बातम्या वाचा आणि आपण काय वाचतोय याकडे लक्ष द्या. कोरोना व्हायरसबद्दलच्या भरपूर बातम्या सतत वाचत राहणं तुम्हाला काळजीत टाकू शकतं. म्हणूनच बातम्या देणाऱ्या वेबसाईट्स आणि सोशल मीडियापासून काही काळ दूर रहा.

ज्या गोष्टी पाहिल्याने वा वाचल्याने तुम्हाला बरं वाटण्यापेक्षा जास्त काळजी वाटायला लागते, अशा गोष्टींवर मर्यादित वेळ घालवा. किंबहुना दिवसातून कोणत्या वेळी बातम्या पहायच्या त्याची वेळ ठरवून द्या.

सध्याच्या काळात सगळीकडे चुकीची माहिती मोठ्या प्रमाणात पसरतीये म्हणूनच बातम्या या तुमच्या ठराविक विश्वासार्ह स्त्रोतांकडूनच मिळवा आणि त्यावरच विश्वास ठेवा. सरकारी आकडेवारी वा पत्रकं, वेबसाईट्स याकडे लक्ष द्या.

सोशल मीडियापासून ब्रेक

  • आजूबाजूला इतकं घडत असताना त्याविषयी वाचावसं वाटणं, अपडेट रहावंसं वाटणं स्वाभाविक आहे. पण त्याने तुमची काळजी वाढू शकते.
  • म्हणूनच आपण कोणत्या अकाऊंटने वा युजरने पोस्ट केलेली माहिती वाचतोय याकडे लक्ष द्या.
  • चुकीची माहिती देणारे अकाऊंट्स, हॅशटॅग्स वा फिरणारे मेसेजेस यापासून दूर रहा.
  • सोशल मीडियापासून दूर राहून टीव्हीवर वेगळं काहीतरी पाहण्याचा वा पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा.
  • ट्विटरवर ज्या शब्दांमुळे तुमची बेचैनी वाढत असेल म्हणजेच अँक्झायटी ट्रिगर होत असेल त्याविषयी वाचणं टाळा किंवा असे अकाऊंट्स अनफॉलो वा म्युट करा.
  • ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सतत याविषयीच चर्चा होते, ते देखील म्यूट करा आणि जर तुम्हाला बातम्यांचा वा माहितीचा भडिमार झाल्यासारखं वाटत असेल तर फेसबुक पोस्ट वा फीड 'Hide' करा.

हात धुवा - पण अतिरेक नको

OCD - म्हणजेच Obsessive Compulsive Disorder. म्हणजेच एखादी कृती वारंवार करावंसं वाटणं. कोरोना व्हायरसची साथ सगळीकडे पसरल्यानंतर OCD असणाऱ्यांवरही याचा परिणाम झालाय. आपल्यालाही संसर्ग होऊ शकतो या भीतीमुळे OCD निर्माण होऊन हात पुन्हा पुन्हा धुवावेसे वाटू शकतात.

लिली बेली यांनी OCD असणाऱ्यांच्या आयुष्यावर 'बिकॉज वी आर बॅड' नावाचं पुस्तक लिहिलंय.

त्या सांगतात, "संसर्ग होण्याची भीती हे त्यांच्याही OCD मागचं एक कारण होतं. अशा वेळी हात धुण्याचा सल्ला देणं हे OCD मधून बऱ्या झालेल्या व्यक्तींसाठी ट्रिगरचं काम करू शकतं."

"हे अतिशय कठीण आहे कारण मी जी कृती करायचं टाळतीये, तेच करायचा सल्ला आता मला दिला जातोय. माझ्यासाठी एकेकाळी साबण आणि सॅनिटायजर हे एखाद्या व्यसनासारखे होते," असंही त्या म्हणतात.

म्हणूनच आपण हात कशासाठी धुतोय याकडे लक्ष द्या. विषाणू पसरण्याचा वा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आपण ठराविक वेळा हात धुतोय की स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःला बरं वाटावं म्हणून हात धुतोय, हे जाणणं महत्त्वाचं आहे.

बेली याविषयीची आणखी एक गोष्ट सांगतात, "OCD असणाऱ्या अनेक लोकांसाठी घराबाहेर पडता येणं हे बरं होण्यासारखं असतं. म्हणूनच एकांतात राहवं लागणं, घराबाहेर पडता न येणं हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असतं."

"आम्हाला जर घरी रहावं लागलं, तर मग आमच्याकडे भरपूर रिकामा वेळ राहतो. आणि अशा रिकामेपणात OCD वाढायला वाव असतो," त्या सांगतात.

लोकांच्या संपर्कात रहा

साथ जशी पसरेल तसतसं कदाचित अधिकाधिक लोकांना घरी रहावं लागेल. म्हणूनच ज्यांची काळजी वाटते त्या सगळ्यांचे योग्य फोन नंबर्सना ईमेल आपल्याकडे आहेत ना, याची खात्री करून घ्या.

एकमेकांची चौकशी करण्याची वेळ ठरवा आणि तुमच्या सभोवतालच्या व्यक्तींच्या संपर्कात रहा.

तुम्ही जर - सेल्फ आयसोलेशन - म्हणजे स्वतःहून विलग होत असाल तर मग दिनक्रम पाळतानाच आपण रोज काहीतरी वेगळं करतोय, याकडेही लक्ष असू द्या. तोचतोचपणा येऊ देऊ नका.

हे दोन आठवडे तुमच्यासाठी कदाचित खूप चांगलेही ठरू शकतात. या काळात तुम्ही पुढच्या गोष्टींची आखणी करू शकता किंवा आजवर जे पुस्तक वाचायचं राहून गेलं होतं, ते वाचू शकता.

खचून जाऊ नका

कोरोना व्हायरसची जगभर पसरलेली ही साथ पुढचे काही आठवडे वा महिने टिकू शकते. म्हणूनच ब्रेक घेणं वा मनाला बदल मिळू देणं महत्त्वाचं आहे. जमेल तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जाणं, सूर्यप्रकाशात जाणं चांगलं. व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

काळजी आणि बेचैनी काबूत आणण्यासाठी अँक्झायटी युके या संस्थेने सांगितलेले हे काही सोपे उपाय :

मनामध्ये पुढच्या अनिश्चिततेचा विचार आला की त्याबद्दल सजग व्हा. यावर नेहमीप्रमाणे व्यक्त होऊ नका. थांबा आणि दीर्घ श्वास घ्या.

मनात आलेले विचार हे फक्त काळजीपोटी आहेत, हे स्वतःला सांगा. पण असा विचार करून काहीही फायदा होणार नाही, इतका विचार करणं गरजेचं नाही, असंही स्वतःला समजवा. मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. विचार म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती नाही.

असे विचार वा भावना सोडून द्या. त्या निघून जाऊ द्या. त्यांच्यावर व्यक्त होण्याची वा प्रतिसाद देण्याची गरज नाही. एका बुडबुड्यासारख्या वा ढगासारख्या तरंगत त्या दूर जात असल्याचं तुम्ही डोळ्यांसमोर आणा.

सध्या काय घडतंय ते पहा. कारण आताच्या घडीला तुमच्याबाबत सारंकाही ठीक आहे. स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. आजूबाजूला पहा. काय ऐकू येतंय, कशाला स्पर्श करता येतोय, कसला गंध येतोय याचं निरीक्षण करा. आणि मग स्वतःचं लक्ष इतर कशाकडे तरी वळवा. किंवा तुम्हाला आता काय काम पूर्ण करायचं, हातात काय होतं यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)