एकावेळी एकच काम करणं चांगलं की अष्टावधानी असणं?

जगलिंग

फोटो स्रोत, Roberto Ricciuti/getty

    • Author, विल्यम पार्क
    • Role, बीबीसी कॅपिटल

एकाच वेळी अनेक कामं करणाऱ्या व्यक्तीला अष्टावधानी म्हटलं जातं आणि एकाच वेळी एकाच कामात जीव ओतून काम करणाऱ्या व्यक्तीला एकाग्रचित्ती किंवा एकलक्ष्यी म्हटलं जातं. विज्ञान याबाबत काय सांगतं?

तुमचं व्यक्तिमत्त्व नेमकं कशाप्रकारचं आहे?

स्मार्टफोन्स आणि कम्प्युटरवर लागोपाठ येणारे मेसेज आपल्याला बिझी ठेवतात. पण अशी शक्यता आहे की यामुळे आपलं नुकसानच जास्त होतंय.

कारण प्रत्येक मेसेजनंतर आपल्याला असं वाटतं की ही कामाशी निगडीत बाब आहे, याचं उत्तर आपण द्यायला हवं. पण असं सतत कशाशी कनेक्ट असणं म्हणजे आपल्या हातात जे काम आहे त्यावर आपलं लक्ष्य नाही असं तर नाही ना?

ज्या कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करून घ्यायचं आहे, त्यांच्यासमोरही हीच समस्या आहे.

पण एक अशी व्यक्ती आहे जिला आपली सगळ्यांचीच काम करण्याची पद्धत बदलायची आहे. जर आपल्याला कार्यालयांमध्ये मोठा बदल घडवायचा असेल तर त्यासाठी कार्यपद्धती बदलायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे.

एखादी व्यक्ती कोणत्याही कंपनीसाठी किती महत्त्वाची आहे हे तिच्या कौशल्यांवरून नाही तर त्यांच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवरून ठरेल, असं ते म्हणतात.

फोकस करा

कॅल न्यूपोर्ट हे जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत आणि त्यांनी 'डीप वर्क एण्ड डिजिटल मिनिमलिजम' यासारखी बेस्टसेलर पुस्तकं लिहिली आहेत.

काम

फोटो स्रोत, Getty Images

आपली ऑफिसेस ही सुविधांनुसार तयार करण्यात आली असून आपल्या मेंदूने अधिक चांगल्या रीतीने काम करावं यासाठी कार्यालयांची रचना करण्यात येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

नॉलेज सेक्टरच्या नोकऱ्यांमध्ये मानवी बुद्धीच्या मदतीने काम होतं. तिथे सतत नेटवर्कशी कनेक्टेड असणं गरजेचं असतं आणि एकाचवेळी अनेक कामं हाताळावी लागतात.

पण या गोष्टी सखोल विचारांसाठी किंवा तत्पर विचारांसाठी या गोष्टी अनुकूल नाहीत.

न्यूपोर्ट म्हणतात, "बुद्धीशी निगडीत कामं करताना आपला मेंदू हा आपला सर्वांत मोठा स्रोत असतो. आणि नवीन विचार निर्माण करण्याची त्याची क्षमता असते. पण याचा फायदा आपण घेऊ शकत नाही."

काही लोक अनेक कामं एकाचवेळी करायचं ठरवतात. पण हे आपल्यालाही माहित आहे की एकाचवेळी एकापेक्षा जास्त गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं मेंदूसाठी कठीण असतं.

एकाच वेळी अनेक गोष्टी करणाऱ्या लोकांचं आपल्या मनावर असामान्य नियंत्रण असतं असं आधी मानसशास्त्रज्ञांना वाटत होतं.

पण असं नसल्याचं आता सिद्ध झालं आहे. अशी दैवी देणगी कोणाकडेही नसते. प्रत्यक्षामध्ये मल्टिटास्किंग करणारे (एकाच वेळी अनेक कामं करणारे) लोक डोकं लावून करायच्या कामांमध्ये मागे पडतात.

मर्यादित क्षमता

मानवी मेंदूची क्षमता मर्यादित असते. कोणत्याही वेळी मेंदू तितकंच काम करू शकतो.

हे काम करताना त्यावर इतर कामं ओतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याचाच धोका जास्त असतो.

काम

फोटो स्रोत, Getty Images

सतत नेटवर्कशी कनेक्टेड असणं आणि ताबडतोब उत्तराची अपेक्षा करणं यामुळे आयुष्य दयनीय होत असल्याचं न्यूपोर्ट म्हणतात.

"हे आपल्या मेंदूतल्या सामाजिक सर्किटशी जुळत नाही. कोणीतरी आपल्या उत्तराची वाट पाहत बसलेलं आहे, ही भावना आपल्याला आवडत नाही. यामुळे आपण बेचैन होतो."

ईमेल, स्लॅक किंवा इतर मेसेजिंग ऍप्सवर उत्तर देणं सोपं असतं. पण तसं करता आलं नाही तर आपल्याला अपराध्यासारखं वाटतं. शिवाय उत्तर देणं सोपं असल्याने आपल्याकडून उत्तराची अपेक्षा केली जाते.

न्यूपोर्ट यांच्या म्हणण्यानुसार यामुळे आपला मेंदू व्यग्र राहतो. "ईमेल आल्यानंतर आता नॉलेज क्षेत्रातील लोकांच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. यामुळे आपण उतावीळ होतोय."

"कामाच्या नसलेल्या गोष्टी मनातून काढून कशा टाकायच्या आणि कामाचं प्रमाण कमी कसं करायचं याचा विचार आपण करायला हवा."

एकाग्रता

सतत काम करत राहिल्याने वा कनेक्टेड राहिल्याने काय होऊ शकतं? तर अर्थातच - बर्नआऊट. (कार्यक्षमता संपून जाणं)

अशाप्रकारे काम करण्याला न्यूपोर्ट 'हायपर अॅक्टिव्ह हाईव्हमाइंड' (Hyperactive Hivemind) म्हणतात.

एकाग्रता

फोटो स्रोत, Getty Images

मेसेजिंग अॅप्सवर किंवा मिटिंगमध्ये होणारी वायफळ चर्चा आपल्या मेंदूतली गर्दी वाढवते.

न भरकटता काम करण्याची लोकांना संधी कशी देता येईल हाच न्यूपोर्ट यांच्या पुढच्या पुस्तकाचा - 'द वर्ल्ड विदाऊट इमेल'चा मुख्य विषय आहे.

त्यांच्या ही विचारसरणी लोकांना मोजकंच काम उत्तम पद्धतीने करण्याची परवानगी देते.

अनावश्यक बडबड कमी करणं महत्त्वाचं आहे. पण हे तेव्हाच करता येईल जेव्हा त्या ऑफिसमधली कामकाजाची पद्धत असं करण्याची मोकळीक त्या कर्मचाऱ्याला देईल.

काम कमी बडबड जास्त

न्यूपोर्ट यांच्यामते मॅनेजर पदावरील लोकांच्या कामातला 85 टक्के वेळ मिटिंग्जमध्ये किंवा फोनवर कामासंबंधी बोलण्यात जातो. पण मानवाचा मेंदू ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीशी हे विसंगत आहे. विषयामध्ये झालेला बदल थकवा आणतो. काही लोकांनी नो इ-मेल फ्रायडेसारखा उपाय करून पाहिला त्यामुळे फारसा फायदा झाला नाही. कारण एकमेकंना इ-मेल न करता काम करण्याची दुसरी कोणतीही प्रभावी पद्धत तयार झालेली नाही.

इ-मेलला पर्याय निर्माण झाल्याशिवाय त्यात सुधारणा होणार नाही. समोरासमोर संवाद साधणं हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं न्यूपोर्ट सांगतात.

एकावेळेस एकच काम

दुसऱ्या कामाला लागण्याआधीच पहिलं काम पूर्ण करण्याची गरज असते असं न्यूपोर्ट सांगतात.

जर तुम्ही सतत ई-मेल पाहात असाल किंवा आधीच्या कामाची आठवण तुम्हाला करून दिली जात असेल तर काम पूर्ण करणं अशक्य होईल. आपलं लक्ष थोडसं आधीच्या कामावर घुटमळत राहातं. तुम्ही जितके व्यग्र असतात तितकी काम बदलत जातातत. त्यामुळे व्यग्र राहिल्याने एकाग्रतेवर परिणाम होतो. एकदा लक्ष विचलित झाल्यावर पुन्हा एकाग्र होण्यासाठी लागणारा वेळ सरासरी 23 मिनिटे 15 सेकंदांचा अवधी लागतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)