वर्ल्ड कप 2019: कोहली, सेमी फायनल आणि डावखुरे बॉलर्स

फोटो स्रोत, Getty Images
डावखुरे वेगवान गोलंदाज कोहलीचा कच्चा दुवा आहे का? विराट कोहली हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं सगळ्यात बहुचर्चित नाव. जगभरात सगळीकडे, दर्जेदार बॉलिंगसमोर, जिवंत पिचेसवर, वनडे-ट्वेन्टी-टेस्ट अशा तिन्ही प्रकारात धावांची टांकसाळ उघडणारा कोहली टीम इंडियासाठी अक्षरक्ष: रनमशीन आहे. कोहलीचं धावा करण्यातलं आणि संघाला जिंकून देण्याचं सातत्य अचंबित करणारं आहे.
जागतिक क्रमवारीत टॉप 3 मध्ये विराजमान कोहलीला आऊट करणं हे प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी आहे. सेमी फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत कोहलीचं योगदान भारतासाठी निर्णायक ठरणार होतं. मात्र डावखुऱ्या ट्रेंट बोल्टच्या टप्पा पडून आत आलेल्या बॉलने घात केला.

फोटो स्रोत, Getty Images
लेग आणि मिडल स्टंप समोरून खेळणाऱ्या कोहलीने बोल्टविरुध्द शफल अर्थात ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला मात्र त्याआधीच बॉल कोहलीच्या पॅडवर जाऊन आदळला. कोहलीने एका धावेचं योगदान दिलं.
कोहली याआधीच्या तीन वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाविरुध्द आऊट झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2011 वर्ल्डकपमध्ये कोहली पाकिस्तानच्या वहाब रियाझची शिकार ठरला होता. त्यावेळी कोहलीने 9 धावा केल्या होत्या. 2015 वर्ल्डकपमध्ये कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनने आऊट केलं होतं. त्यावेळीही कोहलीने एका धावेची भर घातली होती.

फोटो स्रोत, Getty Images
न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने कोहलीच्या खेळातलं दुर्मीळ उणेपण टिपत अचूक टप्प्यावर बॉल टाकत त्याला आऊट केलं. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये कोहलीला मोहम्मद आमिर या डावखुऱ्या बॉलरनेच आऊट केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
कोहलीला वनडे करिअरमध्ये 27 वेळा डावखुऱ्या वेगवान बॉलरने आऊट केलं आहे. डावखुऱ्या स्पिन बॉलर्सनी कोहलीला 13 वेळा जाळ्यात अडकवलं आहे. उजव्या हाताने बॉलिंग करणाऱ्यांविरुध्द आऊट होण्याच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे मात्र डावखुऱ्या बॉलर्सची संख्याही मर्यादित असते हेही विसरून चालणार नाही. टीम इंडियाचं ट्रंप कार्ड असणाऱ्या कोहलीला रोखायचं असेल प्रतिस्पर्धी संघांना एक हुकूमी अस्त्र मिळालं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








