Christchurch Mosque : न्यूझीलंडः मशिदीतील गोळीबारात भारतीय वंशाचे 6 लोक मारले गेल्याची शक्यता

फोटो स्रोत, Reuters
न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च येथील मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात मृत पावलेल्यांची संख्या 49 झाली आहे. या हल्ल्यात भारतीय वंशाचे 6 नागरिक मारले गेल्याची शक्यता वर्तवली आहे. मृतांमध्ये पुण्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारताचे न्यूझीलंडमधील उच्चायुक्त संजीव कोहली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, प्रारंभी मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत 2 भारतीय आणि भारतीय वंशाचे 4 लोक मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्राइस्टचर्च हल्ल्यात आतापर्यंत
- 49 लोकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट
- 20 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी
- हल्ल्याला 28 वर्षांचा तरुण जबाबदार असल्याची माहिती
- आतापर्यंत 4 जण ताब्यात
ही माहिती अधिकृत नसून न्यूझीलंड सरकारनं अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही असंही त्यांनी सांगितलं.
संजीव कोहली म्हणाले, "भारतीय उच्चायुक्तालयाच्या हेल्पलाइनवर लोकांचे फोन येत आहेत. ही माहिती त्याच चौकशीतून आणि ख्राइस्टचर्चमधील भारतीय समुदायाकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे."
या सहा जणांमध्ये दोघेजण हैदराबादचे, एक गुजरातचा, एक नागरिक पुण्याचा असल्याचे कोहली यांनी सांगितले. ख्राइस्टचर्चमध्ये भारतीय वंशाचे जवळपास 30 हजार लोक राहातात.
न्यूझीलंडसाठी हा एक काळा दिवस ठरला आहे. या प्रकारच्या हिंसाचाराला देशात कोणतंही स्थान नाही. या हल्ल्यातील पीडितांच्या पाठिशी आम्ही आहोत," असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटलं आहे.
न्यूझीलंडचे पोलीस आयुक्त माईक बुश यांनी म्हटलं आहे की, "याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यात 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पण यामुळे धोका टळला, असं म्हणता येणार नाही."
या हल्लेखोरांमध्ये एक 28 वर्षांचा ऑस्ट्रेलियन नागरिक आहे, असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं आहे.
हल्लोखोराचा उल्लेख त्यांनी 'अतिउजव्या विचारां'चा व्यक्ती असा केला आहे.
"ही घटना आपल्याला सांगते की, वाईट लोक आपल्यामध्येच उपस्थित असतात आणि ते कधीही असे हल्ले घडवून आणू शकतात," असं त्यांनी म्हटलं आहे.
बांगलादेशची टीम बचावली
या गोळीबारात बांगलादेशची क्रिकेट टीम थोडक्यात बचावली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
बांगलादेशची क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. क्रिकेटपटू तामिम इक्बाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, हल्लेखोरांच्या गोळीबारातून आमची टीम सुखरुप बचावली आहे.
बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते जलाल युनूस यांच्या मते, "आमची जवळपास संपूर्ण टीम बसमध्ये होती आणि मशिदीच्या आत जाणार होती. पण तितक्यात आम्हाला मोठा आवाजा ऐकू आला आणि आम्ही आत जायचं टाळलं. सर्व खेळाडू सुखरुप आहेत. पण त्यांना याचा धक्का बसला आहे. आम्ही आमच्या संघाला हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला दिला आहे."
मशिदीच्या आत अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर या क्षेत्रात प्रवेश न करण्याची पोलिसांनी विनंती केली आहे. यामुळे परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्षदर्शी मोहान इब्राहिम यांनी New Zealand Heraldला सांगितलं की, "सुरुवातीला हा एक इलेक्ट्रिक शॉक आहे, असं आम्हाला वाटलं. पण नंतर लोक धावायला लागले. माझे काही मित्र अजूनही आत आहेत. मी माझ्या मित्रांना आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण मला काही प्रतिसाद मिळाला नाही. मला माझ्या मित्रांची काळजी वाटते."

फोटो स्रोत, Reuters
याच भागातील दुसऱ्या मशिदीचा परिसरही रिकामा करण्यात आल्याची माहिती आहे.
न्यूझीलंडची न्यूज वेबसाईट Stuff.nzनुसार, एका सरकारी प्रवक्त्यानं Canterbury District Health Board (CDHB)ला जखमींवर उपचारासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे.
हवामान बदलासंदर्भात कारवाईच्या मागणीसाठी Cathedral Square येथे हजारो विद्यार्थी एकत्र येत निदर्शन करणार होतो. आता हा परिसर रिकामा करण्यात आला आहे.
क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. असं असंल तरी धोक्याची घंटा अधिक आहे. रहिवाशांनी बाहेर न पडण्याचा पोलिसांनी सल्ला दिला आहे.

क्राइस्टचर्चच्या महापौर लियानेर डेलझीएल यांनी या घटनेवर म्हटलं आहे की, "शाळेतील विद्यार्थी सुरक्षित आहेत. या परिस्थितीत लोकांनी शांत राहणं खूप गरजेचं आहे. ही खूपच वाईट घटना आहे. आपण सर्वांनी एकत्र येत या घटनेला सामोरं जाणं गरजेचं आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








