'डेटिंग लीव्ह' : तिशीतल्या मुलींना चीनमध्ये जोडीदाराच्या शोधासाठी सुटी

चीनमध्ये एकट्या महिलांची संख्या वाढत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

कामाचा ताण,करिअरचा विचार यामध्ये स्वतःला द्यायला वेळच मिळत नाही आणि मग वयाच्या एका टप्प्यावर एकटेपणाची जाणीव व्हायला लागते. आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून चीनमधल्या काही कंपन्यांनी त्यांना जास्तीची सुटी देऊ केली आहे. तीसुद्धा योग्य जोडीदार शोधण्यासाठी.

अर्थात, या 'लव्ह लीव्ह'ची सवलत केवळ वयाच्या तिशीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठीच आहे.

चीनमध्ये चंद्राच्या कालगणनेवर आधारीत नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि अनेक जण सुट्टी टाकून आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्षाच्या स्वागताला तयार आहेत. या नवीन वर्षाला लागूनच तिशीतील 'सिंगल' महिलांना आठ दिवसाची जास्त सुटी दिली जात आहे. आपल्यावर प्रेम करणारी एखादी व्यक्ती या महिलांना शोधता यावी, हा या अतिरिक्त सुटीमागचा उद्देश आहे.

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'नं दिलेल्या वृत्तानुसार पूर्व चीनमधल्या हँग्झाऊमधील दोन कंपन्या त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुटी देत आहेत. 'मॉर्निंग पोस्ट'नं या सुटीला 'डेटिंग लीव्ह' म्हटलं आहे.

शहरातील एका शाळेनं अविवाहित शिक्षिकांना 'लव्ह लीव्ह' दिली होती. याच निर्णयाचं अनुकरण संबंधित कंपन्यांनीही केलं.

चीनमध्ये एकट्या महिलांची संख्या वाढत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

एकट्या मुलींची वाढती संख्या

हा निर्णय वरवर पाहता काहीसा गंमतीशीर वाटत असला, तरी त्यामागं चीनमधलं महिलांबाबतच सामाजिक वास्तवही दडलंय. चीनमध्ये साधारणतः पंचविशी ओलांडलेल्या मुलींकडे फारसं सन्मानं पाहिलं जात नाही. त्यांचा उल्लेख 'शेन्ग नु' किंवा 'उरल्या सुरल्या मुली' असा अपमानास्पद पद्धतीनं केला जातो.

आजकाल करिअरला प्राधान्य देण्याचं प्रमाण वाढत आहे. पण मुलींवर लग्नासाठी असणारा सामाजिक दबाव कायम आहे. शिवाय चीनमध्ये वृद्धांची वाढती लोकसंख्या आणि काम करण्यासाठी योग्य लोकसंख्येचं कमी होणारं प्रमाण हीदेखील सरकारची डोकेदुखी ठरत आहे. कदाचित यामुळेच मुलींना लग्नाला तयार करण्यासाठी ही कल्पना लढवण्यात आली असावी.

"Leftover Women" and "Betraying Big Brother: The Feminist Awakening in China" या पुस्तकांच्या लेखिका लेटा हॉन्ग फिंचर यांनादेखील काहीसं असंच वाटतं. 'लव्ह लीव्ह' ची कल्पना ही एका ठराविक वयानंतरही एकट्या राहणाऱ्या मुलींना लग्नासाठी तयार करण्याच्या चीनी सरकारच्या प्रचारतंत्राचाच एक भाग आहे, असं त्या म्हणतात.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "शिकलेल्या महिलांनी लग्न करून मुलांना जन्म द्यावा यासाठी सरकारकडून असे प्रयत्न करण्यात येत आहेत."

घसरत्या जन्मदराची चिंता

चीनमध्ये जन्मदर झपाट्यानं कमी होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

चीननं 2015 साली आपलं 'एक दाम्पत्य, एक मूल' धोरण रद्द केलं. मात्र त्यानंतरही चीनमधील जन्मदर सातत्यानं घसरत आहे. चीनमध्ये 2013 पासून विवाहाच्या दरातही घट झालीये.

2018 साली चीनमध्ये दीड कोटी बालकांचा जन्म झाला. 2017 च्या तुलनेत हा आकडा 20 लाखांनी घसरला होता.

हॉन्ग फिंचर यांनी सांगितलं, की चीनमध्ये असमान लिंग गुणोत्तर ही मोठीच समस्या बनली आहे. सरकारकडून मुलाच्या जन्मासाठी जी धोरणं आखली गेली, त्याचाच हा परिणाम.

"आता चीनमध्ये मुलींची संख्या खूप घटली आहे. सरकारी आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला चीनमध्ये पुरुषांची संख्या महिलांपेक्षा 3 कोटीनं जास्त आहे," फिंचर यांनी सांगितलं.

द चायनीज अॅकेडमी ऑफ सोशल सायन्सेसनं येत्या 50 वर्षांत चीनची लोकसंख्या 140 कोटींवरून 120 कोटींपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. वृद्ध लोकसंख्येचं प्रमाणही वाढत असल्यामुळं सरकारी खर्च तसंच सामाजिक कल्याण योजनांवर अतिरिक्त भार पडणार आहे.

चीनमध्ये एकट्या महिलांची संख्या वाढत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

जोडीदाराचा शोध

या समस्येवर उपाय शोधण्यासाठी महिलांना लव्ह लीव्ह देण्याचा पर्याय तर स्वीकारला गेलाय. पण आठ दिवसांत या महिला आपल्यासाठी योग्य जोडीदार शोधणार कसा आणि शोधलाच तर विवाहबद्ध होऊन मुलांना लगेच जन्म देणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

हँग्झाऊ सॉन्गचेंग परफॉर्मन्समध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या हुआन्ग ली यांनी म्हटलं, "अनेक महिला कर्मचाऱ्यांचा बाहेरच्या जगाशी फारसा संपर्कच उरलेला नसतो. त्यामुळेच आम्ही महिलांना अधिक सुटी देण्याचा विचार करत आहोत. जेणेकरून त्या बाहेर पडतील, त्यांना जास्त वेळ मिळेल आणि मित्रांशी त्यांचा संपर्क येईल."

कर्मचाऱ्यांना ही डेटिंग लीव्हची संकल्पना आवडल्याचंही ली यांनी आवर्जून नमूद केलं.

मात्र कंपन्यांनी घेतलेला हा पुढाकार कितपत परिणामकारक ठरेल याबद्दल त्यांच्याही मनात साशंकता आहे.

"जे प्रयोग केले जात आहेत आणि जी धोरणं राबवली जात आहेत, त्यांपैकीच हा पण एक प्रयत्न. मात्र महिलांना लग्न करून मुलं जन्माला घालायची कोणतीही घाई नसल्याचंच दिसतंय," ली यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)