मधुमेह : इन्सुलिनचा जगभरात तुटवडा, रुग्णांची काळजी वाढणार?

A woman infecting herself with insulin to treat type 1 diabetes

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मधुमेह म्हणजेच डायबिटीस... याला शहरी जीवनाची आपत्तीसुद्धा म्हणतात. धकाधकीची जीवनशैली आणि लठ्ठपणा यामुळे टाईप-2 डायबिटीसचं प्रमाण वाढताना दिसतंय.

रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी लागणारं इन्सुलीन शरीर निर्माण करू शकत नाही, त्याला टाईप-2 डायबिटिज असं म्हणतात.

जगभरातील डायबिटीस रुग्णांना येणारं दशकभर किंवा त्याहूनही अधिक काळ कदाचित इन्सुलिन मिळू शकणार नाही, असं आता शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

20 ते 79 वय असलेल्या जगभरातल्या जवळपास 40 कोटी लोकांना टाईप-2 डायबिटीस आहे. ज्यातले निम्मे चीन, भारत आणि अमेरिकेत आहेत. 2030 पर्यंत ही संख्या 50 कोटींच्या घरात पोहोचेल, असा अंदाज आहे.

टाईप-2 डायबिटीज हा या आजारातला सर्वांत जास्त आढळणारा प्रकार आहे. (डायबिटीसचा दुसरा प्रकार म्हणजे टाईप-1 डायबिटीज. यात शरीर आपल्याच इन्सुलिन निर्मिती करणाऱ्या स्वादुपिंडाच्या (पॅनक्रिअॅटिक) पेशी नष्ट करतो.)

Lencet Diabetes and Endocrinology या जर्नलमध्ये छापून आलेल्या नव्या संशोधनानुसार 2030 सालापर्यंत जवळपास 8 कोटी लोकांना इन्सुलिनची गरज भासणार आहे. तोपर्यंत या औषधाची मागणी 20 टक्क्यांनी वाढणार आहे.

Insulin injection

फोटो स्रोत, AFP

आताच जवळपास तीन कोटी तीन लाख रुग्ण इन्सुलिनपासून वंचित आहेत.

अमेरिकेत संशोधन करणारे स्टँडफोर्ड विद्यापीठातील डॉ. संजय बासू सांगतात, "रुग्णांना औषध मिळणं म्हणजे बाजारात ते सहज उपलब्ध असणं त्याच बरोबर ते परवणाऱ्या किंमतीत उपलब्ध असणं. औषधाच्या किंमतीसोबतीच योग्य पुरवठा साखळी असणंही गरजेचं आहे. औषधांची योग्य हाताळणी आणि त्यांचं सुरक्षित वितरण करू शकेल, अशी पुरवठा साखळी असणं गरजेचं आहे. शिवाय निर्जंतुकीकरण केलेल्या सुया आणि सिरींज यांचंही वितरण आवश्यक असतं."

या औषधाला विसाव्या शतकातलं "वंडर ड्रग म्हणजेच चमत्कारी औषधही" म्हटलं गेलंय. या औषधाचा शोध लागून 97 वर्षं झाली. इतकी वर्षं लोटूनही हे औषध इतकं महाग का आहे?

शास्त्रज्ञांच्या मते याचं एक कारण म्हणजे इन्सुलीनचा जागतिक बाजार 21 अब्ज डॉलर आहे. यात किंमतीसंदर्भात 99% तर साठ्यासंदर्भात 96% बाजारावर Novo Nordisk, Eli Lilly and Company आणि Sanofi या तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा दबदबा आहे. (अमेरिकेतील संपूर्ण बाजार याच तीन कंपन्यांच्या ताब्यात आहे.)

जागतिक नियंत्रण

जगातल्या 132 पैकी 90 देशांमध्ये इन्सुलिनवर कुठलंही शुल्क लागत नसलं तरी हे औषध महाग असण्याची बरीच कारणं आहेत. कर, भरमसाठ नफा आकारणं आणि पुरवठा साखळीतील खर्च यामुळे या औषधाची किंमत वाढली आहे आणि ती सामान्यांच्या खिशाला परवडणारी राहिलेली नाही.

अमेरिकेसारख्या देशात जिथं जवळपास दोन कोटी लोकांना मधुमेह आहे, त्यांचाही 2000 सालापासून 2010 पर्यंत इन्सुलिनवरचा खर्च 89 टक्क्यांनी वाढला आहे.

ज्यांनी आरोग्य विमा उतरवला आहे, त्यांच्यासाठीही हे औषध महागच आहे. या औषधाच्या एका बाटलीची किंमत 40 डॉलरवरून 130 डॉलरपर्यंत पोचली आहे. इन्सुलिनची एक बाटली जास्तीत जास्त दोन आठवडे पुरते.

Young person eating chips

फोटो स्रोत, Getty Images

या औषधाच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्हं आहेत.

इन्सुलिनचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची संख्या मर्यादित आहे, म्हणजेच इन्सुलीन बाजारावर मोजक्याच कंपन्यांचं जागतिक नियंत्रण आहे.

Geneva University Hospitals and University of Genevaचे डेव्हिड हेन्री बेरान म्हणतात, "मर्यादित कंपन्या असल्याने त्यांनी इन्सुलीनचे काही प्रकार बाजारातून काढून घेतले आहेत. परिणामी लोकांना ते घेत असलेल्या इन्सुलीनचा प्रकार बदलावा लागला आहे."

बाजारावर पाच प्रकारच्या इन्सुलीनचं वर्चस्व आहे. रुग्णाचा औषधाला प्रतिसाद, जीवनशैली, रुग्णाचं वय, रक्तशर्करा आणि रोज घ्यावी लागणारी इन्जेक्शन्स यावर रुग्णाला कोणत्या प्रकारचं इन्सुलीन द्यावं, हे डॉक्टर ठरवतात.

लघु आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या अनेक देशांमध्ये या औषधाचा पुरवठा बाधित होण्याची शक्यता जास्त आहे.

इन्सुलीनच्या उपलब्धतेवर एक अभ्यास करण्यात आला. त्यात सहा देशांमध्ये पुरवठा कमी असल्याचं आढळलं - बांगलादेश, ब्राझील, मालदिव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. याशिवाय ढिसाळ व्यवस्थापन आणि अकार्यक्षम वितरणामुळेदेखील पुरवठ्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ मोझांबिकमध्ये इन्सुलिनचा 77% साठा राजधानीच्या शहरातच राहतो. त्यामुळे देशाच्या इतर भागात त्याचा तुटवडा निर्माण होतो.

डॉ. बेरन सांगतात, "जगभरात इन्सुलिनची उपलब्धता आणि परवडणारे दर या समस्यांमुळे आयुष्यच धोक्यात आली आहेत आणि याने आरोग्याच्या अधिकाराच्या तत्वालाच आव्हान उभं केलं आहे."

medical assistant holds an insulin pen administered to diabetes patients at a private clinic in New Delhi on November 8, 2011

फोटो स्रोत, AFP

अशा परिस्थितीत जवळपास शंभर वर्षांपूर्वी शोधून काढलेलं हे औषध अजूनही कमी किंमतीत का उपलब्ध होत नाही? टोरंटो विद्यापीठाच्या ज्या शास्त्रज्ञांनी इन्सुलिनचा शोध लावला त्यांनी विद्यापीठाला या औषधाचं पेटंट 1 डॉलरला विकलं आणि ज्या औषधांची मागणी जास्त असते, सामान्यपणे त्यांच्या पेटंटची कालमर्यादा संपली की जेनेरिक औषध कंपन्यांशी म्हणजेच स्वस्त औषधं निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी स्पर्धा असल्याने ते सहज उपलब्ध होतात. मात्र इन्सुलिनबाबत असं घडलं नाही.

जेरेमी ए ग्रीन आणि केव्हीन रिग या शास्त्रज्ञांच्या मते इन्सुलीन जिवंत पेशींपासून तयार करतात. ही प्रक्रिया गुंतागुंतीची असते आणि तिची कॉपी करणं अवघड आहे, हे यामागचं एक कारण आहे.

स्वस्त औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना या औषधाचं उत्पादन "फायदेशीर" वाटत नाही, असंही ते सांगतात. इन्सुलिन सारखेच असणारे बायोसिमिलर इन्सुलिनही बाजारात उपलब्ध आहे. त्यांचे दर थोडे कमी आहेत. मात्र जेनेरिक औषधांइतके ते किफायतशीर नाहीत.

शास्त्रज्ञांच्या मते वैश्विक आरोग्य विमा पॅकेजमध्ये इन्सुलिनचा समावेश करायला हवा आणि मधुमेहासाठी निधी देणाऱ्यांनीही त्यांच्या निधीतला काही भाग या औषधांची हाताळणी आणि त्यांचं वितरण यात नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी द्यायला हवा.

कमकुवत आरोग्य यंत्रणा, आरोग्य सेवांची कमतरता, मधुमेहात घेण्यात येणारी काळजी आणि दर, या सर्वांमुळे इन्सुलिन उपलब्ध होण्याच्या मार्गात अडचणी निर्माण होतात, हे तर स्पष्ट आहे.

An Indian nurse (L) collects a blood sample from a policeman using a glucometer at a free diabetic health check-up camp on World Health Day in Hyderabad on April 7, 2016

फोटो स्रोत, AFP

डॉ. बासू म्हणतात, "दर आणि वितरण व्यवस्थेसाठीच्या पायाभूत सोयींसारख्या काही गोष्टी तर घडल्या पाहिजेत, तोपर्यंत तरी इन्सुलीन परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल, असं वाटत नाही."

डायबिटीस म्हणजे काय?

  • डायबिटीसचे दोन मुख्य प्रकार आहेत. टाईप-1 आणि टाईप-2.
  • याव्यतिरिक्त गर्भारपणात उद्भवणाऱ्या गेस्टेशनल डायबेटीससारखे आणखी काही प्रकारही आहेत.

टाईप 1 डायबिटीस

टाईप-1 या प्रकाराच्या डायबिटीसचं लहान वयातच निदान होतं. तसं ते वयाच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतं. यात इंजेक्शन किंवा पंपच्या मदतीनं इन्सुलिन दिलं जातं. या प्रकारचा डायबिटीस होण्यापासून रोखता येतो किंवा तो पूर्णपणे बराही करता येतो आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तो होत नाही.

टाईप 2 डायबिटीस

शरिरात तयार होणारं इन्सुलिन योग्य पद्धतीनं काम करत नाही किंवा पुरेशा प्रमाणात ते तयार होत नाही, त्याला टाईप-2 डायबिटीज म्हणतात.

लठ्ठपणा, आळशीवृत्ती किंवा कुटुंबात कुणाला असेल तर हा डायबेटीज होऊ शकतो. टाईप-1 पेक्षा हा जास्त प्रमाणात आढळतो. डायबिटीस असणाऱ्या जवळपास 90% लोकांना टाईप-2 डायबिटीस असतं. यातल्या काही रुग्णांना इन्सुलिन घ्यावं लागतं. तर काही केवळ औषधं, व्यायाम आणि सकस आहार याद्वारेच रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतात.

रक्तात साखरेचं प्रमाण सतत जास्त असेल तर मज्जातंतू, किंडनी, डोळ्यांवर परिणाम होणे किंवा फीट येणं अशा समस्या उद्भवू शकतात. मात्र योग्य उपचार आणि काळजी घेतली तर या प्रकारचा डायबिटीस होण्याची शक्यता कमी करता येते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)