चीनचा विकासाला ब्रेक; ट्रेडवॉर आणि कर्जांमुळे GDP घटला

2008च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर चीनची आर्थिक वाढ पहिल्यांदाच मंदावली आहे. चीनने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 6.5टक्के इतक्या विकासदराची नोंद केली आहे.

तिसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) सर्वांत कमी आर्थिक वाढ झाल्याचं, चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून आलं आहे.

रॉयटर्सने चीनचा जीडीपी 6.6टक्के, राहील असा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजापेक्षाही प्रत्यक्षातील विकासदर कमी झाला आहे.

अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या ट्रेड वॉरचे चीनच्या अर्थव्यवस्थेवर काही महिने परिणाम दिसतील, असं सांगितलं जात आहे.

शुक्रवारी प्रसिद्ध झालेली आकडेवारी लक्षात घेतली तर चीनची 2009च्या पहिल्या तिमाहीनंतरची ही सर्वांत खराब कामगिरी राहिली आहे.

याआधीच्या तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेने 6.7 टक्के वाढ नोंदवली आहे. त्यापेक्षा या तिमाहीचे आकडे कमी आहेत. पण चीन सरकारच्या वार्षिक अंदाजाइतकाच (6.5 टक्के) हा विकासदर आहे.

अर्थव्यवस्थेवर दोन्ही बाजूंनी संकटं

अमेरिकेबरोबरच्या ट्रेड वॉरची चीनने अपेक्षाच केली नव्हती, असं बीबीसी आशियाचा व्यापार प्रतिनिधी करिश्मा वासवाणी यांनी सांगितलं.

यावेळी चीनकडे जास्त पर्याय उपलब्ध नव्हते. सध्या अर्थव्यवस्थेवर कर्जाचा बोजा असल्याने आर्थिक पॅकेज देणं सरकारला परवडणारं नाही. 2008नंतरच्या आर्थिक संकटानंतर चीनने आर्थिक विकास सुरू ठेवण्यासाठी अनेक 'बेलआउट पॅकेज' जाहीर केले होते.

दुसऱ्या बाजुला चीनला अमेरिकेकडून नवीन आव्हानांना सामोर जावं लागतं आहे. अमेरिका आणि चीन या दोन जागतिक महासत्तांमधलं ट्रेड वॉर आता चांगलंच पेटलं आहे. अमेरिकेने चीनवर नव्याने 250 अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड रकमेचे निर्बंध लागू केले आहेत.

निर्यातीवर अवलंबून न राहता देशांतर्गत व्यापार वाढवून आर्थिक विकास घडवण्यासाठी चीन गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. त्याचवेळी GDP वाढीवर परिणाम न होऊ देता पायाभूत प्रकल्पांसाठी घेतलेले कर्ज आटोक्यात आणण्याचा चीन प्रयत्न करत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)