कोरियन युद्ध लवकरच संपेल; दक्षिण कोरियाचे मून यांचा आशावाद

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन

"उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धविरामाची घोषणा कोणत्याही वेळी होऊ शकेल," असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.

1953मध्ये उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध थांबलं. पण दोन्ही देशात त्याबद्दलचा शांतता करार कधीच झाला नाही.

मून जे-इन म्हणाले की, "उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांना अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी प्रेरित करणं यात अजूनही बरेच राजनैतिक अडथळे येण्याची भीती आहे."

किम 'प्रांजळ' आहेत, असंही मून जे-इन यांनी स्पष्ट केलं.

"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि किम यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी युरोपियन नेते मदत करतील, अशी आशा आहे," असं मून यांनी बीबीसीच्या लॉरा बिकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

मून यांनी गेल्या वर्षभरात किम यांची तीनदा भेट घेतली. तसंच, ट्रंप आणि किम यांच्यात मध्यस्थाची भूमिकाही त्यांनी पार पाडली.

युद्धजन्य स्थिती कधी संपेल?

युद्धविरामासंबंधी ट्रंप आणि अमेरिकेच्या सरकारी अधिकाऱ्यांशी भरपूर चर्चा केली आहे, असं मून यांनी म्हटलं आहे.

उत्तर कोरियानं ठोस पावलं उचलल्यास युद्धविरामाच्या घोषणामुळे हे प्योंगयांग आणि वॉशिंग्टन यांच्यातली शत्रुत्वाची भावना संपुष्टात येईल.

लवकरात लवकर हे व्हावं आणि सेऊल आणि वॉशिंग्टन यांनी याचं महत्त्व समजून घ्यावं, अशी इच्छा असल्याचं मून म्हणाले.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन

फोटो स्रोत, Getty Images

प्योंगयांग दौऱ्यावर असताना उत्तर कोरियात भाषण करणारे मून हे पहिले दक्षिण कोरियाई नेते ठरले आहेत.

Arirang Gamesमधल्या त्यांच्या भाषणानंतर त्यांना 1 लाख 50 हजार श्रोत्यांनी उभं राहून मानवंदना दिली.

"खरं तर भाषण करताना मी थोडा अस्वस्थ होतो. मला अण्वस्त्रमुक्त होण्याचं महत्त्व उत्तर कोरियाच्या लोकांना पटवून द्यायचं होतं. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवायचा होता. कोरियन जनता आणि जगालाही मला या भाषणातून समाधान द्यायचं होतं. त्यामुळे ते भाषण करणं ही माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती."

माझ्या भाषणावर किम यांच्याकडून कोणतंही बंधन लादण्यात आलं नव्हतं, असंही मून यांनी स्पष्ट केलं आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन

"मी काय बोलणार आहे हे भाषणापूर्वी त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. उत्तर कोरियात सध्या घडत असलेल्या बदलांचं हे एक उदाहरण आहे."

या दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी मी दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष झालो आहे. युद्धामुळे होणारं दु:ख मी समजू शकतो," असंही मून यांनी म्हटलं आहे.

1953मध्ये मून यांच्या पालकांनी उत्तर कोरिया सोडलं आणि त्यानंतर ते कधीही उत्तर कोरियात परतले नाहीत.

कोरिय युद्ध

जून 1950मध्ये कम्युनिस्ट नॉर्थच्या 75000 जवानांच्या तुकडीने प्रसिद्ध अशा 38parallelच्या प्रदेशात उत्तर आणि दक्षिण कोरियादरम्यानच्या सीमीरेषेनजीक आक्रमणाने सुरुवात केली. 

पुढच्या काही महिन्यात अमेरिकेच्या फौजा दक्षिणेकडून शिरल्या आणि त्यांनी चीन, रशिया यांचा पाठिंबा असलेल्या उत्तर कोरियाच्या सैन्याला पिछाडीवर ढकललं. 

शेवटी 1953मध्ये दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर US आणि उत्तर कोरियाकडून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पण दक्षिण कोरियानं त्यावर सह्या केल्या नाहीत.

या युद्धात 50 लाखांवर लोकांचा बळी गेला होता.

दोन देशांत काय घडलं?

जून महिन्यात ट्रंप आणि किम यांची सिंगापूर येथे भेट झाली होती. तेव्हा किम यांनी अण्वस्त्र नष्ट करण्यास सज्ज असल्याचं म्हटलं होतं, पण प्रत्यक्षात आतापर्यंत खूप कमी अण्वस्त्र तळ नष्ट करण्यात आले आहेत.

यातून मार्ग काढण्यासाठी मून यांनी सप्टेंबर महिन्यात प्योंगयांगला भेट दिली होती.

मून जे-इन आणि डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मून जे-इन आणि डोनाल्ड ट्रंप

Tongchang-ri हा देशातला एक मुख्य अण्वस्त्र तळ नष्ट करण्याचं किम यांनी मान्य केलं आहे, असं त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना या मोहिमेची माहिती दिली जाईल, त्यांना त्याची खात्री करता येईल, असं उत्तर कोरियानं स्पष्ट केलं.

दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आणि उत्तर कोरियाचे लष्कर प्रमुख यांनी लष्करातील तणाव कमी करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यासाठी सीमाभागात बफर झोनची निर्मिती करण्यात आली आहे. जेणेकरून संघर्षाला आळा बसेल.

अमेरिकेची भूमिका काय?

उत्तर कोरियानं अण्वस्त्रमुक्तीसाठी सक्रिय पावलं उचलावी, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी रविवारी चौथ्यांदा उत्तर कोरियाला भेट दिली आणि किम यांच्याशी चर्चा केली.

"अजून बराच पल्ला गाठायचा असला आणि खूप काम बाकी असलं तरी ध्येय गाठण्याच्या मार्गावर आम्ही चालणं सुरू केलं आहे. यामुळे उत्तर कोरिया संपूर्णरित्या अण्वस्त्रमुक्त होईल," असं मंगळवारी त्यांनी व्हाईट हाऊस येथे सांगितलं.

किम जाँग-उन

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर कोरियाच्या दोन अण्वस्त्र तळांवर आंतरराष्ट्रीय समीक्षक लवकरच पोहोचणार आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांनंतर ट्रंप आणि किम यांची दुसरी भेट होणार आहे. ट्रंप यांनीही गेल्या आठवड्यात या गोष्टीस दुजोरा दिला आहे.

"माझं आणि किम यांच्यातील नातं खूप चांगलं आहे," असं ट्रंप यांनी अनेकदा म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)