ट्रेड वॉर पेटलं : अमेरिकेने लादले चीनवर 200 अब्ज डॉलर्सचे कठोर निर्बंध

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिका आणि चीन या दोन जागतिक महासत्तांमधलं ट्रेड वॉर आता चांगलंच पेटलं आहे. अमेरिकेने नव्याने चीनवर 200 अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड रकमेचे निर्बंध लागू केले आहेत.
हे आयात शुल्क 5000हून अधिक वस्तूंवर लागू होणार आहेत. अमेरिकेकडून आतापर्यंत लादण्यात आलेले हे सर्वाधिक मूल्याचे निर्बंध आहेत.
हँडबॅग्स, तांदूळ, कपडे यांच्यावरही हा कर असणार आहे. मात्र स्मार्टवॉच आणि प्ले पेनसारख्या वस्तूंवर सूट देण्यात आली आहे. मात्र लवकरच यांच्यावरही हे शुल्क लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या निर्बंधांविरोधात बंड करू, असा निर्वाणीचा इशारा चीनने याआधीच दिला होता. त्यामुळे अमेरिकेकडून लागू झालेल्या नव्या निर्बंधांमुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.
24 सप्टेंबरपासून नवे निर्बंध लागू होतील. अमेरिका आणि चीन यांच्यात काही सन्मान्य तोडगा निघाला नाही तर 10 टक्क्यांपासून सुरू होणारे हे कर 25 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
व्यापारविनिमयादरम्यानच्या चीनच्या अयोग्य कार्यपद्धतीमुळे अमेरिका चीनवर नवे निर्बंध लागू करत असल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.
"काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये परदेशी कंपन्यांना स्थानिक भागीदार सामील करण्याची अट आहे. असे जाचक नियम बदलण्यासंदर्भात आम्ही चीनला सूचना केली होती. चीनला नियमात बदल करण्यासाठी पुरेशी संधी आम्ही दिली होती. मात्र त्यांनी कुठलाही नियम बदलण्याची तयारी दर्शविली नाही," असं ट्रंप म्हणाले.
नव्या निर्बंधांविरोधात बंड पुकारल्यास चीनवर तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आणखी कठोर निर्बंध लादले जातील, असंही ते पुढे म्हणाले. सोबतच, आयात शुल्काची रक्कम 267 अब्ज डॉलर्स एवढी होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गेल्याच महिन्यात अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 34 अब्ज डॉलर्स एवढं प्रचंड आयात शुल्क लागू केलं होतं. दुसऱ्या टप्प्यात 16 अब्ज डॉलर्स रकमेच्या वस्तूंवर 25 टक्के कर आकारण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
चीनवर लादण्यात आलेल्या शुल्कामुळे वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ होणार असल्याची भीती अमेरिकेच्या कंपन्यांनी व्यक्त केली आहे. नोकऱ्यांमध्ये कपात होण्याची भीती कंपन्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेने नव्याने निर्बंध लादल्यास चीनकडून प्रत्युत्तर दिलं जाईल, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी आधीच म्हटलं होतं. या व्यापारी युद्धाने कुणाचाही काहीही फायदा होणार नाही. व्यापारसंदर्भातील गोष्टी चर्चेच्या माध्यमातून सोडवणं योग्य ठरेल. एकमेकांवर विश्वास ठेऊन वाटचाल करणं आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








