You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी गुलाम आहे, निराधार आहे, म्हणून ते माझा उपभोग घ्यायचे'
- Author, मेघा मोहन
- Role, बीबीसी स्टोरीज
युनायटेड किंगडम (UK) मधल्या काही स्त्रिया लैंगिक अत्याचाराबद्दल अवाक्षरही काढू शकत नाहीत.
लैंगिक अत्याचारापासून सुटका व्हावी म्हणून त्या मायदेशातून पळून UKमध्ये आल्या. पण इथे येऊनही त्यांची अत्याचारापासून सुटका झाली नाही. हद्दपार होण्याची भीती मनात कायम असल्याने मग पोलिसांनाही काही सांगायचं नाही, हे या स्त्रियांनी पचनी पाडून घेतलं होतं.
ग्रेस 37 वर्षांची आहे. आजवर शारीरिक संबंध ठेवताना ग्रेसला कुणीच तिची इच्छा विचारलेली नाही.
"हे सारं भोगणारी मी एकटीच नाही. माझ्यासारख्या अनेक आहेत," हे सांगताना ग्रेसनं शेजारच्या भिंतीपलीकडे बसलेल्या तिच्यासारख्या इतर स्त्रियांकडे बोट दाखवलं.
"आम्ही UKमधल्या सर्वांत निराधार आणि असुरक्षित बायका आहोत."
ग्रेसला जे आयुष्य ओळखीचं आहे ते असंच आहे. ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांचा उपभोग घेतला जातोच, हेच तिनं आजवर अनुभवलं आहे.
सतरा वर्षांची ग्रेस 1998 मध्ये लंडनमध्ये आली. तिचा जन्म पश्चिम आफ्रिकेतला. नेमका कोणत्या देशातला ते तिनं सांगितलं नाही. उघड केलं तर तिच्या नातेवाईकांना त्रास होईल याची भीती होती.
"मी फार गरीब कुटुंबातली आहे. घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं," ती सांगत होती.
पंधरा वर्षांची ग्रेस आणि सतरा वर्षांची तिची मोठी बहीण. केवळ हुंड्यासाठी घरच्यांनी या दोघींचं लग्न त्यांच्या वडिलांहून मोठ्या वयाच्या माणसाशी लावून दिलं. दोघी बहिणी त्या म्हाताऱ्याच्या आधीच्या पाच बायकांबरोबर त्याच्या टोलेजंग घरात राहू लागल्या.
आता पोटाची चिंता नव्हती. रोजच्या जेवणाची सोय झाली होती. मात्र जेवण सोडून बाकी सगळ्या गोष्टी थरकाप उडवणाऱ्या होत्या.
"फार भयानक दिवस होते ते. खूप खूप हाल झाले आमचे," तिचा छळ शब्दांत सांगता येणार नव्हता.
दोघी बहिणींना सातत्यानं शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं. नवऱ्याकडून लैंगिक अत्याचार, शिव्याशाप रोजच व्हायचा. दोघींना भयानक विधींमध्ये सहभागी व्हावं लागायचं. नवऱ्याची अंधश्रद्धा होती की त्याच्या बायकांनी जनावरांचं रक्त प्यायलं तर त्याचं राजकीय भविष्य भरभराटीचं होईल. तो म्हणेल ते या दोघींना करावं लागायचं.
दोघींना एकमेकांचाच आधार होता. इतर कुणाकडेही अवाक्षर काढलं तर खैर नव्हती. घरच्यांना त्रास होईल याची टांगती तलवार सतत लटकत असायची.
"आमचा नवरा समाजात खूप शक्तिशाली होता," ग्रेस सांगत होती.
नवऱ्यापासून सुटका पण...
लग्नानंतर दोन वर्षं गेली. आता हा छळ दोघी बहिणींना सहन होण्यापलीकडे चालला होता. धीर करून त्यांनी मन मोकळं करायचं ठरवलं. त्या एका काकाशी बोलल्या. त्यानं दोघींना देशाबाहेर जाण्यासाठी मदत करायचं आश्वासन दिलं. दोघी पळून गेल्या असं सगळे समजतील, कुणी त्यांना मदत केलीये, असा संशय येणार नाही, इतर कोणाला त्रास होणार नाही, असं म्हणून काकानं दोघींची समजून घातली.
काकानं थोडक्या काळासाठी राहण्याच्या व्हिसाची सोय केली. दोघींना विमानतळावर नेलं आणि तिथे त्यांच्या हातावर लंडनचं तिकीट ठेवलं.
लंडनमध्ये माझ्या एका मित्राला मी सांगून ठेवलं आहे. तो तुम्हा दोघींना घ्यायला हिथ्रो विमानतळावर येईल, असं काकानं त्या दोघींना सांगितलं.
"लंडनला पोहोचल्यावर विमानतळावर एक माणूस दोघी बहिणींच्या नावांचं फलक हातात धरून वाट बघत उभा होता. तो भयानक आजारी दिसत होता," ग्रेस सांगतात.
काकाच्या या मित्राला कर्करोग झाला होता. त्यानं हे सगळ्यांपासून लपवलं होतं कारण त्याला या दोघी बहिणींना मदत करायची होती, त्याच्या मित्राला मदत करायची होती. या दोघींना त्यानं आसरा दिला.
लंडनला पोहोचली तेव्हा ग्रेस होती 17 वर्षांची आणि तिची मोठी बहीण 19 वर्षांची. या माणसानं दोघींना सांगितलं की त्याचा कर्करोग शेवटच्या टप्प्यातला आहे. त्याच्याकडे फार पैसे नव्हते. तो गेल्यानंतर दोघी निराधार होणार होत्या. त्यानं सांगितलं की तो दोघींची तिथल्या चर्चमधल्या बाकीच्या मित्रांशी गाठ घालून देईल. पश्चिम आफ्रिकेमधून स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तींशी ओळख करून देईल. त्यांच्याकडून राहायची-खायची सोय होऊ शकेल.
दोघी बहिणी लंडनला पोहोचल्यानंतर तीनच आठवड्यांत काकाच्या या मित्राचा मृत्यू झाला. तो म्हणाला होता अगदी तसंच झालं. लंडनमध्ये दोघींना काम करण्याचा परवाना नसल्यानं, चर्चमध्ये ओळख झालेल्या लोकांवर अवलंबून राहण्याशिवाय काही पर्यायच नव्हता.
पुन्हा उघड्यावर
"या देशात स्थलांतरित झालेली कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यांना घरकाम करायला आणि मुलांना सांभाळायला कोणीतरी हवंच असतं," ग्रेस सांगत होती. "मी आणि माझी बहीण अशा वेगवेगळ्या कुटुंबात राहू लागलो. आम्ही या कुटुंबांवर पूर्णपणे अवलंबून होतो. जेवण, कपडे, अशा प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी."
ग्रेसला राहायला स्वतःची खोली नव्हती. ती सोफ्यावर झोपायची. घरातले सगळे दिवस संपवून आपापल्या खोल्यांमध्ये गेले की मग तिला सोफ्यावरची जागा मिळायची. इतरांना तिचा त्रास होऊ नये, याची सतत काळजी घ्यावी लागायची.
ती किती उघड्यावर पडली होती हे तिला लवकरच समजलं.
'ती ज्यांच्या घरात राहायची, त्या कुटुंबातला पुरुष रात्री-बेरात्री कधीही तिच्याजवळ यायचे. शारीरिक उपभोग घ्यायचे. त्याला माहीत होतं मी निराधार आहे, मला जायला एकही जागा नाही. मला तेव्हा कायदेशीर बाबींबद्दल काहीही माहीत नव्हतं. मला पोलिसांकडे जाणं शक्य नव्हतं, कारण ते मला देशातून हद्दपार करतील याची भीती होती. तो मला धमकवायचा - 'जा, जाऊन सांगणार आहेस? कोणाला?'"
"मला हे सगळं त्याच्या बायकोलाही सांगता आलं नाही. जर तिचा विश्वास बसला नाही आणि तिनं मला घराबाहेर काढलं तर... मग मी जाऊ तरी कुठे? खिडकीबाहेर पाहिलं की लंडन थंडीत थिजलेलं दिसायचं. मी काहीच करू शकत नाही, याची मला नव्यानं जाणीव व्हायची."
ग्रेसची बहीणही अशाच दिव्यातून जात होती. दोघी पुन्हा अडकल्या होत्या.
त्या घरातली मुलं शाळेत जाऊ लागल्यावर त्या कुटुंबानं ग्रेसला सांगितलं की आता तिची गरज नाही. तिनं आपलं चंबुगबाळं उचलावं आणि चालतं व्हावं. चर्चमधल्या आणि कोणाकडून आसरा मिळेपर्यंत ग्रेस मिळेल ते खात होती आणि रात्री बागेत किंवा बसमध्ये झोपत होती.
UK मधल्या एकूण वीस वर्षांच्या वास्तव्यात, ग्रेस खंडीभर कुटुंबांमध्ये राहिली आहे. प्रत्येक ठिकाणी लैंगिक शोषणाला बळी पडली आहे.
"मी गुलाम आहे. कोण मदत करणार मला?"
"जमिनीवर, सोफ्यावर, जागा मिळेल तिथे झोपले. ज्या कुटुंबात मी राहायचे, तिथे कुणी पुरुष पाहुणे आले असतील तर ते त्रास द्यायचे. नको तिथे हात लावायचे... कधी त्याहून पुढे जायचे."
"रात्र झाली की मी जिथे झोपले असेन ती जागा काहीतरी अडथळा लावून सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायचे. कपाटं दाराजवळ लाऊन कुणीच आत येऊ शकणार नाही, असं बघायचे. कधी त्याचा उपयोग व्हायचा, कधी नाही. सकाळ झाली की ही पुरुष मंडळी त्यांच्या बायका-मुलांसमोर अशी वागायची की जसं रात्री काही घडलच नाही."
"शारीरिक अत्याचाराचे प्रसंग एखाद-दोन कुटुंबांसोबत राहताना आले, असं नाही... अनेक वेळा, अनेक कुटुंबांबरोबर हेच अनुभव आले."
2008 मध्ये ग्रेसला अजून एका भीषण प्रसंगाला सामोरं जावं लागलं.
ग्रेसच्या बहिणीला इंटरनेट चॅटरूममध्ये कोणीतरी भेटलं. ती त्या माणसाला भेटायला गेली. परत आलीच नाही!
"मी अक्षरशः नर्कात होते."
ग्रेसनं रुग्णालयांमध्ये चौकशी केली, ज्या मित्रमैत्रिणींकडे राहण्याचा वैध परवाना होता, त्यांना विनंती करून पोलिसात हरवलेल्या व्यक्तीची तक्रार देऊन पाहिलं. कुठेच, काहीच माहिती हाती लागेना. अशीच दहा वर्षं सरली. ग्रेसच्या बहिणीचा कुणालाही काहीच थांगपत्ता नाही.
ग्रेस आता पुरती एकाकी झाली होती. अजूनही तिची या कुटुंबातून त्या कुटुंबात ससेहोलपट चालूच होती. चर्चच्या ओळखीतून कोणी ना कोणी तिला कामाला ठेवून घेत होतं. पण पाच वर्षांपूर्वी अशी वेळ आली की तिला काम मिळेना.
"मी बेघर झाले होते. कित्येक आठवडे मी बागेतल्या बाकांवर झोपत होते. तिथे फारच भीती वाटली तर रात्रभर बसमध्ये बसून असायचे. दिवसेंदिवस भीक मागायचे नाहीतर ग्रंथालयांमध्ये, बागांमध्ये जाऊन बसायचे."
असे दिवस ढकलत असताना, एक दिवस मात्र चमत्कार घडला.
बागेत बसलेली असताना एक मनुष्य माझ्यापाशी आला. आम्ही इथे नव्यानं आलो होतो तेव्हा त्याच्याशी ओळख झाल्याचं मला आठवत होतं. तो म्हणाला, "तुझं आता वय झालं ग्रेस."
"हं. माहीत आहे."
"तुला मदत मिळू शकते ग्रेस."
"मी गुलाम आहे, निराधार आहे. मला कोण मदत करणार?"
तो म्हणाला, "काही जागा आहेत, काही व्यक्ती आहेत, त्या तुला मदत करू शकतात. मी तुला घेऊन जाईन."
तो मला मध्य लंडनमधल्या एका निर्वासित केंद्रात घेऊन गेला. तिथल्या लोकांनी माझी कहाणी काळजीपूर्वक ऐकून घेतली. मला मदत करायचं आश्वासनही दिलं.
तो ऑक्टोबर महिना होता. मला आठवतंय, गोठवणारी थंडी होती. आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या, साधारण 35 सहारा आफ्रिकन लोकांसमोर मारचू गिरमा बोलत होत्या. त्यात एक ग्रेसही होती. ग्रेससारख्या आश्रितांबाबतच्या परिस्थितीबद्दल सध्या जगभरात चर्चा सुरू आहे, असं गिरमा म्हणाल्या.
त्यावेळी अमेरिकेत, हॉलिवुड निर्माता हार्वी वाइनस्टीन विरोधात हॉलिवुडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री आवाज उठवत होत्या. या बातमीनं सोशल मिडीया आणि रेडिओ-टिव्हीवरच्या बातम्यांयावर एकाचवेळी खळबळ उडवली होती. या विषयाची चर्चा घरोघरी व्हायला लागली होती. हजारों स्त्रिया, हर तऱ्हेच्या क्षेत्रांमधल्या स्त्रिया, लैंगिक अत्याचार आणि छळाविषयी बोलू लागल्या होत्या.
त्यासाठी #MeToo या हॅशटॅगचा वापर होत होता.
"ज्या क्षणी मी त्या खोलीतल्या स्त्रियांना #MeToo विषयी सांगितलं, तो क्षण मला लख्खं आठवतो. सगळ्यांना एकाच वेळी लक्षात आलं की त्या एकट्या नव्हत्या. हे सारं भोगणाऱ्या त्या एकट्या नव्हत्या," गिरमा म्हणाल्या. "सगळ्यांनाच जाणीव झाली की गोऱ्या, प्रभावी, प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या स्त्रियांनाही लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावं लागलं आहे. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांनी त्याबदद्ल अवाक्षर काढू नये, लाज वाटून घ्यावी, हा गैरसमज दूर झाला."
UKमध्ये आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या एका छोट्या संस्थेच्या गिरमा अध्यक्ष आहेत. त्या अकरा वर्षांच्या असताना आश्रय घेण्यासाठीच्या प्रक्रियेतून गेलेल्या आहेत.
"सांगोवांगी माहिती मिळत या बायका आमच्यापर्यंत पोहोचतात," गिरमा सांगत होत्या. "चर्च, डिटेंशन सेंटर्स, सेवाभावी संस्थांमधून बायकांना आमच्याबद्दल माहिती मिळते. आमच्याकडे येणाऱ्या सर्व स्त्रिया आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या व्यवस्थेचा भाग बनतात. कायदेशीर प्रक्रियेचा भाग बनतात. त्यांना त्यांच्यासारख्यांची साथ हवी असते."
आठवड्यातून एकदा या स्त्रिया सल्ला मागायला, जेवायला एकत्र येतात. इंग्लिश, कलाकुसर वर्ग, नाटक, सक्षमीकरण उपक्रमांच्या निमित्तानं भेटतात. अशाच एका सक्षमीकर वर्गाला गिरमा यांनी पहिल्यांदा #MeToo चळवळीबद्दल माहिती दिली.
त्यानंतर, आयुष्यात पहिल्यांदाच, या स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल वाच्यता केली. लैगिक अत्याचारांपासून पळ कढण्यासाठी त्या आपला देश सोडून इथे आल्या पण युकेमध्येही त्यांची लैंगिक अत्याचारांपासून सुटका झालीच नाही.
अत्याचाराच्या आगीतून निघून फुफाट्यात अडकल्या
एका स्त्रीनं सांगितलं की ती घरसफाईच्या कामाला गेलेली असताना ग्राहकानं फर्मान सोडलं होतं की काम सुरू करण्यापूर्वी तिने आपली अंडरवेयर काढावी. ग्रेससारख्या स्त्रियांना लैंगिक अत्याचारांना सतत तोंड द्यावं लागलं - तेही राहत्या घरांमध्ये.
"या आश्रय प्रक्रियेत त्रुटी आहेत. ज्या व्यक्तींवर अत्याचार होतो, त्यांना या प्रक्रियेत मदत मिळतच नाही," गिरमा सांगतात. "तुम्हाला जर कायदेशीर दर्जाच नसेल तर कायद्याच्या नजरेतून तुम्ही कुणीच नसता. तुम्ही माणूसच नसता."
"या स्त्रियांनी दीर्घ काळ शारीरिक, लैंगिक अत्याचार सहन केले आहेत. त्या लैंगिक अत्याचाराच्या आगीतून निघून फुफाट्यात येऊन अडकल्या आहेत. ज्यांनी कायदेशीर आश्रयासाठी अद्याप अर्ज दिला नाही, अशांची परिस्थिती अधिकच बिकट आहे," गिरमा सांगतात.
"पोलीस आणि UK स्थलांतरण अधिकारी यांमध्ये माहितीची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे अशा परिस्थितीत पोलिसात जाऊन तक्रार करणाऱ्या बाईला डिटेनशन सेंटरमध्ये पाठवलं जातं किंवा थेट त्या ज्या देशातून आलेल्या असतात त्या देशात पाठवलं जातं."
"जो नरक सोडून त्या जीव वाचवून इथे आलेल्या असतात तिथेच त्या बाईची रवानगी केली जाते. सध्याची व्यवस्था स्त्रियांना लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यापासून परावृत्त करते आणि हे अत्याचार करणाऱ्यांना पक्कं माहीत असतं," गिरमा सांगतात.
ऑक्सफर्ड मायग्रेशन ऑब्जर्वेटरीनुसार, युकेमध्ये शेकडो-हजारो बेकायदेशीर स्थलांतरित आहेत. कायदेशीर आश्रयासाठी अर्ज दिलेल्या स्त्रियांनासुद्धा त्यांच्या सुरक्षेचा भरवसा नाही. त्यामुळे अशा प्रसंगात पोलिसांकडे जाण्याचं प्रमाण नगण्य आहे, असं गिरमा यांचं म्हणणं आहे.
ग्रेसची मैत्रीण यानेल. दहा वर्षं होऊन गेली तरी तो अनुभव यानेलला विसरता येत नाही.
पश्चिम आफ्रिकेतल्या एका अराजक माजलेल्या देशात पोलिसांनी यानेलला पकडून नेलं आणि बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
यानेलला सोडल्यानंतर, एका राजकीय पक्षातल्या काही ओळखीच्या लोकांनी तिला लंडनमध्ये यायला मदत केली. सुरुवातीला ओळखीच्यांकडे आणि मग स्थानिक चर्चमधे ओळख झालेल्या कुटुंबात ती राहू लागली.
ग्रेससारखीच यानेलची कथा. डोक्यावर छप्पर आणि खायला अन्न याबदल्यात घरातल्या लहान मुलांची काळची आणि साफसफाई.
तिनं लंडनला आल्यावर लगेचच कायदेशीर आश्रयासाठी अर्ज दाखल केला. चुकीचा कायदेशीर सल्ला मिळाल्यानं तिचा पहिला अर्ज नाकारला गेला. "ग्रेसपेक्षा यानेल नशीबवान होती," गिरमा सांगत होती.
तिच्या घरमालकानं तिला नको तिथे स्पर्श केला असेल पण शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली नाही.
कुणाला सांगण्याचा, तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता. तोंड उघडलं तर आलो तिथेच परत पोहोचण्याची भीती होती. अत्याचार करणाराच धमकवायचा, 'जाशील कुठे? सांगशील कोणाला?'
यानेलनं मग स्वतःलाच समजावलं, की हा शारीरिक अत्याचार नाही. नुसता थोडा त्रास आहे.
ग्रेससारखंच यानेलनंही अनेक ठिकाणी काम केलं. एकाहून एक वाईट अनुभव गाठीला बांधले.
ऑक्टोबरमध्ये ग्रेस आणि यनेल भेटल्यावर गिरमा यांनी जेव्हा #MeToo चळवळीबद्दल सांगितलं, हॉलिवुडमधल्या अभिनेत्री याबद्दल आवाज उठवताहेत हे सांगितलं, तेव्हा त्यांना त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव झाली.
कोणत्याही पुरुषानं स्त्रीच्या सहमतीशिवाय तिच्या शरीराला स्पर्श करणं, हे किरकोळ म्हणून दुर्लक्ष करण्यासारखं नाही, याचीही उमज आली.
"आमच्यावर होणाऱ्या अत्याचारांविषयी आम्ही #MeToo आधी कधीच बोललो नाही. आम्ही ज्या वातावरणात वाढलो, तिथे अशा गोष्टी उघडपणे बोलल्या जात नाहीत. पण आम्ही जेव्हा या महत्त्वाच्या, प्रभावी स्त्रियांना उघडपणे बोलताना ऐकलं, तेव्हा आम्हाला समजलं की आमचे अनुभव किरकोळ नाही तर शारीरिक अत्याचार होते," यानेल म्हणाली.
"ही आत्ताची वेळ फार महत्त्वाची आहे. जगात मूलभूत बदल घडू शकतो. हा बदल आपल्यातल्या सर्वांत अक्षम स्त्रीपर्यंत पोहोचायला हवा," मारचू गिरमा सांगत होत्या.
"त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवला पाहिजे. ग्रेस आणि यानेलसारख्या स्त्रियांपर्यंत ही ताकद पोहोचायला हवी."
आता ग्रेसचं स्वप्न आहे सदतीसाव्या वर्षी, माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याचं. तिला लोकांना मदत करायची आहे. सुईण म्हणून तिला काम करण्याचा परवाना मिळेल, अशी तिला आशा आहे. ती आता ऐंशी गाठलेल्या एका जोडप्याबरोबर राहाते. निर्वासित मदत उपक्रमांतर्गत तिला या जोडप्यासोबत राहता येत आहे. तिच्याकडे अजूनही कायदेशीर दर्जा नाही. उत्पन्न नाही. ग्रेस सध्या फूड बँकेमधून अन्नाची आणि लोकांनी दिलेल्या मदतीवर कपड्यांची गरज भागवते.
आपल्या बहिणीचा थांगपत्ता कळावा अशी तिची इच्छा आहे. लवकरच कायदेशीर आश्रय मिळेल, ही आशा आहे.
2013 पासून तिनं तीन अर्ज दिले आहेत. अजून ठाम नकार आलेला नाही. तिनं नुकतच चौथ्यांदा अर्ज दाखल केला आहे. ती या देशात गेली वीस वर्षं आहे, हे सिद्ध करणं फार अवघड आहे, कारण तिच्याकडे कोणतीच कागदपत्रं नाहीत.
पण तरीही, ग्रेसला आशा आहे. मन मोकळं करता येईल असे मित्र-मैत्रीणी आता तिच्याजवळ आहेत.
यनेलही पुन्हा अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. पश्चिम आफ्रिकेत वाट्याला आलेल्या सामूहिक बलात्काराच्या भयानक आठवणी तिला अजूनही पुसून टाकता येत नाहीत.
सर्व फोटो- एम्मा लिंच
(सर्व नावं बदलली आहेत)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)