You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॉमनवेल्थ गेम्स 2018 : उद्घाटनानंतर उत्सुकता भारत-पाक सामन्याची
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी, गोल्डकोस्ट, ऑस्ट्रेलिया
संपूर्ण जगाच्या नजरा बुधवारी करेरा स्टेडिअमवर होत्या जिथं राष्ट्रकुल स्पर्धांचा रंगतदार उद्घाटन सोहळा पार पडला. सुरक्षा तसंच वाहतुकीशी संबंधित समस्या आणि न विकली गेलेली तिकिटं असं असतानासुद्धा ही सगळ्यांत जास्त यशस्वी कॉमनवेल्थ स्पर्धा असेल असा विश्वास आयोजकांना आहे.
इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यातर्फे प्रिन्स चार्ल्स यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल सुद्धा उपस्थित होते.
डिड्गेरिडू ऑर्क्रेस्ट्रा आणि 'बंगारा एबोरिजिन्स'चा बेली डान्स हे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं. त्याशिवाय व्हेल मासा मिगालीची एक मोठी प्रतिमासुद्धा साकारण्यात आली होती. हा मासा वर्षातून एकदा थंडीच्या काळात गोल्ड कोस्टच्या किनाऱ्यावरून जातो.
पण सर्वांचं लक्ष वेधलं त्या क्षणानं जेव्हा अख्ख्या करेरा स्टेडिअमनं गोल्ड कोस्टच्या बीचचं रूप घेतलं. या स्टेडिअममध्ये 46 टनांची ऑडिओ आणि लाइटिंग उपकरणं होती.
या समारंभात यजमान म्हणून बोलण्याची संधी न मिळाल्यानं क्वीन्सलँडचे पंतप्रधान अनस्तिसिया प्लाजेजूक नाराज झाले. या घटनेनंतर त्यांनी त्यांचं उद्घाटनपर भाषण सार्वजनिक केलं आहे.
Channel 9 स्थानिक वाहिनंन उद्घाटन समारंभाचं काही फुटेज दाखवल्यामुळे त्यांची अधिस्वीकृती रद्द करण्यात आली आहे.
Channel 9 नं या चुकीबद्दल माफी मागितली आहे. पण मैदानात उपस्थित असलेले 1,600 स्वयंसेवक या बाबतीत मौन बाळगू शकतात तर Channel 9 का नाही, असा प्रश्न आयोजक विचारत आहे.
भारत-पाकिस्तान मॅचवर नजर
भारत पाकिस्तानचा हॉकीमध्ये आधी जो रुबाब होता तो आता राहिलेला नाही. पण गोल्ड कोस्टमध्ये या दोन देशात 7 एप्रिलला होणाऱ्या मॅचबद्दल खूप उत्सुकता आहे.
तसं तर स्पर्धेची काही तिकिटं अजूनही विकली गेलेली नाहीत. पण भारत पाकिस्तान सामन्याची सगळी तिकिटं विकली गेली आहे. इथं राहणाऱ्या भारतीयांमध्ये या सामन्याची तिकिटं न मिळाल्यानं नाराजी सुद्धा आहे.
गोल्ड कोस्टमध्ये राहणारे बहुतांश भारतीय मुळचे पंजाबचे आहेत आणि ते हॉकीचे चाहते आहे.
भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच इतर खेळांसारखीच खेळावी, असा सल्ला आपण सुरुवातीलाच सर्व खेळाडूंना दिल्याचं भारताचे हॉकी प्रशिक्षक मरीन सांगतात. "त्यांनी मला तसं आश्वासन तर दिलं पण प्रत्यक्षात ते तसं करू शकले नाही आणि माझ्या सल्ल्याच्या अगदी विरुद्ध खेळले," असंही ते पुढे सांगतात.
एकेकाळी भारताचे प्रशिक्षक असलेले रोलँट ऑल्टमन आता पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मते दोन्ही संघांचा निकालावर भर असतो पण तो कसा येतो, यावर कोणीही लक्ष देत नाही.
सध्या जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकी टीम सहाव्या तर पाकिस्तान 13 व्या क्रमांकावर आहे.
पर्यटक गायब
तसं तर गोल्ड कोस्टमधल्या टूर ऑपरेटर्ससाठी ईस्टरच्या आसपासचा काळ खूप व्यग्र असतो. त्यांना अपेक्षा होती की या स्पर्धेदरम्यान त्यांच्या धंद्यात मोठी वाढ होईल आणि संपूर्ण जगातले लोक इथं येतील. पण झालं उलटंच.
गोल्ड कोस्टच्या हॉटेलमध्ये 20 टक्के खोल्या रिकाम्या आहेत. तसंच गोल्ड कोस्टमध्ये येणारी बहुतांश विमानं रिकामी येत आहेत. ईस्टरच्या दरम्यान जितकी गर्दी तिथे होते तितकी गर्दी तिथे सध्या नाही.
लोकांना विचारल्यावर असं कळलं की, पर्यटक तिथं सुख शांतीसाठी येतात. राष्ट्रकुल स्पर्धांमुळे त्यांच्या शांततेचा भंग व्हावा, असं त्यांना वाटत नाही.
इथं होणाऱ्या गर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी स्थानिक लोकही दुसरीकडे जाणं पसंत करत आहेत.
दरम्यान, अनेक पर्यटकांनी गोल्डकोस्टपासून 80 किमी दूर असलेल्या ब्रिस्बेनमध्ये हॉटेल बुक केलं आहे. कमी पैशांमध्ये राहता येतं म्हणून त्यांनी असं केलं असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आतापर्यंत 20 हजार तिकिटंसुद्धा विकली गेलेली नाहीत. पण गोल्ड कोस्टला राहणाऱ्या एकानं मला विनोदानं सांगितलं, "एक लक्षात घ्या... इथले लोक शेवटच्या दिवशीच वस्तू विकत घेतात."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)