... म्हणून सौदीच्या राजांनी सगळ्या सैन्यप्रमुखांना हटवलं

सौदी अरेबिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजे सलमान (मध्यभागी) यांनी 2015 मध्ये सत्तेवर आले होते.

सौदी अरेबियानं आपल्या सैन्यप्रमुखांसह सर्व मोठ्या लष्करी अधिकाऱ्यांची रातोरात हकालपट्टी केली आहे. काल रात्री हे फर्मान जारी करण्यात आलं.

लष्कर आणि वायुसेनेच्या प्रमुखपदीही बरखास्त केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

जेव्हा येमेनमध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढाईचं हे तिसरं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली आहे.

सौदी अरेबियाच्या सौदी प्रेस एजन्सीनं ही बातमी दिली आहे, पण अधिकाऱ्यांच्या बरखास्तीमागचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

या निर्णयांसह गेल्या काही काळात सौदीत झालेल्या मोठ्या निर्णयांमागे राजकुमार मोहम्मद बिन सलमान असल्याचं मानलं जात आहे. सलमान हे सौदीचे संरक्षण मंत्रीही आहेत.

मागच्या वर्षी सौदीमधील राजानं भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडल्यावर अनेक उच्चाधिकाऱ्यांना रियाधच्या पंचतारांकित हॉटेलात कैद करण्यात आलं होतं. त्यात राजकुमार, मंत्री आणि अनेक लक्षाधीशांचा समावेश होता.

कोण आत? कोण बाहेर?

वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार लष्करप्रमुख जनरल अब्दुल रहमान बिन सालेह अल-बनयान यांनाही बरखास्त करण्यात आलं आहे.

या अधिकाऱ्यांची जागा भरून काढण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. याशिवाय अनेक उपमंत्र्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात तमादूर बिंत युसूफ अल रमाह या महिला उपमंत्र्यांचा समावेश आहे. त्यांना मजूर आणि सामाजिक विकास हे खातं देण्यात आलं आहे.

सौदी अरेबियामध्ये एखाद्या महिलेनं उपमंत्री होणं ही सोपी बाब नाही.

सौदी अरेबिया

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सौदीच्या नेतृत्वाखालील सैन्यानं 2015 साली येमेनमध्ये हस्तक्षेप केला होता.

प्रिंस टर्की बिन तलाल यांना दक्षिण पूर्व आसीर भागात डेप्युटी गर्व्हनर पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. ते अब्जाधीश प्रिंस अलवाईद बिन तलाल यांचे बंधू आहेत. त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत कैदेत डांबण्यात आलं होतं. दोन महिन्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

'परंपरांगत धोरणांपासून फारकत'

बीबीसीचे अरब घडामोडींचे संपादक सेबॅस्टियन अशर यांनी या घटनेचं विश्लेषण केलं. ते म्हणतात, "सौदीच्या विविध संस्थांमध्ये काल केलेले बदल हे किंग सलमान यांच्या कारकिर्दीतली महत्त्वाची घटना आहे. त्यांचा मुलगा आणि राजकुमार मोहम्मद बिन सालेम हा या घडामोडींमागचा खरा सूत्रधार आहे."

"येमेनमध्ये सौदीचा हस्तक्षेप ही त्यांची योजना होती. आपल्या देशातील परंपरांगत सावधगिरीच्या धोरणांपासून फारकत घेण्याची ती पहिली खूण होती. आतापर्यंत ते या मोहिमेत अयशस्वी ठरले आहेत," असंही ते पुढे म्हणतात.

पण त्यांच्या या मोहिमेने दक्षिण येमेनमधून हौदी बंडखोरांना हाकलून लावलं आहे, ज्यामुळे तिथल्या भंग झालेल्या सरकारला पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश आलं.

हेही वाचलंत का?

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)