बढाया मारणं धंद्यासाठी चांगलं असतं की वाईट?

'जर आपण लोकांना आपल्या धंद्याविषयी सांगणार नाही तर त्याचा प्रचार-प्रसार कसा होईल?'

फोटो स्रोत, JASON CONNOLLY / Getty Images

फोटो कॅप्शन, 'जर आपण लोकांना आपल्या धंद्याविषयी सांगणार नाही तर त्याचा प्रचार-प्रसार कसा होईल?'
    • Author, मॅडी सेवेज
    • Role, बीबीसी बिझनेस प्रतिनिधी, स्टॉकहोम

स्वीडन हा जगातील सगळ्यांत नाविन्यपूर्ण देश आहे. पण इथल्या व्यावसायिक संस्कृतीत आपल्या उद्योगधंद्याच्या यशाबाबात बढाई मारणं फारसं चांगलं समजलं जात नाही. मग अशी संस्कृती स्टार्टअप कंपन्यांच्या वाटचालीत अडथळा ठरते का?

कालानुरूप बदलणाऱ्या तंत्रज्ञानाधारित उद्योगांसाठी स्वीडन पंढरी आहे. Spotify, Skype अशा घराघरात पोहोचलेल्या नावांपासून ते King and Mojang तसंच iZettle आणि Klarna या पेमेंटसंबंधी कंपन्यांपासून अनेक मोठ्या उद्योगांसाठी स्वीडन ओळखलं जातं.

फक्त एक कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशात अनेक जंगलं आहे, ज्यांचा मनुष्यप्राण्यांनी फारसा नाश केलेला नाही. या नॉर्डिक देशात लोकसंख्येच्या तुलनेत सरासरी जितक्या कंपन्या स्थापन झाल्या तितक्या कंपन्या सिलिकॉन व्हॅलीबाहेर इतर कुठेही स्थापन झालेल्या नाहीत.

मागच्या महिन्यात युरोपच्या ब्लूमबर्गच्या Global Innovation Ranking मध्ये मागच्या महिन्यात स्वीडन सर्वोच्च स्थानी होतं.

स्वीडनच्या यशामागे अनेक बाबी कारणीभूत आहेत. स्वीडनमध्ये डिजिटल पातळीवर पायाभूत सुविधा जास्त प्रमाणात आहेत. तिथं उच्चशिक्षित, टेक्नोसॅव्ही, तसंच नवीन शोध लावण्यासाठी आदर्श मनुष्यबळ आहे.

ज्यांच्या कल्पना प्रत्यक्षात येत नाही असा लोकांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी सामाजिक संस्था मदत करतात.

मूल्यांची पखरण

पण Ikea कंपनीचे संस्थापक इंगवर कॅम्प्रॅड यांच्या मृत्यूनंतर छापून आलेल्या त्यांच्यावरील मृत्यूलेखांमध्ये त्यांच्या दयाळूपणा आणि काटकसरी स्वभावाचा ठळक उल्लेख होता. या सांस्कृतिक गुणांकडे त्यामुळे पुन्हा लक्ष वेधलं गेलं.

आयकियाचे संस्थापक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आयकिया कंपनीचे संस्थापक इंगवर कॅम्प्रॅड आपल्या नम्रतेसाठी ओळखले जायचे.

स्थानिक आणि जागतिक विश्लेषक स्वीडनमधील चांगल्या आर्थिक परिस्थितीत मूल्यं कशी पुढे नेता येतील याचा विचार करत आहेत. त्यात दुभंगत जाणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्राचासुद्धा समावेश आहे.

"आपल्या उद्योगाबात कमीत कमी बढाया मारणं आणि सहमतीचं वातावरण तयार करणं या स्वीडनमधील दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत," असं लोला अकिनमेड एकरस्ट्रॉम यांनी सांगितलं. लोला या आधी प्रोग्रामर होत्या आणि सांस्कृतिक विषयाच्या भाष्यकार आहेत. आपल्या Lagom: The Swedish Secret of Living Well या पुस्तकातही त्यांनी तसा उल्लेख केला आहे.

एकमेकां साह्य करू

इतर ठिकाणी जिथं मोठ्या प्रमाणात संशोधन होतं तिथं फक्त कंपनीचा CEO हिरो असतो. मात्र स्वीडनमध्ये "एकत्रित घेतलेल्या निर्णयाला फार महत्त्व असतं, सगळ्यांचं मत विचारात घेतलं जातं, जेणेकरून कोणत्याही प्रश्नावर एकत्रित तोडगा निघेल," असं एकरस्ट्रॉम पुढे सांगतात.

सगळ्यांचं मत लक्षात घेण्याच्या या संस्कृतीला स्वीडनमध्ये यांतेलागेन (Jantelagen किंवा 'यांतेचा नियम') असं म्हणतात. डॅनिश नॉर्वेयन लेखक अॅक्सेल सेंडोमोस यांनी 1933 साली एक कादंबरी लिहिली होती. त्यात यांते नावाच्या एका शहराचा उल्लेख होता. त्यावरून हे नाव पडलं आहे.

आपल्या संपत्तीचं प्रदर्शन आणि पदांची रचना या संस्कृतीला नामंजूर आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर कोणत्याही व्यक्तीनं स्वत:ला दुसऱ्यापेक्षा चांगलं समजण्याचा प्रयत्न करू नये.

Ulrika Viklund and Andreas Eriksson

फोटो स्रोत, Maddy Savage

फोटो कॅप्शन, अरे या शहरात उलिरका विकलंड आणि अँड्रिएस एरिकसन उद्योजकासाठी एका गटाची स्थापना केली आहे.

"कामाच्या ठिकाणी यांतेलागेनच्या संस्कृतीमुळे एकजुटीचं वातावरण तयार होतं. त्यामुळे गळेकापू स्पर्धेचं वातावरण तयार होत नाही. परिणामी स्पर्धेचा ताण येत नाही आणि आपसुकच आपण दुसऱ्या व्यक्तीपेक्षा उत्तम आहोत ही भावना बळावत नाही," असं एकरस्ट्रॉम स्पष्ट करतात.

स्वीडनची राजधानी स्टॉकहोमच्या 645 किमी उत्तरेस एका ठिकाणी, एका लाकडी बाकावर आणि बीन बॅग्सवर बसून, कडक कॉफीचे घोट घेत या संकल्पनेवर चर्चा होते.

पर्वतरांगामध्ये वसलेल्या अरे शहरात बी नावाचं एक को-वर्किंग स्पेस आहे, जिथे वेगवेगळ्या कंपन्यांमधले लोक एकाच ठिकाणी कार्यालय थाटतात आणि आपापली कामं करतात. तंत्रज्ञानाशी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा एक क्लबसुद्धा आहे.

कॉनफेडरेशन ऑफ स्वीडिश एंटरप्रायजेस यांच्या मते फक्त 5000 लोकसंख्या असलेल्या या अरे शहरात देशातले सगळ्यांत जास्त तरुण उद्योजक आहेत.

अरे

फोटो स्रोत, Maddy Savage

फोटो कॅप्शन, 5000 लोकसंख्या असूनसुद्धा अरे ही जागा स्वीडीश स्टार्ट-अप हब झाली आहे.

हे हब Spotify कंपनीच्या आंतरराष्ट्रीय ग्रोथ मॅनेजर उलरिका विकिलुंड यांनी स्थापन केलं होतं. त्यांच्या मते यांतेलागेन ही संकल्पना स्टार्ट अपसाठी सगळ्यांत जास्त फायदेशीर आहे. एकमेकांना मदत करण्याची भावना यामुळे बळावते आहे.

त्या पुढे सांगतात, "आपल्याकडे साधारणत: एक बॉस असतो जो एका कोपऱ्यात बसलेला असतो."

"Spotify मध्ये प्रत्येकाच्या कौशल्याचा योग्य प्रकारे उपयोग केला जातो. प्रत्येक व्यक्तीला नाविन्यपूर्ण काम करण्याची आणि आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. काम करण्याची अशी पद्धत नसती तर आम्हाला कधीच यश मिळालं नसतं."

दुसरी बाजू

जॉन फोर्मग्रेन तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात. आधी ते बर्लिनमध्ये होते. ते सांगतात की, स्वीडनमध्ये असलेल्या नम्रतेमुळे आणि पदनामावलीचा पसारा नसल्यामुळे नेटवर्किंगला खूप मदत होते.

"स्टॉकहोममध्ये असताना मी SUP46 या तंत्रज्ञानविषयक गटाचा एक भाग होतो. त्यांनी आम्हाला अनेक मोठ्या स्वीडिश कंपन्यांची गाठ घालून दिली. स्काईप कंपनीचे संस्थापक आमच्याबरोबर महिन्यातून एकदा संवाद साधायचे. ते आमच्याशी अगदी मोकळेपणी बोलायचे. आमच्यासारख्या तरुण स्टार्ट अप उद्योजकांशी त्यांना बोलायची इच्छा असायची."

जॉन फोर्मग्रेन सध्या आपला पाचवा बिझनेस चालवत आहे. मनुष्यबळ विकासासंदर्भात डिजिटल टूल ते चालवतात. अरेच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये सुरू केलेल्या या उद्योगात त्यांनी आतापर्यंत जवळजवळ पाच लाख रुपये गुंतवणूक केली आहे.

जॉन फोर्मग्रेन

फोटो स्रोत, Maddy Savage

फोटो कॅप्शन, जॉन फोर्मग्रेन सध्या त्यांचा पाचवा उद्योग चालवत आहेत.

ही सगळी माहितीसुद्धा त्यांनी 30 मिनिटं संवाद साधल्यानंतर दिली. हाच जांतेलेगन संस्कृतीचा एक भाग आहे. बढाया न मारणं ही संकल्पना अनेक जणांना स्वीडनच्या तंत्रज्ञान उद्योगाला घातक वाटते.

"असं झाल्यामुळे कोणी आदर्शच राहिलेले नाहीत," असं उलरिका विकलंड सांगतात.

"जे लोक यशस्वी झाले आहेत ते मोठया कारमधून फिरत नाहीत. त्यांनी काही चांगलं केलं असेल तरी ते सांगत नाहीत. त्यामुळे कदाचित नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळत नाही," त्या पुढे म्हणाल्या.

स्वीडिश स्टार्ट अप्सला 130 कोटी युरो एवढी इतकी गुंतवणूक मिळाली आहे. Dealroom.co या वेबसाईटवर असलेल्या आकड्यांनुसार जर्मनीला 290 कोटी युरो आणि युकेला 710 कोटी युरो एवढी गुंतवणूक मिळाली आहे.

इथल्या लोकसंख्येच्या मानानं हे आकडे लक्ष वेधून घेतात. यांतेलागेनमुळे कंपन्या मोठी उद्दिष्टं ठेवत नाही का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो.

स्टॉकहोम शहरात डिजिटल क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी हायपर आयलँड नावाची एक संस्था आहे. या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोफिया विंग्रेन सांगतात, "एका संशोधनानुसार तुम्हाला तुमच्या कल्पनेबाबत किती आत्मविश्वास आहे किंवा ती कल्पना लोकांच्या मनावर कशी ठसवता यावर तुम्हाला किती गुंतवणूक मिळेल हे अवलंबून असतं."

त्यांच्या मते स्वीडिश लोकांमध्ये गुंतवणूक वगैरेच्या आधीसुद्धा शांतपणे काम करून एक उत्तम दर्जा गाठण्यावर भर असतो.

बिझनेसचं तंत्रज्ञान

हायपर आयलँड संस्थेचे सध्याचे विद्यार्थी सध्या कमी बढाया मारणारे आणि मागच्या पिढीपेक्षा जगाचा जास्त प्रमाणात विचार करणारे आहेत. या विषयाचा माग घेण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे.

विनग्रेन सांगतात, "आमची अनेक सादरीकरणं असतात. आत्मविश्वास कसा वाढवावा, स्वत:ला कसं सादर करावं, याचं प्रशिक्षण देत असतो."

सोफिया

फोटो स्रोत, Hyper Island

फोटो कॅप्शन, स्टॉकहोम बिझनेस स्कुलच्या सोफिया विंग्रेन उद्योजकांना आपल्या उद्योगाबद्दल बोलायला उत्तेजन देतात.

स्वीडनची प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेक बाह्य गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेत. घरांचा प्रश्न, स्टॉक ऑप्शनवर कर, स्थलांतराचे कडक नियम यांच्यामुळे अनेक वादांना तोंड फुटलं आहे. त्यामुळे अशा छोट्या नॉर्डिक देशात खरोखरच जागतिक दर्जाचं कौशल्य कसं आणणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, निरीक्षकांच्या मते विश्वास आणि सहमती हे स्वीडनच्या उद्योगधंद्याचा पाया आहे. जागतिक पातळीवर वाढत असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तो कायम ठेवणं हे सध्याच्या काळातील एक मोठं आव्हान आहे.

"जग इतकं पुढे जातंय की प्रत्येकाचं मत लक्षात घ्यायला इतका वेळ आमच्याकडे नसेल," असं लोला अकिनमेड अकेरस्ट्रॉम सांगतात.

"स्वीडनला एक सुवर्णमध्य साधावा लागणार आहे. एखाद्या संस्कृतीचा उत्तम भाग आत्मसात करणं, तसंच सर्जनशीलता, लवचिकता, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि काम करण्याचे विविध मार्ग यांचा विचार करावा लागेल," असंही त्या पुढे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)