कोंबड्यांच्या रक्तरंजित झुंजींवर कोट्यवधींचा सट्टा

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये संक्रांत साजरी करण्याची एक वेगळी प्रथा आहे. इथे कोंबड्यांच्या जीवघेण्या झुंजी होतात.

गोदावरी, गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यांमधल्या काही भागांमध्ये या कोंबड्यांच्या झुंजी मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या वेगवेगळ्या भागांतून लोक त्या पाहायला इथे जमतात. काय आहेत या झुंजींची वैशिष्ट्य?

1. झुंजींसाठी खास तयारी केलेले कोंबडे

या झुंजींसाठी कोंबड्यांना खास प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना बदाम-पिस्त्यांसारख्या सुक्या मेव्याचा खुराक देतात. तसंच या कोंबड्यांचीसुद्धा प्रॅक्टिस मॅच होते.

झुंजीत जो कोंबडा मरतो तो हरतो. मेलेल्या कोंबड्याचं मांस तर खाल्लं जातंच, पण जिंकलेल्या कोंबड्यालाही मारून खाल्लं जातं. जिंकलेल्या कोंबड्याचं मांस खाल्ल्याने त्याच्यासारखी शक्ती येते, असा समज आहे.

2. ग्रामीण परंपरा ते करमणुकीचा सोहळा

"ही परंपरा मुळात सुरू झाली ती शेतीशी संबंधित ग्रामीण अर्थव्यवस्थेत. ज्या गावांना हरित क्रांतीचा फायदा झाला त्या गावांमध्ये या प्रथेचं स्वरूप बदलत गेलं. सुबत्ता असल्यानं हळूहळू या झुंजींवर पैसे लावले जाऊ लागले. आज याचं रूपांतर एका करमणुकीच्या सोहळ्यात झालं आहे," अशी माहिती बीबीसी तेलुगूचे संपादक श्रीराम गोपीशेट्टी यांनी सांगितली.

3. कोंबड्यांच्या पायांना चाकू

सुरुवातीच्या काळात कोंबड्यांची झुंजीचं स्वरूप साधं होतं. झुंजणाऱ्या दोन कोंबड्यांपैकी जो कोंबडा अधिक शक्तिशाली तो कोंबडा जिंकायचा. पण अलीकडे कोंबड्यांच्या पायांना धारदार चाकू लावले जातात. यामुळे कोंबडे गंभीररीत्या जखमी होतात.

सुप्रीम कोर्टाने कोंबड्यांच्या पायांना चाकू बांधण्यावर बंदी घालण्याचे आदेश देऊनही यंदाच्या झुंजींमध्ये त्या आदेशांचं सर्रास उल्लंघन झालेलं आढळलं.

4. झुंजींवर लागतात लाखो रुपये

या झुंजी करमणुकीचं एक मोठं माध्यम आहेत. आंध्र प्रदेशमधल्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये यांचं आयोजन केलं जात असलं तरी त्या पाहण्यासाठी लांबच्या गावांमधूनही लोक जमतात. झुंजींमध्ये कोणता कोंबडा जिंकेल यावर अनेक लोक पैसे लावतात. अलीकडे या झुंजींवर लागत असलेला लाखोंचा सट्टा, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

5. तंत्रज्ञानाचा शिरकाव

या झुंजीच्या सोहळ्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता येणाऱ्या प्रेक्षकांसाठी अनेक सोयी-सुविधा केलेल्या आढळून येतात. मोठाल्या मैदानांमध्ये मांडव घालून या झुंजींचं आयोजन केलं जातं. स्पर्धक कोंबड्यांच्या मालकांच्या आणि प्रेक्षकांच्या गाड्यांसाठी पार्किंगची सोयही केली जाते.

हजारोंच्या संख्येने प्रेक्षक असल्याने त्यांना झुंज सहज पाहता यावी यासाठी मैदानात मोठाल्या LED स्क्रीनसुद्धा लावल्या जातात. तसंच सध्या ड्रोन कॅमेऱ्यांनी यांचं शूटींग केलं जात आहे.

6. राजकारण्यांचा सहभाग

या खेळांची लोकप्रियता पाहता आता जवळजवळ सगळ्याच पक्षांमधले राजकारणीही या झुंजींचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करतात. अनेक नेते एकमेकांच्या कार्यक्रमांना सुद्धा हजेरी लावतात. गोदावरी जिल्ह्यात हे अधिक प्रचलित आहे.

"या प्रथेला लोकांचा मोठा पाठिंबा असल्यामुळे त्याचे परिणाम त्याभोवतीच्या राजकारणावरही दिसतात," असंही श्रीराम गोपीशेट्टी यांनी सांगितलं.

हे जरूर वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)