You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हाडवैरी कोरियन भेटणार हिवाळी ऑलिंपिकच्या मैदानात
एकमेकांचे कडवे शत्रू असलेल्या उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात मंगळवारपासून उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन वर्षांनंतर या दोन देशांदरम्यान चर्चा होत आहे.
या दोन देशांच्या सीमेवर वसलेल्या पॅनम्यूनजोम या गावातल्या पीस हाऊस इथं स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता चर्चा सुरू झाली.
त्यानुसार पुढच्या महिन्यात दक्षिण कोरियात होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी उत्तर कोरिया त्यांचा संघ पाठवणार आहे.
क्रीडापटू, त्यांचे मित्रमैत्रिणी आणि इतर मंडळींना यासाठी दक्षिण कोरियामध्ये पाठवलं जाणार आहे.
यावेळी कोरियन युद्धामुळे दोन देशांत विभागल्या गेलेल्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी देण्यात येईल असं दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आलं आहे.
खेळांच्या उद्घाटन समारंभात दोन्ही देशांचे खेळाडू एकत्र संचलन करतील असंही जाहीर करण्यात आलं आहे.
2015 मध्ये झाली होती शेवटची चर्चा
उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र आणि अणू बॉम्बची चाचणी केली होती. याचा परिणाम म्हणून दक्षिण कोरियानं उत्तर कोरियातल्या काइसाँग इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्समध्ये होणार असलेल्या संयुक्त आर्थिक उपक्रमातून माघार घेतली.
यामुळे उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकले. यानुसार दोन्ही देशातला दूरध्वनीच्या माध्यमातून होणारा संपर्कही स्थगित झाला. या दोन देशांदरम्यान शेवटची चर्चा 2015 मध्ये झाली होती.
उत्तर कोरियानं सातत्यानं प्रतिबंधित शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांवर भर दिल्यानं दोन्ही देशांदरम्यानचे संबंध दुरावले होते.
ऑलिंपिक चर्चेचा केंद्रबिंदू
उत्तर कोरियाचा ऑलिंपिक सहभाग चर्चेचा केंद्रबिंदू असेल असं दक्षिण कोरियाचे एकत्रीकरण मंत्री चो म्योयंग ग्योन यांनी सांगितलं होतं.
रि सन ग्वोन हे उत्तर कोरियाच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाचं नेतृत्त्व करत आहेत. दक्षिण कोरियाशी चर्चेसाठी तयार करण्यात आलेल्या सरकारी संघटनेचे ग्वोन चेअरमन आहेत.
ज्येष्ठ मुत्सदी असणारे ग्वोन 2006 पासून उत्तर कोरियातर्फे होणाऱ्या वाटाघाटींमध्ये निर्णायक भूमिका बजावतात.
दोन्ही देश सावध पवित्र्यानिशी या चर्चेकडे पाहत आहेत. दोन्ही देशातले संबंध सुधारावेत आणि संवाद वाढावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं उत्तर कोरिया नेतृत्त्वविषयक तज्ज्ञ मायकेल मॅडेन यांनी सांगितलं.
दोन्ही देशातला तणाव निवळावा यादृष्टीनं उचलण्यात आलेली ही पावलं आहेत असं त्यांनी पुढे सांगितलं.
दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या पॅनम्यूनजोम या डीएमझेड अर्थात निशस्त्रीकरण करण्यात आलेल्या गावात ऐतिहासिक चर्चेची फेरी होत आहे.
पॅनम्यूनजोमचं महत्त्व काय?
1953 मध्ये कोरिया युद्ध समाप्तीनंतर दोन्ही देशातील अधिकाऱ्यांनी भेटण्यासाठी 'पॅनम्यूनजोम' या गावाची निवड करण्यात आली. या गावाचा एक भाग उत्तर कोरियात येतो तर दुसरा भाग दक्षिण कोरियाच्या हद्दीत आहे. गावाच्या मध्यभागी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाची इमारत आहे.
गेल्यावर्षी उत्तर कोरियाच्या एका नागरिकानं डीएमझेडचा भाग असलेल्या या गावातून दक्षिण कोरियात जाण्याचा प्रयत्न केला होता.
तणाव निवळणार
दक्षिण कोरियात होणार असलेल्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासंदर्भात अनुकूल असल्याचे उद्गार उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांनी काढले होते.
त्यानंतर दक्षिण कोरियानं उच्च स्तरीय चर्चेची तयारी दर्शवली होती. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोरियातल्या प्योनचांगमध्ये हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांदरम्यान हॉटलाइन अर्थात दूरध्वनी चर्चा सुरू झाली.
ऑलिंपिकच्या निमित्तानं दोन्ही देशांना एकत्र येण्याची दुर्मीळ संधी आहे असं मत दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जेई इन यांनी व्यक्त केलं.
या दोन देशांमधला तणाव कमी होऊन चर्चेला सुरुवात झाली तर आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दृष्टीनं सकारात्मक गोष्ट आहे, असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)