पाबलो एस्कोबार : सर्वांत खतरनाक ड्रग माफियाबद्दल 6 धक्कादायक गोष्टी

ज्या काही गुन्हेगारांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडलं त्यापैकी एक नाव म्हणजे पाबलो एस्कोबार. कोलंबियात जन्मलेल्या या ड्रग माफियानं गुन्हेगारी जगतावर एकेकाळी अधिराज्य गाजवलं होतं.
पाबलो एस्कोबारचा जन्म 1 डिसेंबर 1949 रोजी झाला होता.
जगभरातल्या सर्वाधिक 10 श्रीमंतांपैकी एक होता, असा समज त्याकाळी होता.
त्याचं जीवन इतकं नाट्यमय होतं की त्याच्यावर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका पुस्तकं आली आहेत. सध्या नेटफ्लिक्सवर 'नारकोस' नावाची मालिका उपलब्ध आहे. त्या मालिकेमुळं पाबलोचे नाव जगभरातल्या युवा पिढीपर्यंत पोहचलं आहे.
पाबलो एस्कोबारचा उल्लेख त्यावेळची वर्तमानपत्रं 'किंग ऑफ कोकेन' असा करत असत. त्याच्या टोळीचं नाव मेडेलीन कार्टेल असं होतं. मेडेलीन हे कोलंबियातलं एक शहर आहे. त्यावरुन त्यांच्या टोळीला हे नाव मिळालं होतं.
असं म्हटलं जात की, त्याकाळी अमेरिकेतील 80 टक्के कोकेन पाबलो एस्कोबारची गॅंग पुरवत असे.
अशा कुख्यात गॅंगस्टरबद्दल जाणून घ्या या 6 गोष्टी.
1. शिक्षिकेचा मुलगा ते जगातील सर्वांत श्रीमंत गॅंगस्टर
पाबलो एस्कोबारचा जन्म 1 डिसेंबर 1949 रोजी दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये झाला होता. त्याचे वडील शेतकरी होते तर आई शिक्षिका होती.

फोटो स्रोत, Getty Images
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पाबलोकडे 1990 च्या सुमारास 30 अब्ज डॉलर इतकी संपत्ती होती. म्हणजे आताच्या काळातील सुमारे 55 अब्ज डॉलर. तो त्या काळातील जगातील सातव्या क्रमाकांचा श्रीमंत व्यक्ती आहे, असं म्हटलं जात असे.
2. कोकेन तस्करीसाठी विमानाचा वापर
कोकेनच्या तस्करीसाठी पाबलो एस्कोबार विमानांचा वापर करत असे. कोलंबिया आणि पनामामधून अमेरिकेला विमानातून कोकेन जात असे, अशी माहिती 'द अकाउंटंट्स स्टोरी' या पुस्तकात देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, RAUL ARBOLEDA
पाबलोनं 15 मोठी विमानं आणि 6 हेलिकॉप्टर्स खरेदी केले होते. त्यातून तो कोकेनची तस्करी करत असे. दर महिन्याला कोलंबियातून अमेरिकेत 70-80 टन कोकेनची तस्करी केली जात असे.
"पाबलो तस्करीसाठी दोन छोट्या पाणबुड्यांचा वापर करत असे," अशी माहिती पाबलो एस्कोबारचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारने लिहिलेल्या या पुस्तकात देण्यात आली आहे.
3. पाबलो आणि त्याच खासगी प्राणिसंग्रहालय
पाबलो एस्कोबारजवळ अमाप संपत्ती होती. 20 स्क्वेअर किलोमीटरच्या क्षेत्रफळावर त्याच फार्महाऊस होतं.
त्या ठिकाणी जगभरातून आणलेले प्राणी होते. हत्ती, पाणघोडे, विविध पक्षी, जिराफ, शहामृग असे किती तरी प्राणी आणि पक्षी त्याच्या खासगी प्राणीसंग्रहालयात होते.

फोटो स्रोत, RAUL ARBOLEDA
राजमहलाप्रमाणे असलेल्या त्याच्या घरात खासगी विमानतळ होते. पाबलो एस्कोबारला लक्झरी कार आणि बाइकचा मोठा छंद होता.
त्याच्या मालकीच्या जमिनीमध्ये कोट्यवधी डॉलरच्या नोटा आणि दागिने पुरून ठेवण्यात आले होते.
4. हजारो जणांची हत्या
1980 ते 1990 या काळात पाबलो एस्कोबारच्या कार्टेलनं फक्त ड्रग्जची तस्करी केली असं नाही, तर त्याबरोबरच कोलंबियात दहशत निर्माण केली होती.

फोटो स्रोत, Netflix
लाच देऊन, धमकी देऊन किंवा थेट हत्या करून विरोधकांचा काटा काढला जात असे.
त्या काळात पाबलो आणि त्याच्या कार्टेलनं 4,000 जणांची हत्या केली असावी, असा एक अंदाज असल्याचं बीबीसी मुंडोनं म्हटलं आहे. तर हा आकडा 5,000 इतका असावा, असं देखील काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कोकेन व्यवसायातल्या वर्चस्वासाठी वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये नेहमी संघर्ष होत असे. त्यातून हजारो लोकांचे प्राण गेले. 1991मध्ये 25,100 आणि 1992मध्ये एकूण 27,100 लोकांचे प्राण गेले अशी नोंद आहे.
5. तो खरंच रॉबिन हूड होता का?
त्याने केलेल्या गुन्ह्यांची संख्या खूप होती. कोलंबिया आणि अमेरिकेनं त्याला गुन्हेगार म्हणून घोषित केलं होतं. पण तो अनेकांसाठी नायक होता.

फोटो स्रोत, RAUL ARBOLEDA
त्याला खेळांची आवड होती. त्याने अनेक क्लब आणि खेळाडूंना वेळोवेळी मदत केली होती असं म्हटलं जातं. तो लहान मुलांच्या फुटबॉल संघांना प्रायोजकत्व देत असे.
श्रीमंताकडील पैसा लुटून गरिबांमध्ये वाटणाऱ्या व्यक्तीला रॉबिन हूडची उपमा दिली जाते. पाबलो एस्कोबारला काही जण रॉबिन हूड समजत असत. मेडेलीनमध्ये अनेक घरांमध्ये रॉबिन हूडच्या वेशातील पाबलो एस्कोबारची प्रतिमा बघायला मिळते.
कोलंबियामध्ये अजूनही त्याला एक प्रभावशाली व्यक्तीमत्त्व समजलं जातं. अजूनही त्याच्या स्टिकर्सची विक्री जोरात होते, असं निरीक्षण 2013मध्ये बीबीसी मुंडोनं केलं होतं.
6. ड्रग माफियाचा अंत
कोलंबिया सरकार आणि अमेरिकेनी केलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये पाबलो एस्कोबार 2 डिसेंबर 1993 रोजी ठार झाला होता.

फोटो स्रोत, AFP
त्याला दफन करण्यात आलं होतं. काही वर्षानंतर डीएनए चाचणीसाठी त्याचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला होता.
त्याच्या आयुष्यावर आधारित 'नारकोस' ही मालिका अमेरिकेत सलग तीन वर्षे सर्वाधिक पाहिलेल्या मालिकांपैकी एक ठरली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









