ऑस्ट्रेलियात समलिंगी विवाहांच्या बाजूने मतदान

समलिंगी विवाहांना वैधता देण्याच्या बाजूने ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी मोठा कौल दिला आहे. पुरुषांचं पुरुषांशी किंवा महिलांचं महिलांशी झालेल्या लग्नाला कायदेशीर मान्यता द्यावी, असं मतदान केलेल्या 61.6 टक्के ऑस्ट्रेलियन नागरिकांनी वाटतं.

आठ आठवडे चाललेल्या या पोस्टल निवडणुकीत 1 कोटी 27 लाख पात्र नागरिकांनी भाग घेतला, जे ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येचा 79.5 टक्के भाग आहेत. आणि सार्वत्रिक निवडणुकांसारखं मतदान करण्याचं नागरिकांवर बंधन या सर्व्हेत नव्हतं.

ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जवळजवळ 78 लाख लोकांनी हे विवाह कायदेशीररीत्या मान्य करण्याच्या बाजूने मतं दिली तर जवळपास 49 लाख लोकांचा याला विरोध होता.

पंतप्रधान माल्कम टर्नबुल म्हणाले, "इतक्या मोठ्या संख्येने झालेलं मतदान पाहता सरकार ख्रिसमसपूर्वी संसदेत या कायद्यात बदल करण्याच्या प्रयत्नात असेल."

लोकांनी बांधिलकी, प्रेम आणि समानतेला 'येस' म्हटलं आहे. आता संसदेत याला मान्यता देणं आमची जबाबदारी आहेत, असं ते निकाल जाहीर झाल्यावर म्हणाले.

या निकालानंतर समलिंगी विवाहाच्या पाठीराख्यांनी ऑस्ट्रेलियात सार्वजनिक ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. LGBT चळवळीचं प्रतीक असलेले सप्तरंगी झेंडे हातात घेऊन समर्थकांनी नाचत- गात ते रस्त्यांवर उतरले.

सिडनीमध्ये जमलेल्या समलिंगी विवाहाच्या समर्थकांना संबोधत ऑस्ट्रेलियाच्या 'क्वॉन्टास' हवाई वाहतूक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन जॉयस म्हणाले, "हा निकाल अत्यंत उत्साहवर्धक आहे. आपण आपल्या देशाचा अभिमान बाळगला पाहिजे."

माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी अशा विवाहांना विरोध केला होता. या कौलाचा संसदेनं सन्मान केला पाहिजे, असं ते बुधवारी म्हणाले.

फेसबुकवर सविस्तर प्रतिक्रिया देत ते म्हणाले, "हा मुद्दा असा आहे की ज्यावर ऑस्ट्रेलियातील लोकांना त्यांच मत व्यक्त करायचं होतं. मी नेहमी हेच सांगत होतो. या निकालांनी दाखवून दिलं आहे की त्यांचं मत घेणं, ही योग्य भूमिका होती."

पंतप्रधान टर्नबुल यांनी अशा विवाहांना पाठिंबा दिला होता. पण संसदेने या विधेयकात काय मुद्द्यांचा समावेश करायचा, यावर सरकारमध्येच वाद सुरू आहेत. या वादाला त्यांना तोंड द्यावं लागत आहे.

काही खासदारांच्या मते या विधेयकात ज्या व्यवसायांचा समलिंगी विवाहांना विरोध आहे, त्यांना समलिंगी विवाहांसाठी वस्तू आणि सेवा न पुरवण्याची मुभा असण्याची तरतूद असावी.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)