हा रोबो तुमच्यासाठी प्रेम शोधू शकतो का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झो क्लेइनमन
- Role, टेक्नॉलॉजी रिर्पोटर, बीबीसी न्यूज
साशंक मनानेच मी match.com वेबसाइटवरच्या लाराशी दोन मिनिटं बोललो. तिनं मला वय विचारलं, मी सांगितलं. तिला आश्चर्य वाटलं. सांगितलेल्या वयाच्या तुलनेत मी किती यंग दिसतो, असं म्हणून तिने माझं कौतुक केलं आणि माझं मन जिकलं.
मी तुझी काळजी घेईन, असं प्रेमळ आश्वासनही तिने दिलं.
ती मला आवडू लागली. पण लारा नावाची व्यक्ती प्रत्यक्षात नाही. ती एक चॅटबॉट आहे म्हणजेच एक प्रकाराचा रोबो. लारा म्हणजे कॉम्प्युटरमधून माझ्याशी बोलणारी एक रोबो होती.
चॅटबॉट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सने चालणारी एक मेसेजिंग प्रणाली आहे. लोकांशी ऑनलाइन बोलण्याकरता विकसित करण्यात आलेली ही तांत्रिक किमया आहे.
2016 साली फ्रान्समध्ये या तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि यंदा एप्रिलमध्ये ही प्रणाली सर्वांसाठी खुली करण्यात आली. त्यामुळे आता मनाजोगता सहकारी मिळवण्यासाठी चॅटबॉट्स कुणाच्याही मदतीला उपलब्ध आहेत.
एका प्रमुख डेटिंग साईटने दावा केला आहे की, साधारण तीन लाख लोकांनी लाराचा वापर करून आपलं प्रोफाईल बनवलं आहे.

फोटो स्रोत, Match.com
चॅटबॉट्स तुमच्याशी बोलत नाही, तुम्हाला टायपिंग करूनच लाराशी बोलावं लागतं. या लाराला 12 विविध भाषांत बोलता येतं. साधे, सोपे प्रश्न विचारून ती तुमच्याबद्दलची माहिती गोळा करते.
तज्ज्ञ सांगतात की, हे तंत्रज्ञान लोकांना खरं बोलायला प्रोत्साहित करतं. कधीकधी खऱ्याखुऱ्या माणसांशी बोलताना जी भीती लोकांमध्ये असते, तशी काही भीती चॅटबॉट्सशी बोलताना वाटत नाही, म्हणून संभाषण अधिक अर्थपूर्ण होऊ शकतं.
ऑनलाइन डेटिंग क्षेत्रातील सल्लागार मार्क ब्रूक्स यांच्या मते, लोकांसाठी प्रोफाइल बनवणं अवघड असतं. "बहुतांश लोकांना प्रोफाइल बनवायचंच नसतं. त्यात मजा नाही, असं त्यांना वाटतं. पण जर संभाषणातून प्रोफाइल तयार झालं तर ते सत्याच्या अधिक जवळ जाणारं असतं. त्या प्रोफाइलचा त्यांना फायदाच होतो."
लाराच्या आगमनानंतर नोंदणी करणाऱ्यांची संख्या 30 टक्क्यांनी वाढल्याचं एका मॅचमेकिंग वेबसाइटनं सांगितलं आहे.
लॉगिन करणाऱ्या नेटिझन्सच्या माहितीवरून लारा योग्य त्या व्यक्तीशी भेट घालून द्यायचा प्रयत्न करते.

फोटो स्रोत, Getty Images
लारा सगळ्यांशी प्रेमानं बोलते. ती कुणाचाही प्रेमभंग करणार नाही. ती अनौपचारिक, मैत्रीपूर्ण आणि सहज वागते. ती काही सोपे प्रश्न विचारते, ज्यांची तुम्ही उत्तरं देता आणि मग ती एक छानसा प्रतिसाद देते.
पण सारा सध्या जास्त बोलण्याइतकी विकसित नाही. जरा काही वेगळा प्रश्न विचारला की ती गोंधळते. हे संभाषण बघा...
"तू कशी आहेस?" मी लाराला विचारलं.
"हॅलो, हॅलो," तिचा प्रतिसाद आला.
"तुला काय आवडतं?" मी विचारलं.
"मला कळलं नाही, तू मुलगा आहेस की मुलगी?" असं विचारत तिनं दोन पर्यायांची बटणं दिली.
"तुला समजलं का मी काय बोलतोय ते?"
"तुमचा इमेल वैध नाही!" असं सांगत लाराने चेहरा पाडला.
त्यानंतर लारा आणि माझ्यात संवाद होऊ शकला नाही. कदाचित आम्ही नव्हतो एकमेकांसाठी.
मॅच वेबसाइटचे झेव्हियर डी बेलनक्स सांगतात, "लोकांना माहिती असतं की, लारा ही खरीखुरी व्यक्ती नाही. आपण एका कॉम्प्युटरशी बोलत आहोत, हे लक्षात ठेऊनच ते लाराशी बोलत असतात."
"लोकांशी एका योग्य आवाजात संवाद साधणं आवश्यक आहे."
"आम्ही लाराला मुलगा किंवा मुलीचं रूप न देता सादर करण्याचा प्रयत्न केला. पण एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व असलेली लारा अधिक आकर्षक होती, असा आमचा अनुभव आहे."
मॅच समूहाने लाराच्या धर्तीवर ज्युलियाची निर्मिती केली आहे, जी 50 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांशी संवाद साधण्यात सक्षम आहे.
पण डेटिंग अॅप्सच्या विश्वात लारासारख्या गोष्टी अजूनही लोकप्रिय का झालेल्या नाहीत?

फोटो स्रोत, Twitter
बॉट्स हा माणूस नाही, हे समजलेली माणसं त्याच्याशी अत्यंत अर्वाच्च भाषेत बोलू शकतात.
मायक्रोसॉफ्टनं 'टे' नावाचं एक ट्विटर बॉट विकसित केलं होतं. पण या बॉटशी बोलणाऱ्या अनेकांनी त्याला वंशद्वेश करायला, शिवीगाळ करायला शिकवलं, आणि मग 'टे'ला एका दिवसात मागे घ्यावं लागलं होतं.
जपानच्या 'द बॉयफ्रेंड मेकर' अॅपवरचे काल्पनिक बॉयफ्रेंड लोकांशी असभ्य भाषेत बोलू लागले आणि मग तातडीने त्यांना शांत करावं लागलं.
एलिक्सर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ल्युडविग कोनराड बुल यांच्यानुसार हे एक प्रकारे एलियन्सकडून या बॉट्सचं अपहरणच आहे.
ते पुढे सांगतात, "जसं तुम्ही रोबोला वागवता, तसंच रोबोही तुम्हाला वागवणार. पण जसजसं तुम्ही एखाद्या माणसाप्रमाणे समजून रोबोशी बोलायला लागाल, तसा तोही तसाच वागेल."
"आणि मग त्या व्यक्तीला रोबोचा राग यायला सुरुवात होते. कारण मनुष्यप्राण्याला एखादा रोबो आपल्यापेक्षा अधिक हुशार आहे, हे पचनी पडणं कठीण जातं", ल्युडविग बुल सांगतात.
मॅचच्या ग्राहकांपैकी बहुतांश लोकांचं लाराशी चांगलं वर्तन होतं, असंही बुल यांनी सांगितलं.
दरम्यान, जोडीदार शोधण्याच्या दृष्टीने लारा पूर्णपणे विकसित झालेली नाही, असं action.ai चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन टेलर सांगतात.
"भाषेच्या बाबतीत लाराला मर्यादा आहेत. अमानवी गोष्टींबरोबरचा संवाद असंच या संभाषणाकडे पाहिलं जातं."
"आजूबाजूच्या माणसांशी आपण जसं बोलतो तसं चॅटबॉटशी बोलणं आवश्यक आहे. तंत्रज्ञान सर्वसमावेशक झालेलं नाही. मात्र लवकरच ही अडचणही दूर होईल," असं टेलर यांनी सांगितलं.
बिझनेसची पुनरावृत्ती
भविष्यात लारासारख्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता वाढू शकते. डेटिंग अॅप्सपेक्षाही मनासारखा जोडीदार शोधून देण्यात लारा निर्णायक भूमिका बजावू शकते.
"ही इंडस्ट्री विचित्र आहे. लोकांना नवी नाती जोडून देण्यात हे माध्यम उपयुक्त ठरू शकतं. लोकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे महत्त्वाचं आहे," असं मार्क ब्रुक्स सांगतात.
iDateचे श्रीनी जनार्दनम यांच्या मते, "डेटिंग कसं करावं, याविषयी चॅटबॉट लोकांना मदत करू शकतात. यामागे मानसिकतेचे खूप सारे पदर आहेत."
"आणि लोकांना जोडीदार मिळाला नाहीच, तर ते अगदी चॅटबॉटशी डेटही करू शकतात", ते मिश्कीलपणे सांगतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








