स्पेनपासून स्वतंत्र कॅटलोनियाचा मुहूर्त लांबणीवर

कॅटलोनियाचा स्पेनपासून वेगळा होण्याचा मुहूर्त तात्पुरता टळला आहे. स्वातंत्र्यासाठीच्या सार्वमताचा कौल आपल्याच बाजूने असल्याचा कॅटलोनियाचा दावा आहे, पण स्पेनने मात्र या सार्वमताला बेकायदेशीर ठरवलं आहे.

कॅटलोनियाचे अध्यक्ष कॅलस पुजडिमाँ यांनी स्पेनपासून स्वातंत्र्याचा जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली असली तरी स्पेनच्या विरोधामुळे हे प्रकरण चिघळण्याती शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या कॅटलोनिया हा प्रदेश नेमका कसा आहे, याबाबत जाणून घेऊयात या 10 गोष्टी.

1. कॅटलोनिया हा ईशान्य स्पेनमधला एक सधन प्रदेश आहे. स्पेनच्या जीडीपीमध्ये या प्रदेशाचा वाटा 19 टक्के आहे.

2. स्पेनतर्फे होणारी 25.6 टक्के निर्यात ही कॅटलोनियातून होते. स्पेनमधील 20.7 टक्के परदेशी गुंतवणूक या प्रदेशात आहे.

3. या प्रदेशाची लोकसंख्या 75 लाख आहे. स्पेनची 16 टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहते.

4. फुटबॉल आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं बार्सिलोना हे शहर कॅटलोनियाची राजधानी आहे.

5. स्वतःची भाषा आणि संस्कृती असलेल्या या प्रदेशाला राजकीय स्वायत्तता आहे. स्पॅनिश घटनेनुसार त्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता नाही.

6. फ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त स्पेनच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

7. कॅटलोनियाचे अध्यक्ष पुजडिमाँ आणि स्पेनचे पंतप्रधान मारियानो रहॉय यांनी हा वाद थांबवावा, असं आवाहन बार्सिलोनाचे महापौर अदा कोल्हाव यांनी केलं आहे.

8. सार्वमत घेण्यावरून गेल्या पाच वर्षांत दबाव वाढला होता. 2015 च्या स्थानिक निवडणुकीत स्वतंत्र राष्ट्राला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या युतीचा विजय झाला. त्याच वेळी स्पेनशी निष्ठा असलेल्या पक्षाला 40 टक्के मतं मिळाली.

9. गेल्या आठवड्यात स्पेन सरकारचा विरोध झुगारून कॅटलोनियामध्ये सार्वमत घेण्यात आलं. त्यात 90 टक्के लोकांनी स्वातंत्र्याला पाठिंबा दिल्याचा दावा कॅटलोनियाच्या नेत्यांनी केला आहे. पण स्पेनच्या संविधान न्यायालयानं हे सार्वमत बेकायदेशीर ठरवलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)