रेड कार्ड ते नवा बॉल : काय आहेत क्रिकेटमधले नवीन नियम

बॅट आणि बॉल यांच्यातील द्वंद आकर्षक होण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बुधवारपासून नवीन नियम अंगीकारत आहे.

हे नियम जूनमध्ये लंडन येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत मांडण्यात आले होते. सदस्यांची मान्यता आणि एलिट पंचांच्या कार्यशाळेनंतर नियमांची अंमबजावणी होणार आहे.

नवे नियम असे असतील

  • बाद होण्याच्या मुद्यावरुन पंचांशी हुज्जत घालणे, प्रतिस्पर्धी खेळाडू, प्रेक्षक यांना उद्देशून शेरेबाजी तसंच शारीरिक मारहाण आणि आचारसंहितेच्या कलमांच्या उल्लंघनासाठी खेळाडूला रेड कार्ड दाखवण्यात येऊ शकते.
  • खेळभावनेला बट्टा लागेल अशा कोणत्याही स्वरुपाच्या वर्तनासाठी रेड कार्ड दाखवण्यात येऊ शकते. पंचांनी रेड कार्ड दाखवल्यानंतर संबंधित खेळाडूला उर्वरित सामन्यात खेळता येणार नाही.
  • बॅटची जाडी फलंदाजांना अतिरिक्त फायदा मिळवून देत असल्याचं निष्पन झाल्यानं बॅटची जाडी निश्चित करण्यात आली आहे.
  • बॅटच्या बुंध्याची जाडी 40 मिलीमीटरपेक्षा अधिक ठेवता येणार नाही तर रुंदी 67 मिलीमीटरपेक्षा अधिक ठेवता येणार नाही.
  • पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा नियम अर्थात डीआरएस प्रणालीनुसार निर्णय आपल्याविरोधात गेला तर दाद मागण्याच्या दोन संधी संपतात.
  • मात्र नवीन नियमानुसार निर्णय चुकला किंवा विरोधात गेला तरी दाद मागण्याची संधी कायम राहील. ट्वेन्टी-20 सामन्यांमध्येही डीआरएस प्रणाली लागू होणार आहे.
  • धावचीतच्या जुन्या नियमांनुसार जर फलंदाजाची बॅट क्रीजच्या वर असेल आणि त्याचवेळी चेंडू यष्टींना लागला तर फलंदाजांना बाद दिले जात असे.
  • आता तसे होणार नाही. चेंडू यष्टींना लागेल त्यावेळी जर बॅट क्रीजच्या वर असेल (जमिनीला लागलेली नसेल तरीही) तर फलंदाजाला बाद देण्यात येणार नाही.
  • सीमारेषेच्या वर असलेला झेल पकडण्यासाठी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडण्यापूर्वी मारलेली उडी सीमारेषेच्या आतून असली पाहिजे. तरच झेल वैध ठरेल.
  • सीमारेषेवर उंच असलेला झेल पकडण्यासाठी सीमारेषेबाहेरून उडी मारून झेल पकडला जातो आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक मैदानात येतो. असं केल्यास तो झेल अवैध ठरेल आणि फलंदाजी करण्याला संघाला चार धावा दिल्या जातील.
  • प्रतिस्पर्धी संघातील क्षेत्ररक्षक किंवा यष्टीरक्षकाच्या हेल्मेटला लागून चेंडू उडाला तर अशा चेंडूवर फलंदाज झेलबाद, यष्टीचीत किंवा धावचीत होऊ शकतो.
  • जर एखादया खेळाडूला पंचांनी बाद दिले असेल तर नवा चेंडू टाकण्यापूर्वी त्याला पुन्हा मैदानात बोलावण्याचा अधिकार पंचांना असेल. यापूर्वी खेळाडूने मैदान सोडले की त्याला पुन्हा बोलावता येत नसे.

कसोटी क्रिकेटमधील नियमांत होणारे बदल

  • प्रत्येक संघाला सहा राखीव खेळाडू जाहीर करता येतील. आता चार खेळाडूच जाहीर करता येतात.
  • यष्टींवरील बेल दोरीनं जोडले जाणार. यष्टीरक्षकांना झालेल्या गंभीर दुखापतींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यजमान बोर्ड यासंदर्भात अंतिम निर्णयाचे अधिकार.
  • दिवसाचे संत्र संपण्यापूर्वी तीन मिनिटे आधी विकेट पडल्यास ब्रेकचा निर्णय. आता दोन मिनिटांचा नियम आहे.
  • गोलंदाजानं चेंडू टाकल्यावर पॉपिंग क्रीझमध्ये पोहचण्यापूर्वी एक टप्पा पडला तरी नोबॉल देण्यात येईल. आता दोन टप्प्यानंतर नोबॉल देण्यात येतो.
  • नोबॉलवर बाईज किंवा लेगबाइज धाव झाल्यास त्यांची गणना स्वतंत्रपणे होईल. नोबॉल गोलंदाजाच्या नावावर आणि त्या चेंडूवर निघालेल्या धावा अवांतर म्हणून मोजल्या जातील. आता अशा धावांची नोंद नोबॉलमध्येच होत असे.
  • हँडल द बॉल अर्थात चेंडू हाताळणे ही संकल्पना रद्द होईल. क्षेत्ररक्षणात अडथळा अंतर्गत हे सामावले जाईल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)