मित्रपरिवाराकडून वर्गणी घेऊन नवरोबा चढणार बोहल्यावर

लग्न करायला चिक्कार पैसा लागतो. आयुष्यातला इतका मोठा दिवस म्हणून थाटही हवा, पण एका दिवसाचंच लग्न म्हणून किती पैसा खर्च करावा कळतंच नाही.

पण इंगलंडमधील एका भावी नवरदेवानं एक भारी शक्कल लढवली आहे. 'क्राऊडफंडींगच बिझनेस'च्या आजच्या जमान्यात तो आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून पैसे गोळा करून लग्न करायला निघाला आहे.

नवरदेव बेन फरीनाचं बिजनेस मॉडल सोपं आहे. त्यानं प्रत्येक पाहुण्याकडून 150 पाउंड ( अंदाजे 13 हजार रुपये) घेतले. त्यांचं लग्न पुढील वर्षी जूनमध्ये होणार आहे, पण त्यांनी आत्ताच सर्व बुकिंग करून ठेवलं आहे.

"माझं लग्न एखाद्या शाही सोहळ्यासारखं असणार आहे. सर्वांसाठी ते एखाद्या पर्यटनस्थळी जाऊन सुट्टीचा आनंद घेतल्याप्रमाणं असणार आहे," असं बेननं बीबीसीला सांगितलं.

त्यानं क्लेअर मोरन हिला लग्नासाठी मागणी घातली. त्याला तिनं होकारही दिला. डर्बीशायरच्या एका रिसॉर्टमध्ये त्यांनी लग्न करायचं ठरवलं. पण ते त्यांच्या बजेटमध्ये बसत नव्हतं.

तेव्हा बेन यांनी एका बिजनेस मॉडलची आखणी केली. लग्नाला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याकडून 150 पाउंड घ्यायचे, असं त्यांनी ठरवलं. त्याबदल्यात त्यांना त्या रिसॉर्टमध्ये तीन दिवस सुट्टी घालवता येईल, असं ऑफर होती.

रिसॉर्ट तसं आलिशान आहे -- स्विमिंग पूल आहे, गेम रूम आहेत, स्पा आहेत. त्यामुळं नातेवाईंकाना आणि मित्र मंडळींना ही कल्पना आवडली.

"मी तिला मागणी घालण्यापूर्वीच सर्व विचार केला होता. जेव्हा मी क्लेअरला सांगितलं की आपण रिसॉर्टमध्ये लग्न करू तेव्हा ती म्हणाली, हे आपल्याला परवडणार नाही. पण मी सर्व आखणी केली होती."

''मी 60 जणांना निमंत्रण पाठवलं आणि त्यांना ही कल्पना सांगितली. त्या सर्व लोकांनी लग्नाला येण्याचं निमंत्रण स्वीकारलं त्याबरोबरचं माझ्या खात्यात पैसेही जमा केले."

कसं आहे लग्नाचं नियोजन?

  • नॉकरडाउन कॉटेज हे लग्नस्थळ आहे. इथलं तीन दिवसांचं भाडं आहे 10,000 पाउंड (अंदाजे साडे आठ लाख रुपये)
  • लग्नाला 60 निमंत्रित आहेत त्यांच्याकडून येणार आहेत प्रत्येकी 150 पाउंड्स म्हणजेच एकूण 9,000 पाउंड.
  • लग्नाला येणाऱ्या पालकांसोबत 20 लहान मुलं येणार. त्यांच्या पालकांकडून प्रत्येकी 50 पाउंड घेतले जातील, म्हणजे एकूण 1,000 पाउंड होतील.
  • नवरदेवाचे आई वडील लग्नाला 1,250 पाउंड देणार आहेत.
  • दोघं नवरदेव-नवरी मिळून लग्नात 2,000 पाउंड खर्च करणार आहेत. जेवण, ड्रिंक्स, कपडे यावर हा खर्च होईल.
  • लग्नाच्या दिवशी लागणारे ड्रिंक्स नवरदेव-नवरीकडून असतील. पण जर तुम्हाला त्या वीकएंडला ड्रिंक हवं असेल तर तुम्ही सोबत घेऊन येऊ शकता, असं त्यांनी निमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे.
  • नवरदेवाचे वडील शेफ आहेत. लग्नाच्या दिवशी ते स्वतः सगळा स्वयंपाक करणार आहेत. तसंच नवरदेवाचा मित्र गायक आहे. त्यानंदेखील त्या दिवशी मोफत गाण्याचं ठरवलं आहे.

"बरेचदा लग्नासाठी मोठा खर्च केला जातो. तसंच त्या लग्नाला जाण्या-येण्यासाठी पाहुण्यांनाही खर्च करावा लागतो. तेव्हा मला वाटलं आपण नुसतं लग्नापुरती ही गोष्ट मर्यादित न ठेवता आपल्या पाहुण्यांना एक हॉलिडे पॅकेज द्यावं," असं बेन सांगतो.

"आणि हीच गोष्ट मी रिसोर्टच्या व्यवस्थापनाला सांगितली. त्यांनी 10,000 पाउंड मध्ये तीन दिवसाचं पॅकेज पुरवण्याची तयारी दाखवली आणि मी बुकिंग केलं."

पण या सगळ्यावर बेनची होणारी पत्नी काय म्हणते? ती जाम खूश आहे.

"आम्हाला इतकं महागडं लग्न परवडणार की नाही, ही शंकाच होती. आपण रजिस्टर मॅरेज करू, असं मीच त्याला म्हटलं होतं. पण बेननी छान योजना आखली आहे. आता मी आमच्या लग्नाची आतुरतेनी वाट पाहत आहे," असं क्लेअर म्हणाली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)