महाराष्ट्र विधिमंडळातील गोंधळाच्या 5 घटना : विधानसभा अध्यक्षांना पेपरवेट फेकून मारणे ते मुख्यमंत्र्यांना धक्काबुक्की

विधिमंडळातील दृश्य
    • Author, स्नेहल माने
    • Role, बीबीसी मराठीसाठी

विधिमंडळात वाद-विवाद हे नेहमीच होताना दिसतात. कधी गोंधळ, कधी घोषणाबाजी, कधी सभात्याग या गोष्टी पण दिसतात पण बुधवारी ( 24 ऑगस्ट) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चक्क धक्काबुक्की झाली. त्यानंतर ती कुणी सुरू केली यावरून तू-तू-मैं-मैं देखील झाली.

पण महाराष्ट्राच्या विधानसभेच अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाहीये. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून असे प्रसंग महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत. महाराष्ट्रातल्या विधिमंडळात घडलेल्या गदारोळाच्या घटना या निमित्ताने आपण पाहू.

1. पेपरवेट अध्यक्षांच्या दिशेने भिरकावला गेला तेव्हा...

यातली पहिली घटना घडली होती 1964 च्या दरम्यान. वेगळ्या विदर्भाचं आंदोलन म्हटलं की जांबुवंतराव धोटे यांचे नाव चटकन डोळ्यासमोर येते.

त्याचबरोबर समोर येत ती त्यांची धिप्पाड शरीरयष्टी. धोटे त्यांच्या समर्थकांमध्ये खूप लोकप्रिय होते आणि एक धाडसी नेते म्हणून त्यांची ख्याती होती.

पण या त्यांच्या धाडसामुळेच एकदा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर निलंबित झालेले ते पहिलेच आमदार ठरले होते.

ही घटना 1964च्या दरम्यान घडली होती. विधानसभेत काँग्रेसचं वर्चस्व होतं. त्यामुळे साहजिकच सभागृहात काँग्रेसचा आवाज बुलंद होता.

तुलनेने इतर पक्षांना आपलं म्हणणं मांडायला संधी मिळायची नाही. एकट्याने खिंड लढवणाऱ्या जांबुवंतरावांची अवस्था देखील अशीच काहीशी व्हायची.

जांबुवंतराव धोटे

फोटो स्रोत, Instagram/Kranti Dhote Raut

यामुळे बऱ्याचदा जांबुवंतराव धोटे यांची चिडचिड व्हायची. पण ते संयमाने घ्यायचे. असंच एकदा सभागृहात धोटेंनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उचलून धरला. विधानसभेत गदारोळ सुरु झाला. सर्वांनीच यावर विरोध दर्शवला.

पण जांबुवंतराव सुद्धा आपला मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होते. विधानसभा अध्यक्ष असलेले बाळासाहेब भारदे त्यांना जागेवर बसा, शांत रहा असं सांगत होते.

विधानसभा अध्यक्षांची ही गोष्ट जांबुवंतरावांना आवडली नाही, ते संतापले. त्यांचा राग इतका अनावर झाला की त्यांनी आपल्या हातातले कागद अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले आणि पेपरवेट उचलून सरळ सरळ अध्यक्षांच्या दिशेने मारला.

हा पेपरवेट कोणाला लागला नाही, मात्र सभागृहाची प्रतिष्ठा राखली नाही म्हणून स्वत: मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी धोटेंच्या विरोधात हकालपट्टीचा ठराव मांडला. विरोधकांनी या ठरावाला विरोध केला मात्र तरीही जांबुवंतराव धोटे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं.

2. मुख्यमंत्र्यांनाच धक्काबुक्की

माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांची अल्पजीवी कारकीर्द अनेक वादळी घटनांनी भरलेली होती. बाबासाहेब भोसलेंची मुख्यमंत्रिपदासाठी निवड कशी झाली याबद्दलच्या सुरस कथा आजही सांगितल्या जातात.

मिश्किल स्वभावाचे बाबासाहेब भोसले दिल्लीच्या सल्ल्यानेच प्रत्येक निर्णय घ्यायचे. त्यामुळे ते राज्यकारभार चालवण्याबद्दल गंभीर नाहीत अशी देखील चर्चा व्हायची.

माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले

फोटो स्रोत, BBC VISUAL JOURNALISM

फोटो कॅप्शन, माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले

ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे सांगतात की, "बाबासाहेब भोसले यांच्या कार्यशैलीवर काँग्रेसचे अनेक आमदार नाराज होते. यातूनच एकदा त्यांच्या विरोधात काँग्रेस आमदारांनी बंड पुकारलं होतं. हे बंड दिल्लीच्या पक्ष श्रेष्ठींनी कसंबसं थोपवलं मात्र बाबासाहेब भोसले यांनी यावर प्रतिक्रिया देताना 'बंडोबा थंडोबा' झाले असं म्हटलं. या वक्तव्यानंतर मात्र त्यांच्या विरुद्धची नाराजी प्रचंड वाढली.

"त्यावेळी विधिमंडळात खूप मोठे वाद झाले. काँग्रेसच्या आमदारांची विधानसभेतच एक मीटिंग बोलवण्यात आली. तिथे देखील मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा भरपूर अपमान करण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून सभागृहातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात चक्क बाबासाहेब भोसले यांनाच धक्काबुकी झाली होती," असं आसबे यांनी सांगितलं.

3. 'भूखंडाचे श्रीखंड लाटणारे सरकार'चे बॅनर

शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे, मुंबईचे महापौर म्हणून आपली छाप सोडणारे छगन भुजबळ 1985 च्या निवडणुकीनंतर आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले होते.

त्यावेळी भुजबळ हे एकमेव शिवसेनचे आमदार होते. त्यांच्याकडे विधिमंडळातील शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून पाहिलं जायचं. भुजबळ विधिमंडळात पोहोचल्यानंतर त्यांचा लढाऊ बाणा लक्षवेधी ठरला. आपल्या आक्रमक वक्तृत्वामुळे ते विरोधकांवर हल्ला चढवत.

माजी मंत्री छगन भुजबळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी मंत्री छगन भुजबळ

दरम्यान शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी भूखंडावरील आरक्षण उठवलं. यावरून सभागृह तापलं होतं. हा प्रश्न भुजबळांना ही सभागृहात मांडायचा होता पण ते एकमेव आमदार असल्यामुळे त्यांना बोलायला वेळच दिला जात नव्हता.

शेवटी भुजबळांनी शक्कल लढवली. त्यांनी 'भूखंडाचे श्रीखंड लाटणारे सरकार' असा बॅनर आपल्या बाकासमोर लावला. त्यांच्या या कृतीमुळे मार्शलकरवी त्यांना बाहेर हाकलण्यात आलं.

पण भुजबळांनी सदनाबाहेर येऊन पुन्हा बॅनर लावला आणि त्यांचं म्हणणं मांडलं. भुजबळांच्या या युक्तीने संपूर्ण राज्यभर हा प्रश्न पोहोचला आणि गाजला.

या प्रसंगानंतरच विधिमंडळात बॅनरची परंपरा सुरू झाली असं भुजबळ अनेकवेळा पत्रकार परिषदांमध्ये हसत हसत सांगतात.

4. राम कदमांनी अबू आझमींच्या कानशिलात लगावली आणि...

2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती.

शिवसेना-भाजप युती आणि सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं तगडं आव्हान 2009 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर होतं.

राज ठाकरेंनी सभा गाजवल्या, वातावरण निर्मिती केली. आणि सगळ्यांना धक्का देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आले. मुंबईत शिवसेनेपेक्षा जास्त जागा मनसेच्या आल्या होत्या.

राम कदम

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, आमदार राम कदम

यावेळी निवडून आलेल्या आमदारांनी मराठीतच शपथ घ्यावी असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. तसंच मराठीतून शपथ न घेतल्यास माझे आमदार काय करतील ते विधिमंडळ पाहील, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

मात्र राज ठाकरे यांच्‍या आवाहनाला धुडकावून हिंदीतूनच शपथ घेणार असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटलं. प्रत्यक्ष शपथविधी सोहळा सुरू झाल्यावर आझमी यांनी हिंदीतूनच शपथ घ्यायला सुरुवात केली. त्या वेळी मनसेच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.

मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी तर आझमी यांच्या समोर असलेला माईक हिसकावून घेतला, एका हातानेच त्यांनी पोडियम उचलला. शपथ घेऊन आझमी खाली उतरत असताना मनसे आमदार राम कदमांनी आझमींच्या कानशिलात लगावली.

काही आमदारांनी धक्काबुक्की केली असे आरोपही झाले. पुढे संसदीय कामकाज मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून प्रस्ताव मांडला. नंतर मनसेच्या राम कदम, रमेश वांजळे, वसंत गीते आणि शिशिर शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. विधिमंडळाच्या इतिहासात शपथ घेताच निलंबन होण्याची ही पहिलीच घटना असावी.

5. नितेश राणेंचं म्यांव, म्यांव..

अगदी मागच्याच वर्षी घडलेलं म्याव म्याव प्रकरण तसं सगळ्यांच्याच ओळखीचं. महाविकास आघाडी सरकार सत्तेतवर आल्यानंतर डिसेंबर 2021 चं हिवाळी अधिवेशन सुरू होतं.

नितेश राणे
फोटो कॅप्शन, आमदार नितेश राणे

या अधिवेशनाचा दुसराच दिवस होता आणि विरोधकांकडून अनेक मुद्द्यांवर आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यांवर सुरू होतं. दरम्यान आमदार नितेश राणेदेखील यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.

भाजपा आमदारांकडून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी 'म्यांव म्यांव' असा आवाज द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

आता वाघाची डरकाळी फोडण्याचे दिवस गेले म्हणून 'म्यांव म्यांव' हेच योग्य वाटतं असं नितेश राणेंनी म्हटलं होतं.

विधिमंडळात याचे पडसाद उमटले होते. नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)