संजय राऊतांनी सुरक्षेशिवाय येऊन दाखवावं, गोगावलेंचं आव्हान #5मोठ्याबातम्या

सुरक्षेशिवाय येऊन दाखवा- संजय राऊतांना गोगावलेंचं आव्हान

फोटो स्रोत, Getty Images

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा...

1. सुरक्षेशिवाय येऊन दाखवा- संजय राऊतांना गोगावलेंचं आव्हान

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळल्य़ावर शिवसेनेतील अंतर्विरोध आता ठळक होऊ लागला आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटावर आगपाखड केल्यानंतर आता शिंदे गटानेही राऊत यांचे नाव घेऊन टीका करायला सुरुवात केली आहे.

संजय राऊत यांच्यावर शिवसैनिक नाराज असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी वारंवार बोलून दाखवले आहे.

आता हा वाद मुंबईतून कोकणात सरकत आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी राऊतांना आव्हान दिले आहे. याचे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले आहे.

'मी त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांविना महाडमध्ये येण्याचे आव्हान देतो,' असं विकास गोगावले म्हणाले आहेत.

2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्रीच गोव्यात दाखल

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर मध्यरात्रीच गोवा गाठलं. गेले नऊ दिवस त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांची त्यांनी भेट घेतली. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Eknathshindeoffice

'मध्यरात्री सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केलं. यावेळी पेढे वाटण्यात आले. माझ्यासोबत असणाऱ्या 50 आमदारांच्या विश्वासामुळे आजचा दिवस उगवला असून तो अनपेक्षित असा आहे असं राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाचा फायदा या सरकारला होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.'

3. मणिपूरमध्ये दरड कोसळून 8 ठार, ढिगाऱ्याखाली 43 लष्करी जवान

मणिपूरमध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेचे सविस्तर वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले आहे.

मणिपूरमध्ये नॉनी जिल्ह्यात दरड कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला, तर 72 जण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. मृतांमध्ये लष्करी जवानांचा समावेश आहे. तुपूल यार्ड रेल्वे बांधकाम छावणीजवळ ही दरड कोसळली.

तुपूल यार्ड रेल्वे बांधकाम छावणीत भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात होती. गुरुवारी सकाळी भूस्खलन झाल्यानंतर त्याखाली या छावणीतील लष्करी जवान आणि कर्मचारी दबले गेले. ढिगारा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून गुरुवारी सायंकाळपर्यंत आठ मृतदेह सापडले असून त्यापैकी सात जण लष्करी जवान आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ढिगाऱ्याखाली 72 जण अडकले असून त्यापैकी 43 जण लष्करी जवान आहेत, अशी माहिती देण्यात आली.

4. मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

मुंबईत आज 1 जुलैरोजी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. याबाबतची बातमी एबीपी माझाने दिली आहे.

कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुरूवारी मुंबईत सलग 12 तास पाऊस झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाणी साचले आहे. पहिल्यास मुसळधार पावसात मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

5. पाडले कोणास? पडले कोण?

मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस असा बदल महाराष्ट्राच्या राजकारणात झाल्यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येऊ लागले.

देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे

या निर्णयाने नक्की काय साध्य होईल यावर राजकीय तज्ज्ञ अजूनही विचार करत आहेत. भाजपाने आपल्या नेत्याला सरकारमध्ये जाण्याचा आग्रह का धरला असेल याचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न पत्रकार आणि राजकीय अभ्यासक करत आहेत.

भाजपाच्या या अनाकलनीय निर्णयावर लोकसत्ताने पाडले कोणास, पडले कोण असे संपादकीय लिहिले आहे. या संपादकीयात महाराष्ट्राच्या गेल्या आठवड्याभराच्या राजकीय घडामोडींचा आणि एकनाथ शिंदे यांच्या नव्या जबाबदारीचा आढावा घेण्यात आला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)