देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची कारणं काय?

एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
    • Author, हर्षल आकुडे,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून 'पुन्हा येतील', असं जवळपास सर्वांनीच गृहित धरलं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपदावर बसवलं आहे.

आज (29 जून) राजभवनावर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, "एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपा आमदार समर्थन देतील. साडेसात वाजता त्यांचा शपथविधी होतील. नंतर इतर मंत्री शपथ घेतील."

ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण फडणवीसांच्या राजकीय डावपेचांमध्ये शिंदे यांची लॉटरी लागली असून थेट मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांना मिळाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देण्यामागे त्यांची काय रणनीती आहे, याविषयी बीबीसी मराठी राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली.

'शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं'

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असताना फडणवीस-शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

"बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरण्याचं 'पुण्य' तुम्हाला लागेल, तर तुमच्यावर विश्वास ठेवण्याचं 'पाप' माझ्या माथी लागेल," असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं.

एकनाथ शिंदे

संजय राऊत यांनीही याबाबत उल्लेख करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. "महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. पण एकनाथ शिंदे शिवसेनेचा मुख्यमंत्री करू शकतील का," असा प्रश्न राऊत यांनी केला होता.

फडणवीसांनी या टीकेचं अगदी चपखल उत्तर आपल्या कृतीतून दिल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहणारे प्रकाश पवार यांच्या मते, "शिवसैनिकाला मुख्यमंत्री आपण केलं, हे दर्शवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ही खेळी खेळली आहे. जेणेकरून शिवसेनेविरोधातली लढाई सोपी जाईल. बंडखोर एकत्र राहतील, हा त्याचा फायदा होऊ शकेल."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या डावपेचाचं विश्लेषण करताना ते सांगतात, "महाराष्ट्रात ठाकरे नावाचा ब्रँड आहे. सध्या ठाकरेच सत्तेवरून बाहेर गेले आहेत. शिवसेना हा केडर बेस पक्ष असल्याने ही प्रक्रिया राज्यभरात भाजपच्या विरोधात जाणारी आहे. म्हणूनच त्यांनी हा डाव खेळला. ठाकरे ब्रँड आम्ही पुसला नाही. ठाकरेंच्याच पक्षात घडलेले एकनाथ शिंदे हे शिवसैनिक महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून दिले, हा त्यांच्या डावपेचाचा पहिला आणि महत्त्वाचा भाग आहे," असं पवार म्हणतात.

शिवसेनेला खेचून घेण्यासाठी

ज्येष्ठ राजकीय विश्लेषण आणि पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते, हा शिवसेनेला खेचून घेण्यासाठी शिवसेनेच्याच शस्त्राने शिवसेनेवर करण्यात आलेला वार आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं ते सांगू शकतील. नंतर होणाऱ्या टीकेला त्यांनी आधीच उत्तर दिलं आहे."

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, CMO MAHARASHTRA

ते सांगतात, "एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उरलीसुरली जी शिवसेना आहे. तीसुद्धा आपल्या बाजूने खेचून घेण्याचा विचार फडणवीस यांच्या डोक्यात सुरू असू शकेल. जेणेकरून ज्या शिवसेनेने धोका दिला, तिला धडा शिकवणं हा एक उद्देश असू शकतो. दुसरा उद्देश म्हणजे, प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या राजकारणाचा तो भाग असू शकतो."

विजय चोरमारे यांच्या मते, "शिवसेना खेचून घेणं, याचा दुसरा एक अर्थ असाही काढता येऊ शकेल. तो म्हणजे, शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आल्याने इतर शिवसैनिक त्यांच्या पाठिशी येऊ शकतात. आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री केला. तुम्ही का लांब राहता, म्हणून शिवसेनेला पुन्हा जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकेल."

चोरमारे यांनी पुढं म्हटलं, "याचं कारण म्हणजे, लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा वेळी शिवसेनेला सोबत घेणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. शिवसेना भाजपसोबत आल्यास 1 अधिक 1 याचं उत्तर 11 असं होऊ शकतं. पण तेच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत असल्यास 1 अधिक 1 याचं उत्तर 11 होणार नाही, याची भाजप नेतृत्वाला कल्पना आहे. राजकारणात काहीही शक्य आहे, त्यामुळे म्हणून झालं गेलं विसरून जा, इथून पुढे सोबत राहू, असाही एक संदेश त्यांना शिवसेनेला नंतर देता येऊ शकेल."

किंग मेकर फडणवीस

2 वर्षे 4 महिने रिक्त असलेलं पद स्वीकारून फडणवीस यांना किंग बनता आलं असतं. पण त्यांनी 'किंग मेकर' बनणं सध्याच्या स्थितीत योग्य समजलं, असं प्रकाश पवार म्हणाले.

याविषयी बोलताना पवार म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनीच पुढे आणलं याचा अर्थ त्यांचं मंत्रिमंडळ हे फडणवीसांचंच मंत्रिमंडळ असणार आहे. म्हणजेच, फडणवीस यांना किंग नव्हे तर 'किंग मेकर' किंवा 'रिमोट कंट्रोल' व्हायचं आहे."

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, facebook

शिंदे यांच्या नियुक्तीतून त्यांनी आपणच महाराष्ट्राचा खरा नेता आहोत, बाकी कुणी महाराष्ट्राचे नेते नाहीत, असं त्यांना दर्शवायचं आहे.

विश्लेषकांच्या मते, "सध्याच्या सरकारवर कोर्ट-कचेऱ्या यांची टांगती तलवार आहे. आगामी काळात कदाचित स्थैर्य आल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतीलही. पण सध्या तात्पुरता का होईना त्यांनी या पदापासून दूर राहायचं ठरवलं.

आता ते मुख्यमंत्री झाले असते तर फडणवीस उतावळे आहेत, असं चित्र होऊ शकलं असतं. पण त्यांना पदाची लालसा नाही, असं दाखवून त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा डाग पुसण्याचा प्रयत्नही केला आहे, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.

याचं कारण म्हणजे, सर्वोच्च पदाचा त्याग करणं ही भारतीय समाजात सर्वश्रेष्ठ गोष्ट मानली जाते. सोनियांनी हा त्याग केला होता. त्यामुळे त्यांची प्रतिमा उजळली होती.

'बॅड पीचवर बॅटिंगसाठी शिंदेंना पाठवलं'

प्रकाश पवार यांच्या मते, "गव्हर्नन्सच्या तुलनेच्या मुद्द्यामुळेही फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना संधी दिलेली असू शकते. कारण उद्धव ठाकरे सत्तेवरून गेले असल्यामुळे त्यांच्याशी सतत तुलना होत राहणार, हे निश्चित. पँडेमिकचा काळ प्रचंड आव्हानात्मक होता. उद्धव ठाकरेंनी या काळात आपल्या कामाने चांगली छाप पाडली.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील

इतकंच नव्हे तर शेवटच्या दिवशी तर त्यांनी कळसच केला. औरंगाबाद-उस्मानाबादचं नामांतर, दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इतरही त्यांचे काही मोठे आणि चांगले निर्णय आहेत. यामुळे तुलना होणार हे नक्की. म्हणूनच याचा विचार करून फडणवीसांनी शिंदेंना बॅड पीचवर खेळण्यासाठी पाठवलं आहे."

प्रकाश पवार यांनी या निर्णयातल्या अडचणीही सांगितल्या.

"शिंदेंकडे मुख्यमंत्रिपदाचा अनुभव नाही. शिवाय, प्रभावी वक्तृत्व किंवा करिश्मा यांच्यासाठीही त्यांना ओळखलं जात नाही, या पार्श्वभूमीवर काय अडचणी येऊ शकतात, या प्रश्नाचं उत्तर देताना प्रा. पवार म्हणाले, "शिंदे मुख्यमंत्री म्हणून प्रभावी ठरले नाहीत, तर भाजपवर त्याचा खास परिणाम होईल, असं वाटत नाही. कारण त्यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कामाची तुलना केली जाईल. शिवाय, गव्हर्नन्सच्या मुद्द्यावर फडणवीस त्यांना पदावरून दूर करू शकतील, किंवा पुन्हा निवडणुकाही घेण्यात येऊ शकतात."

मराठा 'कॉन्फिडन्सी'चं राजकारण

देवेंद्र फडणवीस गेल्या काही वर्षांपासून मराठा लॉबीचं राजकारण करत आहेत. त्याचाही हा एक भाग असू शकतो, असंही प्रा. प्रकाश पवार यांना वाटतं.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, facebook

ते म्हणतात, "मला वाटतं, देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा प्रोजेक्ट आपल्या हाती घेतला आहे. या प्रोजेक्टमध्ये त्यांना ओबीसीपेक्षा मराठा समूह राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. याला मराठा कॉन्फिडन्सी असं संबोधतात. म्हणजे पहिल्या बाजीरावांच्या काळात मराठा कॉन्फिडन्सी राज्यात निर्माण झाली होती."

"मराठा कॉन्फिडन्सीचा अर्थ ही मराठा नेत्यांची एक प्रकारची लॉबींग आहे. उदाहरणार्थ, विखे-पाटील, मोहिते पाटील, महाडिक, भोसले आणि आता शिंदे यांच्यासारखे मोठे नेते त्यांनी आपल्या बाजूने उभे केले आहेत.

फडणवीसांचा हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर कदाचित पुढच्या 20 वर्षांत भाजपचीच सत्ता असेल. हा त्यांचा दूरदृष्टीचा आणि लांब पल्ल्याचा प्रोजेक्ट असेल. या प्रोजेक्टसाठी फडणवीसांनी हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असणार आहे. "

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)