CA Day च्या निमित्ताने ओळख करून घ्या 'या' तरुण वित्त सल्लागारांची.. नक्की फायदा होईल

रचना रानडे, युट्यूबर, सोशल मीडिया
फोटो कॅप्शन, रचना रानडे
    • Author, निखील इनामदार आणि आयुषी शहा
    • Role, बीबीसी न्यूज

दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊन आला आणि मुंबईतल्या अनेक फिल्म स्टुडियोचं शटरही डाऊन झालं. त्यावेळी 23 वर्षांचे फिल्ममेकर शिवम खत्री यांनी शाळा किंवा कॉलेजमध्ये जे शिकलं नाही, असं काहीतरी शिकण्याचा इरादा पक्का केला.

त्यांनी मनी मॅनेजमेंट शिकायचं ठरवलं. अनेक पुस्तकं त्यांनी वाचली, अनेक ट्युशन क्लासेसच्या चकरा मारल्या. पण, लवकरच त्यांच्या असं लक्षात आलं की यूट्यूबवरचे तरुण फायनान्स म्हणजेच वित्तविषयक कॉन्टेट क्रिएटर अगदी आजच्या तरुणाची भाषा बोलतात.

खत्री सांगतात, "त्यांचे व्हिडियो खूप साधे-सुलभ असतात आणि समजण्यासाठी सोपे असतात. शिवाय, ते वेगवेगळ्या विषयांवर बोलतात."

खत्री यांच्या आवडत्या फायनॅनशिअल कॉन्टेट क्रिएटर होत्या रचना रानडे. रचना रानडे यांचे व्हिडियो ते अगदी मन लावून बघत. रचना रानडे या किचकट आर्थिक संज्ञा अगदी सोप्या शब्दात उलगडून सांगतात. त्यांच्या मिश्कील, खुशखुशीत आणि गमतीशीरपणे पद्धतीने विषय मांडण्याच्या शैलीमुळे अल्पावधितच त्यांना मोठा फॅन फॉलोविंग मिळाला. यू-ट्युबवर त्यांचे 35 लाख फॉलोवर्स आहेत. भारतातील तरुण टेक-सॅव्ही गुंतवणूकदारांमध्ये सोप्या भाषेत मिळणाऱ्या अर्थज्ञानाविषयीची किती उत्सुकता आहे, याचा हा पुरावा.

रचना रानडे यांच्या पुण्यातल्या स्टाईलिश ऑफिसमधल्या भिंतींवर त्यांच्या यूट्युबवरच्या कारकिर्दीच्या प्रगतीचा आलेख लक्ष वेधून घेतो. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांनी पहिला व्हिडियो यूट्युबवर अपलोड केला आणि अवघ्या पाच महिन्यात त्यांचे 1 लाख फॉलोअर्स बनले. तेव्हापासून त्यांची वाढ प्रकाशाच्या वेगाने झाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आज त्या कुठेही गेल्या की एखाद्या बॉलीवुड स्टार किंवा क्रिकेट खेळाडूंसारखं त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आणि त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक त्यांना अक्षरशः गराडा घालतात.

स्वतः रचना रानडे बॉलीवुड चित्रपटांच्या जबरदस्त फॅन आहेत. त्यांनी त्यांचा आवडता सुपरस्टार शाहरुख खानच्या सिनेमातले कोट्स ऑफिसच्या भिंतींवर लावले आहेत. बोजड आर्थिक संकल्पना सहज समजवून सांगण्यासाठी त्या या कोट्सचा वापर करतात. उदाहणार्थ शाहरुखच्या 'कल हो ना हो' या सिनेमातला एक डायलॉग त्यांनी ऑफिसमधल्या भिंतीवर लावला आहे. कल हो ना हो म्हणजे आयुष्यात उद्याचा दिवस येईल की नाही, सांगता येत नाही. जीवन विमा घेणं का गरजेचं आहे, हे समजवून सांगण्यासाठी त्या हा कोट वापरतात.

युट्यूबर, सोशल मीडिया
फोटो कॅप्शन, अंकुर वारिकू

या सगळ्यामागे 'फायनान्स - सोप्या भाषेत' हा एकच मंत्र असल्याचं त्या सांगतात.

आणि भारतातल्या तरुण गुंतवणूकदारांना हेच तर हवंय. भारतातल्या लाखो तरुण-तरुणींनी लॉकडाऊनच्या काळात तेजीत असणाऱ्या भांडवली बाजारात हात आजमावण्यासाठी ट्रेडिंग खाती उघडली आणि यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळालं ऑनलाईन उपलब्ध असलेल्या गुंतवणूकविषयक सेवांचं.

मात्र, एका अधिकृत सर्व्हेनुसार प्रत्येकी 10 पैकी केवळ 3 भारतीयच अर्थसाक्षर आहेत. यांना शेअर मार्केटमध्ये सहज पैसा कसा कमवायचा, हे शिकण्याची जिद्द आहे किंवा एका रात्रीतून अब्जाधीश करणाऱ्या यूनिकॉर्न कंपन्याचं गणित त्यांना शिकायचं आहे.

अर्थ विश्वाची ओळख करुन घेण्यासाठी इच्छुक आणि उत्सुक याच लाखो भारतीयांमुळे सोशल मीडियावर फायनॅन्शिअल कॉन्टेटने अल्पावधित लोकप्रियतेचं शिखर गाठलं.

युट्यूबर, सोशल मीडिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना काळात अनेक तरुणांनी ट्रेडिंग अकाऊंट्स उघडली

सोशल मीडियावरील असेच एक Influencer आहेत अंकुर वारिकू. अंकुर वारिकू स्वतः एक उद्योजक आणि सोशल मीडियावर अर्थ क्षेत्रातील Influencerआहेत. आपल्या व्हिडियोमध्ये ते पर्सनल फायनान्स, उद्योजकता आणि प्रॉडक्टिव्हिटी हॅक्स संबंधी माहिती देतात. ते म्हणतात, "भारतात आज जेन-Z आणि मिलेनिअलर्ससाठी यू-ट्युब म्हणजे एक विद्यापीठ बनलं आहे."

अंकुर वारिकू यांच्या अफाट लोकप्रियतेमुळेच त्यांच्या 'द एपिक शीट' या पहिल्या पुस्तकासाठी लगेच प्रकाशकही मिळाले.

वारिकू यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाल्याचा समज आहे. मात्र, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून जवळपास दशकभरापासूनच प्रवास सुरू केल्याचं ते सांगतात. मात्र, कोव्हिडमुळे आलेला लॉकडाऊन त्यांच्या करिअरसाठी टर्निंग प्वॉईंट ठरला.

ते सांगतात, "उत्तम कॉन्टेन्टमध्ये अचानक मोठी वाढ झाली. या कॉन्टेन्टसाठी हातात पैसा आणि वेळ असेलला प्रेक्षकही उपलब्ध होता आणि बाजारही अनुकूल होता. मार्केटमध्ये पडझड सुरू असती तर मात्र तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्यासाठी संघर्ष करावा लागला असता."

वारिकू यांच्या मते स्वस्त डेटा, इंटरनेटचा वाढता वापर आणि जेन-Z आणि मिलेनिअल्सचं टीव्ही आणि प्रिंट मीडियापासून डिजिटल मीडियाकडे झालेलं स्थित्यंतर हे एक 'प्रभावी मिश्रण' ठरलं ज्यामुळे आज हे यश बघायला मिळतं.

ते म्हणतात 'पैसा' हा विषय तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला. "हा एक असा विषय आहे जो समजून घेण्याची आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते. पण, तशी संधी फारशी मिळालेली नसते."

भारतात अनेक वर्षांपासून शेअर बाजाराच्या रिअल टाईम बातम्या देणारी बिझनेस चॅनल्स आहेत. मात्र, ही चॅनल्स पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा व्यापारी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी अधिक उपयुक्त आहेत.

रचना रानडे, युट्यूबर, सोशल मीडिया
फोटो कॅप्शन, रचना रानडे

बाजारातली ही पोकळी अनेक यू-ट्युबर्सने यशस्वीरित्या भरून काढली.

त्यांच्या या यशामुळेच आता जाहिरातदार आणि ब्रँड मॅनेजर्स या यूट्युबर्सकडे आकर्षित झालेत. फोर्ब्स मासिकानुसार टॉप इन्फ्लुएंसर्स एखाद्या ब्रँडच्या एका व्हिडियोसाठी तब्बल 20 हजार डॉलरपर्यंत कमाई करतात.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्समुळे आज आर्थिक शिक्षण अधिक सुलभ झालंय, याचं या क्षेत्रातील तज्ज्ञही कौतुक करतात. मात्र, सावधगिरीचा सल्लाही देतात.

याचं कारण म्हणजे बिझनेस न्यूज चॅनल्सचं काटेकोर नियमन केलं जातं. मात्र, बहुतेक डिजिटल कॉन्टेन्ट क्रिएटर ग्रे झोनमध्ये काम करतात. रचना रानडे आणि अंकुर वारिकू कुठल्याही विशिष्ट स्टॉकची शिफारस करत नाहीत. मात्र, सोशल मीडियावर अनेक असे फायन्शिअल कॉन्टेन्ट क्रिएटर्स आहेत ज्यांच्याकडे पुरेसं कौशल्य किंवा पात्रता नसतानाही ते तसं करतात.

एका बिजनेस न्यूज चॅनलमध्ये संपादक म्हणून काम बघितलेले आणि आता फॅक्ट-चेकिंग वेबसाईट चालवणारे गोविंदराज इथिराज सांगतात, "दिर्घकालीन गुंतवणुकीतल्या बारकाव्यांविषयी सल्ला घ्यायचा असल्यास मी अशा लोकांवर विश्वास ठेवेन ज्यांना मार्केटचा अनुभव आहे. आज आपल्या सर्वांनाच या डिजिटल जगाचा विळखा पडला आहे आणि सगळंच वाढलं आहे. Right now while this digital phenomenon has overtaken us, everything has only gone up"

दोन वर्ष शेअर बाजार तेजीत होता. आता मात्र, देशातून कोट्यवधी रुपयांचा परदेशी पैसा बाहेर काढला जात असल्याने भारतीय भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आहे.

त्यामुळे इथिराज म्हणतात, "भारतातल्या नव्या मनी इन्फ्लुएंसर्सचं हे यश टिकाऊ आहे की क्षणभंगुर याचा पुढच्या काही वर्षात कस लागणार आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)