नुपूर शर्मांच्या शोधात मुंबई पोलिस 4 दिवस दिल्लीत तळ ठोकून, पण...

नुपुर शर्मा, मोहम्मद पैगंबर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नुपुर शर्मा

मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांचं एक पथक चार दिवस दिल्लीत तळ ठोकून असून नुपूर शर्मा यांचा शोध घेत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार नुपूर शर्मा दिल्लीत आहेत.

मोहम्मद पैगंबरांसंदर्भात वादग्रस्त उद्गारांप्रकरणी नुपूर शर्मा यांना भाजपने पक्षातून निलंबित केलं आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स बजावलं. पण त्या नेमक्या कुठे आहेत आहेत याचा शोध मुंबई पोलिसांना लागू शकला नाही.

प्रत्यक्ष न भेटल्याने नुपूर शर्मा यांना मुंबई पोलिसांनी इमेलच्या माध्यमातून समन्स बजावला आहे. मोहम्मद पैगंबरांसंदर्भात उद्गगारानंतर मुंबई पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. या एफआयआरशी निगडीत समन्स देण्यासाठीच मुंबई पोलीस नुपूर यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सांगितलं की, नुपूर शर्मा यांचा चार दिवसांपासून शोध सुरू आहे. पण त्या सापडलेल्या नाहीत. 11 जूनला मुंबईतल्या पायधुनी पोलीस स्टेशनने नुपूर यांना 25 जूनच्या आधी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. जेणेकरून त्या त्यांचा जवाब देऊ शकतील.

पायधुनी पोलीस स्थानकात रझा अकादमीच्या मुंबई विंगचे संयुक्त सचिव इरफान शेख यांनी नुपूर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. धार्मिक भावना दुखावणं आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी नुपूर यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. 10 जून रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी नमाजानंतर देशातल्या अनेक भागात हिंसाचार उफाळला होता.

साद अन्सारी नावाच्या तरुणाला अटक

दरम्यान, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करण्याच्या आरोपात ठाणे पोलिसांनी 19 वर्षांच्या साद अंसारी नावाच्या तरुणाला अटक केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचं समर्थन करण्याचा त्याच्यावर आरोप आहे.

भिवंडीचे डीसीपी योगेश चव्हाण यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "पोलिसांनी रविवारी (12 जून) सादला अटक केली. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे."

धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली साद 18 जूनपर्यंत पोलिसांच्या कोठडीत असेल. दुसरीकडे साद अंसारीच्या घरात घुसून त्याला धमकावणाऱ्या 100 हून अधिक जणांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या अटकेमुळे सादच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे कुणीही यावर उघडपणे बोलायला तयार नाही. मात्र, त्याचे चुलत भाऊ झेन अंसारी म्हणतात, "कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाच नाही. जे झालं ते चुकीचं झालं."

काय घडलं त्या रात्री?

हे प्रकरण गेल्या शनिवारी (11 जून) घडलं. भिवंडीत राहाणाऱ्या आणि इंजिनिअरिंग शिकणाऱ्या 19 वर्षांच्या सादने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकली.

व्हीडिओ कॅप्शन, नुपूर शर्मा आणि प्रेषित पैगंबर प्रकरणात भारताने मुस्लीम देशांपुढे नमतं का घेतलं?

ही पोस्ट कथितरित्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं समर्थन करणारी होती, असा आरोप आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं.

ही पोस्ट बघताबघता व्हायरल झाली. मुस्लीम समाजातील लोकांना ही पोस्ट रुचली नाही. त्यामुळे शनिवारी (11 जून) संध्याकाळपासूनच सादच्या घराबाहेर हजारोंच्या संख्येने लोक गोळा होऊ लागले. साद अंसारीने माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती.

इतकंच नाही तर जवळपास शंभर जण बळजबरी सादच्या घरातही घुसले. या संपूर्ण घटनेचा एक व्हीडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात भडकलेला जमाव सादला माफी मागण्यासाठी धमकावत असल्याचं स्पष्ट दिसतं.

हा जमाव इथेच थांबला नाही. सादला कलमा पठण करायला सांगण्यात आलं आणि नंतर त्याला मारहाणही करण्यात आली.

भडकलेला जमाव शांत करण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी सादला ताब्यात घेतलं.

सादला अटक का झाली?

धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी साद अंसारीला अटक केली. भिवंडीचे डीसीपी योगेश चव्हाण यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "साद अंसारीला अटक करण्यात आली आहे. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे."

रांची, गोळीबार, प्रेषित मोहम्मद पैगंबर

फोटो स्रोत, SYED RAMIZ JAWED

फोटो कॅप्शन, रांचीतील परिस्थिती

साद अंसारीने लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे भिवंडीत वातावरण तणावपूर्ण बनल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मुस्लीम समाजाचे लोक सादवर कारवाईची मागणी करत होते.

साद अंसारीचे वकील नारायण अय्यर सर्व आरोपांचं खंडन करतात. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "साद अंसारीवर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. त्याने कुठलंही प्रक्षोभक वक्तव्य केलेलं नाही."

ते पुढे सांगतात, सादने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की "मी कुठल्याही धर्माचं समर्थन करत नाही आणि हा द्वेष संपायला हवा."

सादने नुपूर शर्मांच्या कुठल्याचं वक्तव्याचं समर्थन केलं नाही.

दुसरीकडे साद अंसारीच्या घरात बळजबरीने घुसणाऱ्या जमावावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शंभराहून जास्त लोकांवर एफआयआर दाखल केला आहे. यापैकी 18 जणांची ओळख पटली आहे.

सादच्या घरात बळजबरीने घुसणाऱ्यांवर एफआयआर करत पोलिसांनी नोटीसही बजावली आहे.

साद अंसारीच्या कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे?

सादचं कुटुंब सुशिक्षित आहे. मात्र, शनिवारच्या घटनेनंतर सादच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मुस्लीम समाजातील असल्याने सादच्या अटकेविषयी कुटुंबातलं कुणीच उघडपणे बोलत नाहीय.

समाजाविरोधात काही बोलल्यास पुन्हा घरात घुसून धमकी दिली जाईल, अशी भीती त्यांना वाटते.

शनिवारी रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान जमाव घरात घुसल्याचं सादचे कुटुंबीय सांगतात. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. जमाव शांत झाल्यानंतर त्यांनी सादला बाहेर आणलं. पण, जमावाने त्याला मारहाण केली.

रात्री बळजबरीने घरात घुसून मारहाण करण्याचा अधिकार लोकांना कुणी दिला, असा सादच्या कुटुंबीयांचा सवाल आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही ते नाराज आहेत. सादला अटक करण्याआधी पोलिसांनी चौकशी करायला हवी होती, पण त्यांनी केली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सादला फिट्स येतात आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नुकतंच त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडेही नेण्यात आल्याचं नाव न जाहीर करण्याच्या अटीवर कुटुंबीयांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)