विधानपरिषद निवडणूक: जिथे आमदारांना थांबवण्यात आलं आहे त्या हॉटेल्सचं एक दिवसाचं भाडं ऐकून थक्क व्हाल

फोटो स्रोत, Trident Hotel
- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असताना यात संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असलं तरी राज्यसभेच्या एका जागेसाठी राजकारण्यांकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातायत.
आता तुम्ही म्हणाल की प्रत्येकच निवडणुकीत राजकीय नेते पाण्यासारखा पैसा खर्च करतात. पण हा पैसा निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा मतदारांच्या विकास कामांसाठी केला जात नाहीय तर आमदारांच्या पंचतारांकित हॉटेलचा हा खर्च आहे.
मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये सध्या जवळपास 256 आमदार मुक्कामाला आहेत. शिवाय, इतर काही पक्षांचे आणि अपक्ष आमदारांनाही याच हॉटेल्समध्ये ठेवण्यात आलंय.
यासाठी हे राजकीय पक्ष किती खर्च करत आहेत? ही पंचतारांकित हॉटेल्स कोणती आहेत आणि या हॉटेल्समध्ये एका दिवसाचा खर्च किती रुपये आहे? आमदारांना हॉटेल्समध्ये का ठेवावं लागलं आणि पंचतारांकित हॉटेलमध्येच त्यांचा मुक्काम का आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
कोणत्या आमदारांचा मुक्काम कुठे आणि खर्च किती?
10 जूनला विधिमंडळात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्या आहेत.
शिवसेनेचे आमदार नरीमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार वेस्टइन या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.
भाजपने आपल्या आमदारांना कुलाबा येथील ताज रेसिडंट हॉटेलमध्ये ठेवलं आहे.
शिवसेना
मुंबईतील नरीमन पॉईंट येथे असलेलं 'ट्रायडंट' हे हॉटेल अगदी समुद्राच्या समोर मरीन ड्राईव्हवर 'सी व्ह्यू' असलेलं पंचतारांकीत हॉटेल आहे.

फोटो स्रोत, Trident
या हॉटेलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये आठ प्रकारच्या खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीचा दिवसाचा खर्च वेगवेगळा आहे. आपण पहिल्या तीन प्रकारच्या खोल्यांचा खर्च पाहूया,
सुपिरियर रुम - एक व्यक्तीचा एका दिवसाचा खर्च 18 हजार 500 रुपये, दोघांचा खर्च 20 हजार
प्रिमियर रुम - एका व्यक्तीचा एका दिवसाचा खर्च 22 हजार, दोन व्यक्तींचा खर्च 23 हजार 500
प्रिमियर ओशियन व्ह्यू रुम - एका व्यक्तीसाठी 23 हजार 500, दोन व्यक्तींचा खर्च 25 हजार
शिवसेनेचे 55 आमदार आहेत. या आमदारांसाठी पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला आहे आणि सर्व आमदारांना निवडणुकीपर्यंत या हॉटेलमध्ये राहण्यासाठी सांगितलं आहे.
यादीतील सर्वांत कमी भाड्याची खोली 18 हजार 500 रुपयांची आहे. अंदाजे ही किंमत जरी आपण ग्राह्य धरली तरी या आकडेवारीनुसार आमदारांचा एका दिवसाचा खर्च सुमारे 10 लाख 17 हजार 500 रुपयांपर्यंत जातो.
यातले काही आमदार किंवा मंत्री या हॉटेलात राहत नसल्याची सुद्धा शक्यता आहे. पण काही मोजके आमदार वगळले तरी या खर्चात फारसा फरक पडत नाही.
शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सांगितलं की, "हा खर्च कोण करतय हे काही मला माहित नाही, कोणीतरी करत असेल पण महत्त्वाचं हे आहे की आमदारांनी पक्षाने व्हिप काढल्यानुसार मतदान करावे."
भाजप
तर मुंबईतील ताज प्रेसिडंट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये भाजपचे आमदार मुक्कामाला आहेत. भाजपच्या 105 आमदारांचा एक दिवसासाठीचा मुक्काम या हॉटेलमध्ये असेल अशी माहिती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.

फोटो स्रोत, Presidency Hotel
या हॉटेलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार इथल्या खोल्यांचं एका दिवसाचं भाडं किती रुपये आहे ते पाहूया,
सुपिरियर रुम - एका दिवसाचं भाडं 9 हजार रुपये.
लक्झरी रुम - 10 हजार 500 रूपये.
प्रिमियम रुम- 13 हजार रुपये
या आकडेवारीनुसार 9 हजार रुपये एका दिवसाचं भाडं जरी गृहीत धरलं तरी एका दिवसाचा 105 आमदारांचा खर्च 9 लाख 45 हजार रुपये आहे. शिवाय, काही अपक्ष आमदारांचा खर्च मोजल्यास ही किंमत आणखी वाढते.
"हॉटेल आणि संबंधित इतर सर्व खर्च आम्ही सामूहिक करतो," असं केशव उपाध्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पवई लेकजवळच्या 'वेस्टइन' या पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहत आहेत.

फोटो स्रोत, Westin
वेस्टइन हॉटेलच्या वेबसाईटनुसार सुपिरियर रुमचं एका दिवसाचं भाडं 10 हजार 500 रुपये आहे.
डिलक्स हिल व्ह्यू - 12 हजार 500
क्लब रुम - 13 हजार 500
काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यानुसार एका दिवसाचं आमदारांचं भाडं अंदाजे 4 लाख 62 हजार एवढं असू शकतं.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितलं की, "प्रत्येक आमदार स्वत:चा खर्च स्वत: करत आहे."
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार हॉटेलमध्ये राहत नाहीत असं पक्षाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. मुंबई बाहेरच्या आमदारांची सोय व्हावी म्हणून या हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हॉटेलमध्ये राहत नाहीत असं पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.
या आमदारांचा एक दिवसाचा साधारण खर्च 1 लाख 26 हजार एवढा आबे. तर तीन चार दिवसांचा खर्च जवळपास 4 लाख इतका असू शकतो.
हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च पक्ष निधीमधून केला जात असल्याचंही महेश तपासे यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना असो वा भाजप किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे अगदी सर्वच आमदार या हॉटेलात राहतायत असं पक्षांकडूनही सांगण्यात आलेलं नाही. पक्षांचे पदाधिकारी आणि मंत्री याला अपवाद असू शकतात.
मोठ्या संख्येने आमदार या पंचतारांकित हॉटेलांमध्ये राहतायत हे उघड आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने प्रत्येकी किती खर्च केला हे त्यांच्याकडून अधिकृत सांगण्यात आलेलं नाही. परंतु हॉटेलांच्या किमती पाहून कोट्यवधी रुपये खर्च होतायत हे सुद्धा यातून दिसतं.
'…म्हणून आम्ही आमदारांना हॉटेलात ठेवलंय'
हा एवढा भरमसाठ खर्च राजकीय पक्ष का करतायत याची सोशल मीडियावरही चर्चा सुरूय. जनतेच्या कामांसाठी खर्च करण्याऐवजी सर्वच राजकीय पक्ष राजकारणासाठी एवढा पैसा खर्च करत असल्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात येतेय.

फोटो स्रोत, Getty Images
यासंदर्भात आम्ही या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडली असून पैशांनी आमदारांना विकत घेण्याचे प्रकार सुरू झाल्यामुळे ही खबरदारी घेण्यात येतेय असं राजकीय पक्षांकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सर्वच पक्षाचे आमदार हॉटेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जातेय. हा निवडणुकीचा एक भाग आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रत्येकच चर्चेला आम्ही उत्तर देऊ शकत नाही."
भाजपचे आमदार काही इतर पक्षांप्रमाणे चार दिवस हॉटेलात मुक्काम करत नाहीत असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "आमदारांना या मतदानाची प्रक्रिया समजवण्यासाठी, त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्यांना एकत्र बोलवलं आहे. आमचे आमदार काही इतर पक्षांप्रमाणे तीन चार दिवस हॉटेलात राहत नाहीत. केवळ एका दिवसाचा मुक्काम आहे. त्यामुळे तीन चार दिवसांचा इतर पक्षांचा खर्च वेगळा असू शकतो. मतदानाची ही प्रक्रिया किचकट असते. ती समजवण्यासाठी आम्ही त्यांना हॉटेलात ठेवलं आहे."
तर काँग्रेसने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती भाजपमुळे खराब झाल्याची टीका केलीय. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "भाजपने याची सुरुवात केली आणि राज्यातली राजकीय संस्कृती खराब केली. पैशांनी उमेदवार उभे केले. लोकशाही पैशांनी विकत घेण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत घोडेबाजार होऊ नये असाच प्रयत्न झाला. परंतु भाजपचे वर्तन निषेधाचं आहे. आमच्याकडे जास्त आमदार आहेत हे स्पष्ट आहे. पण तरीही पैशांनी काही करता येतं का यासाठी प्रयत्न सुरू आहेत."
आमदारांची हॉटेलवारी कशासाठी?
10 जूनला महाराष्ट्राच्या विधिमंडळात राज्यसभेसाठी मतदान होईल. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभेसाठीचे हे उमेदवार आमदारांच्या मतांवर निवडून येतात.
त्यामुळे आपल्या आमदारांच्या संख्याबळावर महाविकास आघाडी प्रत्येक एक उमेदवार निवडून आणू शकते. तर भाजप आपल्या संख्याबळावर दोन उमेदवार निवडून आणू शकतात. म्हणजेच एकूण पाच उमेदवारांचा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला.

आता सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांत स्पर्धा आहे. या उमेदवारांसाठी शिवसेना आणि भाजपचे आमदार तर मतदान करतील परंतु अतिरिक्त मतांची गरज असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचीही आवश्यकता भासणार आहे.
आता हे आमदार महाविकास आघाडीचा भाग असले तरी प्रत्यक्षात मतदान शिवसेनेच्या पारड्यात टाकणार की भाजपच्या? यावर सहाव्या जागेचा निकाल अवलंबून आहे. म्हणजेच सहावी जागा भाजपकडे जिंकणार की शिवसेना हे या अतिरिक्त मतांवर ठरणार आहे. आणि म्हणूनच महाविकास आघाडीसह भाजपसाठीही प्रत्येक आमदाराचं मत महत्त्वाचं आहे.

फोटो स्रोत, Chandrakant Patil
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात, "ही पहिलीच वेळ नाही जेव्हा महाराष्ट्रात आमदारांना असं नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यापूर्वी 1998-99 मध्ये नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांनीही आमदारांच्या सुरक्षेसाठी असा प्रयोग केला होता. परंतु त्यावेळी दुसऱ्या पक्षांतून फोडलेल्या आमदारांना मुंबईतील मोठ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेवेळीही राज्याने हॉटेल पलिटिक्सचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे हे आता नवीन नाही. पण हे संतापजनक आहे."
आपल्याच आमदारांना असं नजरकैदेत ठेवण्याची वेळ राजकीय पक्षांवर का येते? या संदर्भात ते म्हणतात, "महाविकास आघाडी तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे अस्थिरता राहणार. त्यामुळे धोका वाढतो. भाजपनेही आपल्या आमदारांना हॉटेलात ठेवलं आहे. सर्वच पक्षश्रष्ठींचा आपल्या प्रत्येक आमदारावर विश्वास नाही हे स्पष्ट आहे. निष्ठा पातळ झाली आहे. दुसरा पक्ष कधीही पोचिंग करू शकतो हे यापूर्वी सिद्ध झालं आहे. सुरक्षेच्यादृष्टीकोनातून 5 स्टार हॉटेल अधिक सुरक्षित वाटत असावं."
ते पुढे सांगतात, "निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार जो अमाप पैसा खर्च करतात त्या तुलनेने हा खर्च कमीच आहे. पण निवडणुकीत अनेक व्यवहार पडद्यामागे होत असतात त्यामुळे सामान्य जनतेला तो खर्च उघडपणे दिसत नाही. आता हॉटेलांमध्ये जाहीरपणे हा कोट्यवधी रुपयांचा खर्च होतोय आणि लोक याचे साक्षीदार आहेत."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








