हेरवाड: 'नवरा वारला म्हणून काय झालं, हळदी-कुंकू, बांगड्यांची हौस आम्हालाही असते'

फोटो स्रोत, Sarfaraj Sanadi/BBC
- Author, सरफराज सनदी
- Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूर
"ज्यावेळी मिस्टर होते, त्यावेळी सगळी बोलवत असे,पण मालक वारल्यानंतर जवळसुद्धा बोलवत नाहीत. आयोबाई नाही,विधवा आहे,तिला जवळ बोलवू नको,त्यांना म्होर कश्याला बोलवता,असं म्हणतात...पण आम्हालाही कोणी तरी बोलवावे,हळदी कुंकवाला,तुमचं चालताय असे म्हणावे,अशी अपेक्षा आहे,आता गावाने जो निर्णय घेतलाय तो ऐकून चांगला वाटलं." हे आहे.विधवेचे आयुष्य जगणाऱ्या कोल्हापूरच्या हेरवाड गावच्या उज्वला शिंगे यांची व्यथा. गेल्या 13 वर्षांपासून नशीबाला आलेल्या विधवेच्या अपमाना सोबत जीवन जगत आहेत. मात्र आता त्यांच्या गावाने विधवा प्रथा बंदीच्या निर्णयामुळे त्या आनंद व्यक्त करत आहेत.
छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरित असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं शिरोळ तालुक्यातील हेरवाड हे छोटंसं गाव,पंचगंगा नदीच्या तिरीवर वसलेल्या सुमारे पाच हजार कुटुंबवस्ती असणाऱ्या हेरवाड गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.तो म्हणजे "विधवा प्रथा बंदीचा" छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर गावच्या ग्रामसभेमध्ये या निर्णयाचा ठराव देखील करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या सदस्य असणाऱ्या मुक्ताबाई पुजारी यांनी याबाबत सूचक तर गावातील अंगणवाडीसेविका सुजाता गुरव यांनी अनुमोदक म्हणून हा प्रस्ताव मांडला, त्याला गावानं एकमताने मंजुरी दिली. हा निर्णय घेताना गावाला हा एक मोठा आणि क्रांतिकारी निर्णय होऊ शकतो असं वाटलं देखील नव्हतं, मात्र आता या निर्णयाची चर्चा अगदी देशपातळीवर सुरू झाली आहे.

फोटो स्रोत, Sarfaraj Sanadi/BBC
समाजामध्ये आजही महिलांच्या बाबतीत अनेक रूढी परंपरा अस्तित्वात आहेत. त्यापैकीच एक विधवा महिलेच्या बाबतीत असणारी रूढी-परंपरा.पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळी पत्नीचे कपाळाचं कुंकू पुसला जातं,हातातल्या बांगड्या फोडल्या जातात,गळ्यातले सौभाग्याचं लेणं समजल्या जाणाऱ्या मंगळसूत्र काढून घेतले जाते,पायातील जोडवे काढले जातात.मग ती विधवा होते आणि आयुष्यभर विधवा म्हणून जगावं लागतं,या विधवेच्या वाटेला सामाजिक-धार्मिक आणि कोणत्याही कार्यात मान मिळत नाही,मिळतो तो फक्त अपमान.
हिंदू संस्कृतीमध्ये महिलेच्या कपाळावर टिळा-कुंकू,हातात बांगड्या आणि साजशृंगार याला खूप महत्त्व आहे.
सुवासिनी महिलेचे प्रतीक हे कपाळावर कुंकू,हातात हिरव्या बांगड्या,गळ्यात मंगळसूत्र,पायात जोडवे आहे.तर पूर्वी फक्त पांढरी साडी हे वस्त्र विधवा बाईसाठी आधार असे. आता त्यामध्ये थोडाफार बदल होऊन वस्त्र परिधान करण्याचा प्रथा कालबाह्य झाल्याचे पाहायला मिळतो.पण आजही विधवा महिलेच्या हातात बांगड्या त्याही हिरव्या रंगाच्या नसल्या पाहिजेत,कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र किंवा कोणताही साजशृंगार नसला पाहिजे,ही रूढी मानसिकता घट्ट आहे.

फोटो स्रोत, Sarfaraj Sanadi/BBC
'विधवा आहे तिला जवळ बोलावू नका'
उज्वला विलास शिंदे या हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. 52 वर्षाच्या असणाऱ्या उज्वला शिंदे यांना वयाच्या 40 व्या वर्षी विधवा होण्याची वेळ आली. पती विलास शिंगे हे मुळात विकलांग होते,त्यामुळे आजारपणाने 2009 साली त्यांचे निधन झालं.त्यानंतर उज्वलाबाई यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. सचिन आणि प्रवीण ही दोन मुलं,त्यांचे शिक्षण, घराचा खर्च, अशा परिस्थितीमध्ये 5 वी पास असणाऱ्या उज्वला शिंगे यांनी ग्रामपंचायत हेरवाड येथे 2005 साली सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळवली.
सकाळी 8 पासून त्या ग्रामपंचायतीतील स्वच्छता करण्याबरोबर गावची सफाई करतात. आता त्यांचं घरची परिस्थिती चांगली आहे.त्यांच्या नावे दीड गुंठे जागा असून त्या ठिकाणी त्यांनी कर्ज घेऊन छोटसं घर देखील उभारले आहे. दोन मुलं,दोन सुना आणि नातवंडे असा याठिकाणी एकत्र राहतो, त्यांची दोन्ही मुलेमोलमजुरीचे काम करतात त्यामुळे वेळेत पगार मिळतोच असं नाही.त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी उज्वला शिंदे यांच्यावर आहे.

फोटो स्रोत, Sarfaraj Sanadi/BBC
बीबीसी मराठीशी बोलताना उज्वला शिंगे म्हणाल्या, "ज्या वेळी मिस्टर होते,तेंव्हा सगळे बोलवत होते,पण मालक वारल्यानंतर जवळसुद्धा बोलवत नाहीत. अयोबाई नाही,विधवा आहे,तिला जवळ बोलवू नको,त्यांना म्होर कश्याला बोलवता,असं म्हणतात...आता गावाने विधवा बंदीचा निर्णय घेतला,त्यामुळे आम्हाला चांगले वाटतंय,आम्हाला पण कोणी तर हळदी कुंकवाला बोलवावं, धार्मिक कार्यक्रमात पुढं पुढं करावे, सगळया बाईकांना हळदी कुंकू लाववं, हिरव्या बांगड्यांची हौस करावी हीच आमची अपेक्षा आहे,त्यामुळे हा निर्णय ऐकून चांगलं वाटलं."
"2009 साली पतीचं निधन झालं आणि आपल्याला त्यानंतर काही मानपान नाही. सगळा निघून गेला,गावात फिरताना टिकली लावली की ,नवरा मेलाय टिकली कश्याला लावतेस,हिरव्या बांगड्या कशाला घालतेस,मोरपंखी रंगाच्या बांगडया जरी असल्या तरी कश्याला हिरव्या बांगड्या घातल्यास काढ जा,लोक नाव ठेवतील,हिरवा ब्लाऊज जरी घातले तरी कश्याला घातल्यास हिरव-हिरवं,झाले की,त्यावेळेला आता कश्याला पाहिजे.त्यावेळी आम्हाला कस तरी वाटतंय,आम्ही जाऊन काढतो.मग मन नाराज होतं.बाहेर ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला मग काळ्या नजरेने बघतात,त्यामुळे आपण टिकली लावून जातो." गळ्यात मंगळसूत्र नाही,म्हणून मण्याचा हार घातल्याचे उज्वला शिंगे आपल्या अश्रूंना आवर घालून सांगतात.

फोटो स्रोत, Sarfaraj Sanadi/BBC
ग्रामपंचायतीचे सरपंच सुरगौंडा पाटील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात सरपंचांचा व्हाट्सअप ग्रुप आहे.यामध्ये वेगवेगळ्या गावाचे सरपंच,आयएएस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते ग्रुपमध्ये आहेत. त्यात करमाळ्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाड यांनी विधवा प्रथेच्या बाबतीत असणाऱ्या समाजातील रूढी परंपरा आणि त्यांच्या विधवा महिलांना होणार त्रास याबद्दल व्यथा मांडल्या होत्या.
अशा पद्धतीची प्रथा बंद व्हायला हवी असं मत व्यक्त करत त्याबाबत गावातून जागृती प्रसिद्ध करून ग्रामसभेतून ठराव करून व्हावी कायदा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मत व्यक्त केले आहे.प्रस्ताव देखील ठेवला होता. पण 2019 साली आलेला पंचगंगा नदीचा महापुर आणि त्यानंतर कोरोनाच्या संकटात गावातील अनेक मुलींना ऐन तारुण्यात विधवा होताना पाहिले.या वाईट अनुभवानंतर गावात विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेण्याचा निर्णय घेत 5 मे 2022 रोजी ग्रामसभेत याचा ठराव मांडण्यात आला.
तो एकमताने मंजूरसुद्धा करण्यात आला.
सर्व स्तरातून सहभाग
हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये 16 सदस्यांपैकी 8 सदस्य महिला आहेत, त्यांनीही यासाठी पुढाकार घेतला. यापैकी ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई पुजारी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "ज्यावेळी हा निर्णय घेण्याचा विचार सुरू झाला,तेंव्हा आपण एक महिला आहे,आज गावातील महिलांच्यावर विधवा झाल्यानंतर जी वेळ आली आहे,ती कदाचित आपल्यावर ही येऊ शकते,त्यांच्या जागी आपण असतो तर,म्हणून आपण यामध्ये पुढाकार घेतला."

फोटो स्रोत, Sarfaraj Sanadi/BBC
"आज गावात कोरोना 25 वर्षांच्या चार तरुणी विधवा झाल्या,त्यांना कुंकू लावायचे नाही,मंगळसूत्र घालायचे नाही, त्यामुळे त्या एखाद्या भुताप्रमाणे दिसतात,त्यांना कुठेही पुढे जाता येत नाही,या गोष्टी त्यांनी बोलून पण दाखवल्या, अगदी ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाला देखील त्या येत नाहीत.नवरा मेल्यावर महिलेला जास्त करून खेडेगावात मान कश्याचही नसतो,त्यांना लग्नात पुढे येता नाही,अगदी विधवा महिलेला त्याच्या मुलाच्या लग्नात देखील पुढे येऊ दिले जात नाही,कारण अपशकुन होतो अशी रूढी परंपरा आहे.त्यामुळे अपशकुन होईल म्हणुन ती स्वतःच्या मुलाच्या लग्नात मागे राहते. नवरा मेल्यावर विधवा महिलेने परंपरा चालवायची ,त्यांची शेती बघायची,मुलं बघायची ,मग हळद कुंकू,बांगड्या आणि मंगळसूत्र का नको?" असा सवाल मुक्तबाई पुजारी या उपस्थित करतात.
पण आता ग्रामपंचायत आणि गावाने विधवा महिलांच्या बाबतीत असणारी प्रथा बंद केली आहे.त्यामुळे विधवा महिलांच्या आयुष्यात नक्की बदल होईल,असा विश्वास देखील ग्रामपंचायत सदस्य मुक्तबाई पुजारी व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Sarfaraj Sanadi/BBC
हेरवाड गावाने घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरवाड गावच्या ग्रामपंचायत सदस्यांना सातारा येथे निमंत्रण देऊन भेट घेत निर्णयाबद्दल माहिती घेत कौतुक केलं, शिवाय राज्यात या बाबतीत कायदा करण्यासाठी तसेच संसदेत देखील हा मुद्दा मांडण्याची ग्वाही दिली,त्या दृष्टीने सुप्रिया सुळे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्राद्वारे राज्यातील ग्रामपंचायतींना हेरवाड ग्रामपंचायतींनी विधवा महिल्यांच्या बाबतीत असणारी अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी विशेष ग्रामसभेत ठराव करण्याचा सूचना दिल्या आहेत..
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








