श्रीधर पाटणकर: 3 मुख्यमंत्री मेहुणा, जावई आणि सासूबाईंमुळे असे आले अडचणीत

अशोक चव्हाण
    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

नातेवाईक ही अशी गोष्ट आहे जे कधीकधी दूरचे असूनही जवळचे असतात आणि कधीकधी जवळचे असून दूरचे असतात. विशेषतः नातेवाईक कुणी मोठी आणि कामाची व्यक्ती असेल तर ती दूरची असूनही जवळची सांगितली जाते. पण तोच नातेवाईक जवळचा असून कुठल्याही प्रकारे त्रासदायक असेल तर तो दूरचा सांगितला जातो किंवा त्याच्याची संबंधच नसल्याचं सांगितलं जातं.

आपण सर्वच जण कधी ना कधी या प्रोसेसमधून गेलेलोच असतो. आता सामान्यांचीच ही गत असेल तर जिथं 'विश्वास' फार महत्त्वाचा असतो त्या राजकारण आणि सत्तेच्या धबाडग्यात 'नातेवाईक' या संज्ञेला अनन्यासाधारण महत्त्व प्राप्त होतं.

पण जेव्हा अडचणीची वेळ येते तेव्हा मात्र अमक्या मंत्र्याचा अमुक आणि तमक्या नेत्याचा तमूकतमूक अशी शेखी मिरवणाऱ्याशी संबंध झटकून टाकायला किंवा स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवायला कुठलाही नेता मागेपुढे पाहत नाही.

माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाही, असं वक्तव्य करून शरद पवारांनी त्यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या राजकीय मतांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. हा घटनाक्रम सर्वांच्याच लक्षात असेल.

व्हीडिओ कॅप्शन, उद्धव ठाकरेंप्रमाणे नातेवाईकांमुळे अडचणीत आलेले मुख्यमंत्री कोण?

आतापर्यंत अनेक नेते, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री त्यांच्या नातेवाईकांमुळे अडचणीत आले आहेत. त्यातल्या काही जणांना त्यांची पदंसुद्धा गमवावी लागली होती.

त्याची सर्वांची यादी काढायला गेलं तर ती फार मोठी होईल. परिमाणी आपण फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांची याविषयी चर्चा करू या...

अशोक चव्हाण त्यांच्या सासूबाईंमुळे अडचणीत आले होते. मनोहर जोशी त्यांच्या जावयामुळे, तर सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या मेहूण्यामुळे अडचणीत आले आहेत.

मनोहर जोशी जावयामुळे अडचणीत

मनोहर जोशी हे त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्यामुळे चांगलेत अडचणीत आले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 1998 मध्ये त्यांनी पुण्यातील शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलून ते जावई गिरीश व्यास यांच्या निकटवर्तीयांना दिल्याचं स्पष्ट झालं. जिथं त्यांनी दहा मजल्यांची इमारत बांधली.

मनोहर जोशी, शिवसेना, अयोध्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनोहर जोशी

हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानं जोशींवर ताशेरे ओढले. जोशींसारख्या उच्चशिक्षित मुख्यमंत्र्यानं फक्त जावयाच्या फायद्यासाठी एखाद्या शाळेच्या जागेचं आरक्षण बदलणं संतापजन असल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले होते.

या प्रकरणात अडचणी वाढल्यानंतर तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला आणि नारायण राणेंना त्यांच्या जागी मुख्यमंत्री केलं होतं.

पुढे सासूच्या नावे असलेल्या फ्लॅटमुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना त्यांचं मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं.

अशोक चव्हाण सासूमुळे अडचणीत

झालं असं की 2008 साली मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हल्ला झालेल्या भागाच्या दौऱ्यावर गेले.

त्यावेळी त्यांच्याबरोबर 2 गैरसरकारी व्यक्ती होत्या. एक म्हणजे त्यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख, दुसरे म्हणजे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा. पण याबाबतचं वृत्त जेव्हा बाहेर आलं तेव्हा मोठा गदारोळ झाला.

या हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांना त्यांचं पद गमवावं लागलं. त्याला इतरही कारणं होती. पण मुलाला बरोबर घेऊन केलेला हा दौरासुद्धा त्यातलं एक महत्त्वाचं कारण ठरला होता.

अशोक चव्हाण

फोटो स्रोत, Shahid Shaikh/bbc

फोटो कॅप्शन, अशोक चव्हाण

विलासराव देशमुख यांच्या नंतर काँग्रेसनं अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर लगेचच 2009ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेत आली. अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले.

पण त्यानंतर लगेचच 2010 मध्ये कथित आदर्श घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाण अडचणीत आले.

मुंबईतल्या प्रसिद्ध कुलाबा परिसरात कथितरित्या लष्करासाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर रहिवासी इमारत उभारण्याची परवानगी दिल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला.

या इमारतीमध्ये अशोक चव्हाण यांच्या सासू भगवती शर्मा आणि सासरे मदनलाल शर्मा यांच्या नावावर दोन फ्लॅट असल्याचं उघड झालं होतं. सोसायटीच्या फाईल्स क्लिअर करण्याच्या बदल्यात अशोक चव्हाण यांनी आदर्शमध्ये 3 बेनामी फ्लॅट मिळवल्याचा आरोप झाला होता.

मीडियामध्ये हे प्रकरण खूप गाजल्यानंतर अशोक चव्हाण यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढे 2017मध्ये कोर्टानं या प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर खटला चालवण्यास नकार देता त्यांना मोठा दिलासा दिला.

मेहुण्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत

सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्याशी संबंधीत तब्बल 11 फ्लॅट ईडीनं जप्त केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, परमबीर सिंह, सचिन वाझे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ईडीच्या माहितीनुसार, पुष्पक ग्रुपची 6.45 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील 11 रहिवासी फ्लॅट्सचा समावेश आहे. निलांबरी प्रकल्प श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे असून, याचे मालक श्रीधर माधव पाटणकर हे आहेत.

हे प्रकरण नेमकं काय आहे आणि श्रीधर पाटणकर यांचे व्यवसाय काय आहेत हे वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

आता विरोधकांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्ही योग्य पद्धतीने उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना दिली आहे.

पण याआधी महाराष्ट्राच्या इतिहासात 1986 मध्ये माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांना त्यांच्या मुलीला वैद्यकीय परीक्षेत गुण वाढवून देण्यातून झालेल्या वादामुळे राजीनामा द्यावा लागला होता. हेसुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)