लता मंगेशकर यांच्याविरोधात जेव्हा कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले होते...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून
कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओच्या शिल्लक राहिलेल्या साडे तीन एकर जागेची दोन वर्षांपूर्वी विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नव्याने या वादाने कोल्हापूरमधील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूर करांच्या अस्मितेचा विषय असताना कोल्हापूर मंगेशकर कुटुंबियांनी या जागेची खाजगी व्यवसायिकांना विक्री केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि सर्व चित्रपट व्यावसायिक कलाकार-तंत्रज्ञ-कामगार तात्काळ महामंडळाच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. त्यानुसार जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरुच ठेवणार असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिली.
दरम्यान, खरेदीदरात शिवसेनेचे माजी आमदार आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. ही माहिती समजल्यानंतर कोल्हापुरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. "जयप्रभा स्टुडिओ खरेदी व्यवहारबाबत मी अनभिज्ञ आहे. मात्र, माझी मुले ऋतुराज आणि पुष्कराज सुज्ञ आहेत. त्यांना कोणतीही खासगी जागा विकत घेण्याचा अधिकार आहे. पण जनभावनेचा विचार करून ही जागा राज्य शासन खरेदी करायला तयार असल्यास कायदेशीर पद्धतीने त्यांनी ही जागा विकत घ्यावी. मी स्वतः यामध्ये लक्ष घालून द्यायला तयार आहे", अशी प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. ते पुढे असंही म्हणाले की, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय बदनामीसाठी हे षडयंत्र रचले आहे. स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा. स्थापत्य अभियंता असलेला मुलगा ऋुतुराज याला खासगी जागा विकत घेण्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. या खरेदीशी आपला संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. जयप्रभा स्टुडिओ बाहेर आजपासून (13 फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या जन आंदोलनात प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ खुला झाला पाहिजे या मागणीचा समावेश आहे.
जयप्रभा स्टुडिओमधील इमारतीसह खुली जागा आरक्षित रहावी व चित्रीकरणाव्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये.
कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यावसायिकीकरण/वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये.जयप्रभा स्टुडिओ याचे जतन होण्याकरिता शासनाने लक्ष घालावे. त्यामुळे पुन्हा एकदा मला वाचवण्यासाठी तुम्ही नसक्की या लढा कधीच संपत नाही. अशी हाक देत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पदाधिकारी आणि कोल्हापूर जनता यांनी लढा सुरू केला आहे.
जेव्हा लतादीदींच्या निर्णयाविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते तेव्हा...
28 ऑगस्ट 2012 साली कोल्हापूरमध्ये लता मंगेशकर यांच्या एका निर्णयाविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. हा निर्णय होता जयप्रभा स्टुडिओ खाजगी विकासकाला विकण्याचा...
जयप्रभा स्टुडिओ ही कोल्हापूरची अस्मिता आहे त्यामुळं जयप्रभा स्टुडिओ वाचवा अशी मागणी होत होती. यासाठी जयप्रभा स्टुडिओबाहेर कोल्हापूरकरांनी गर्दीही केली होती.
लता मंगेशकर यांच्या मालकीचा असलेला जयप्रभा स्टुडिओ तब्बल 13 एकर जागेवर आहे. या जागेचा खाजगी विकासकामार्फत विकास करण्याच्या निर्णयाविरोधात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
खरी कॉर्नर ते जयप्रभा स्टुडिओ असा हा मोर्चा होता. यात कलाकार, तंत्रज्ञ, शाळकरी विद्यार्थी, चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या. पण नेमकं काय झालं होतं ज्यामुळे कोल्हापूरमध्ये हा संघर्ष निर्माण झाला होता ते पाहूया.
जयप्रभा स्टुडिओ कधी सुरू झाला?
छत्रपती राजाराम महाराजांनी 1 ऑक्टोबर 1933 साली कोल्हापूर सिनेटोनची स्थापना केली. चित्रसृष्टीला हक्काचं साधन मिळावं आणि कोल्हापूरच्या विकासासाठी फायदा व्हावा यासाठी सिनेटोनची निर्मिती करण्यात आली.
याची सर्व जबाबदारी महाराजांनी मेजर दादासाहेब निंबाळकर यांच्याकडे सोपवली. त्याकाळी भालजी पेंढारकर हे 1929 पासून कोल्हापूरमध्ये चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. दादासाहेबांनी या स्टुडीओच्या देखभालीची सुत्रं चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडे दिली.
तब्बल तेरा एकर जागेवर हा स्टुडिओ उभा होता. भालजींनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती आणि चित्रीकरण याच स्टुडिओत केलं. पृथ्वीराज कपूर यांच्या पहिल्या बोलपटातली भूमिका याच स्टुडिओत झाली. तर राज कपूर हे पहिल्यांदा कॅमेरासमोर आले तेही याच स्टुडिओत... राजा शिवछत्रपती, मोहित्यांची मंजुळा, जगतजननी महालक्ष्मी असे अनेक चित्रपट याच स्टुडिओत चित्रित झाले.

फोटो स्रोत, Raja Upalekar
14 मे 1946 साली भालजी पेंढाकर यांनी आपली कमाई पणाला लावत 2 लाख 10 हजार रुपयात कोल्हापूर दरबारकडून कोल्हापूर सिनेटोन स्टुडिओ विकत घेतला.
लाखो रुपये खर्च करत एकाच वेळी तीन युनीटस् इथं काम करतील अशी व्यवस्था उभारली. याचं नामकरण झालं जयप्रभा स्टुडिओ... साजेसा निसर्ग, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, उपलब्ध सुविधा यामुळे मराठीसह हिंदी आणि प्रादेशिक सिनेनिर्माते इथं चित्रीकरणासाठी येऊ लागले.
जयप्रभाची मालकी लतादिदींकडे कशी आली?
भालजी पेंढारकर यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक अर्जून नलावडे सांगतात,
"सर्व काही सुरळीत असताना 30 जानेवारी 1948 साली महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर संतप्त लोकांनी जयप्रभा स्टुडिओची जाळपोळ केली. यात चित्रीकरणाचे अनेक सेट, यंत्रसामुग्री, कॅमेरा प्रिंट जळून खाक झाल्या. यात स्टुडिओचं अतोनात नुकसान झालं.

फोटो स्रोत, Courtesy-Arjun Nalawade
भालजींनी स्टुडिओ पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न केले, पण ते शक्य झालं नाही आणि त्यातूनच त्यांच्यावर जिल्हा बॅंकेचं कर्ज झालं. जयप्रभा स्टुडिओच्या लिलावाची वेळ आली. यातून स्टुडिओ एखाद्या व्यावसायिकांनी विकत घेतला तर चित्रिकरणाचा मार्ग बंद होईल या विचाराने भालजींची मानसकन्या आणि गायिका लता मंगेशकर यांना स्टुडिओ विकत घेण्याबाबत विचारणा झाली.
"अखेर 1959 साली भालजी पेंढारकर यांनी लता मंगेशकर यांना साठ हजार रुपयांत जयप्रभा स्टुडिओ आणि पंचवीस हजार रुपयांत पन्हाळा इथला बंगला विकत दिला. मात्र या ठिकाणी केवळ चित्रीकरण करण्याची अट भालजींनी घातली होती. त्यानुसार भालजी हयात असेपर्यंत लतादीदींनी आपला शब्द पाळला होता," असंही नलावडे यांनी सांगितलं.
लतादिदींची भूमिका काय होती
या सर्व प्रकरणात दैनिक केसरीचे ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी लतादीदींची भेट घेतली त्यावेळी लतादीदींनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
त्या म्हणाल्या होत्या, "सध्या चित्रिकरणाचं तंत्र बदललं आहे. स्टुडिओत असलेल्या यंत्र सामुग्रीवर चित्रीकरण होणं शक्य नाही. त्यामुळे स्टुडिओला बुकींग नाही. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसाठी पैसे हवेत. स्टुडीओला अनेक एकर जागेची गरज नाही. त्यामुळे स्टुडिओचे दोन मजले आणि पाऊण एकर जागा तशीच ठेवायला मी तयार आहे.
अत्याधुनिक यंत्रसामुग्री घेउन देण्याचीही तयारी आहे. मात्र त्यानंतर स्टुडिओसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत अशी ठोस योजना घेऊन चित्रपट महामंडळ किंवा चित्रपट व्यावसायिक संस्था, संघटना मला भेटायला आल्यात का?"

फोटो स्रोत, Raja Upleakr
जयप्रभा स्टुडिओत चित्रीकरण होत नसताना देखभाल आणि कामगार यांच्यासाठी लतादीदी लाखो रुपये खर्च करत होत्या. मात्र हे कायमस्वरुपी करणं शक्य नव्हतं. त्यामुळे स्टुडिओच्या आसपासची जागा विकसित करण्याचा निर्णय लतादिदींनी घेतल्याचं कुलकर्णी सांगतात.
कुलकर्णी यांच्या विनंतीवरून लतादीदी आपली ही भूमिका जाहीरपणे मांडायाला तयार झाल्या. त्यासाठी पत्रकार परिषदेचं नियोजन करण्यात आलं. मात्र आदल्याच दिवशी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने जयप्रभा स्टुडिओप्रकरणी लता मंगेशकर यांच्या विरोधात निषेधाचा ठराव केला. त्यामुळं ही पत्रकार परिषद रद्द केल्याची आठवण कुलकर्णी सांगतात.
जयप्रभा स्टुडिओचा समावेश वारसास्थळ यादीत
राजाराम महाराजांच्या काळातील ही वास्तू दगडी बांधकामात बांधली असल्याने तिचा समावेश वारसास्थळांच्या यादीत व्हावा अशी मागणी त्यानंतर पुढं आली. त्यामुळं कोल्हापूर महापालिकेने 2003 साली जयप्रभा स्टुडिओचा समावेश वारसास्थळाच्या यादीत केला.

फोटो स्रोत, Social Media
मात्र जयप्रभा स्टुडिओ हा आपली वैयक्तिक मालमत्ता असल्याने लता मंगेशकर यांनी 2016 साली महापालिकेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला.
महापालिकेच्या निर्णयाला कोल्हापूरमधून मोठा पाठिंबा मिळाला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने देखील लता मंगेशकर यांच्या विरोधात लढा उभारला.
दरम्यान, राज्य सरकारने 2012 साली जयप्रभा स्टुडिओचा समावेश क दर्जाच्या वारसास्थळ यादीत केला. त्यानुसार कुणालाही स्टुडिओची पुनर्बांधणी किंवा पुनर्विकास करता येत नाही. त्यामुळे लता मंगेशकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
पुढे लता मंगेशकर यांनी स्टुडिओ विकसित करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालायात धाव घेतली. मात्र 2017 साली त्यांनी ही याचिका माघारी घेतली. त्यामुळं जयप्रभा स्टुडिओच्या मालकी हक्कावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला.
त्यानंतर शांत असलेले हे प्रकरण पुन्हा एकदा 2020 मध्ये नवं वादंग घेऊन आलं. लता मंगेशकर य़ांच्या मालकी हक्काच्या स्टुडिओच्या जागेच्या विभाजनाचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेकडे दिल्याची माहिती समोर आली.
त्यानुसार स्टुडिओची मूळ इमारत तशीच ठेऊन उर्वरित जागा विकसित करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी कोल्हापूरमध्ये यावरून जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूरकरांच्या आंदोलनाबाबत बोलताना दैनिक लोकमतचे उपवृत्तसंपादक विश्वास पाटील यांनी त्यावेळची परिस्थिती सांगितली.
ते सांगतात, "जयप्रभा हा विशिष्ठ परिस्थितीत शब्दाला जागण्याच्या स्वभावातून भालजींनी दिलेली मालमत्ता आहे. गांधी हत्येनंतर जनतेच्या संतप्त भावनेपोटी स्टुडिओचं नुकसान झालं. निधीअभावी ती मालमत्ता भालजींना लता मंगेशकर यांच्याकडे द्यावी लागली. मात्र स्टुडिओ हा केवळ चित्रिकरणासाठी राहावा ही भावना कोल्हापूरवासियांची होती. त्यावर खाजगी विकासकाकडून बांधकाम होऊ नये अशी सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा होती.
मात्र लता मंगेशकर यांनी 13 एकर जागेपैकी साडे नऊ एकर जागा ही खाजगी विकासकाला दिली. त्यावर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. याच कारणाने लता मंगेशकर आणि कोल्हापूरकरांच्या नात्यात दरी निर्माण झाली.

फोटो स्रोत, Arjun Nalawade
जयप्रभा स्टुडिओ हा अस्मितेचा विषय असल्याने त्यावेळी कोल्हापूरमधून अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
"चित्रपटसृष्टीच्या वाटचालीच्या ऐतिहासिक खुणा जपल्या जाव्यात यासाठी लता मंगेशकर यांना मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. कोल्हापूरकरांच्या मूळ स्वभावाप्रमाणे लता मंगेशकर यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटत होत्या पण ती खाजगी मालमत्ता असल्याने त्याचं काय करायचं हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याची भूमिका लता मंगेशकर यांनी घेतली होती.
तर ही सार्वजनिक मालमत्ता असल्याने त्याचं जतन व्हावं अशी कोल्हापूरवासियांची इच्छा होती. वाद टोकाला गेल्याने कोल्हापूर आणि लता मंगेशकर यांच्यात दुरावा निर्माण झाला. तो आजअखेर कायम राहिला," असं पाटील सांगतात
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर हे जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या आंदोलनात सहभागी झाले होते.
ते सांगतात, "जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूरचे भूषण आहे. त्यामुळं त्याचा वापर हा केवळ चित्रिकरणासाठी व्हायला हवा अशी आमची इच्छा आहे. लतादिदींनी काही बिल्डरांच्या सांगण्यावरून या जागेवर इमारती विकसित केल्या आहेत. स्टुडिओची जागा सोडून आसपासच्या जागेचा विकास केला तरी आमची हरकत नाही मात्र स्टुडिओच्या जागेचा वापर हा केवळ चित्रपट निर्मितीसाठी व्हावा."
अष्टेकर यांनी जयप्रभा स्टुडिओमध्ये स्पॉटबॉय म्हणून काम करत होते. अवघ्या वीस रुपये मानधनावर अष्टेकर यांनी इथं चित्रसृष्टीसाठी काम केलं आहे.
ते सांगतात, त्यावेळी मद्रासहून दिग्दर्शक खास जयप्रभामध्ये चित्रीकरणासाठी आवर्जून यायचे. दादा कोंडके यांच्याही अनेक चित्रपटांचे चित्रीकरण याच स्टुडिओत झालंय. त्यामुळे चित्रसृष्टीची नाळ जोडलेल्या हा स्टुडिओ वाचवण्यासाठी हा लढा सुरू राहणार आहे.
लतादीदी आणि कोल्हापूरचं जिव्हाळ्याचं नातं
कोवळ्या वयात घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या लता मंगेशकर यांनी मास्टर विनायक यांच्या चित्रपटातून बालनटी म्हणून अभिनय क्षेत्रात काम सुरू केलं होतं. पुढे जगभर नाव कमावल्यानंतरही त्यांना कोल्हापूरचा विसर पडला नाही. कोल्हापूर ही कर्मभूमी असल्याचं त्या सांगायच्या.

फोटो स्रोत, Raja Upalekar
नलावडे सांगतात, "भालजीबाबा आणि लतादिदी यांच्या परिवाराचे सलोख्याचे संबंध होते. भालजी सुलोचनादिदींप्रमाणे लतादिदींना मानसकन्या मानायचे. लतादीदी परदेश दौरे करून आल्या तरी निवांत राहण्यासाठी नेहमी कोल्हापूरमध्ये येत असत. सुरूवातीला त्या जयप्रभा स्टुडिओमध्येच राहायच्या. पुढे पन्हाळा इथल्या बंगल्यावर राहू लागल्या."
ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी सांगतात, "लता मंगेशकर यांनी कोल्हापूरमध्ये मदत केल्याची उदाहरणं आहेत. कोल्हापूरमध्ये शिवाजी स्टेडियमच्या बांधकामात निधी उभारणीसाठी लतादीदींनी कोल्हापूरमध्ये गाण्याचा कार्यक्रम घेतला होता. जमा झालेल्या निधीतून शिवाजी स्टेडियमचं काही बांधकाम पूर्ण झालं.
तर कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले. त्यावेळी लतादीदी राज्यसभा सदस्य होत्या. तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या विनंतीवरून लतादीदींनी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृह बांधणीसाठी खासदार निधी दिला होता."
लता मंगेशकर यांच्या गाण्यावर कोल्हापूरकरांनी सदैव प्रेम केलं. याचा सन्मान म्हणून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने 21नोव्हेंबर 1978 रोजी लता मंगेशकर यांना डी. लीट पटवी देऊन गौरव केला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








