किरण माने प्रकरणामुळे दिलीपकुमार आणि मधुबालाच्या 'त्या' घटनेला उजाळा

किरण माने प्रकरणात शिवसेना, मनसे आणि भाजपने मानेंच्या विरूद्ध भूमिका घेतली आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माने यांच्या बाजूने भूमिका मांडली आहे. या संपूर्ण प्रकरणात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप का दिसत आहे?

याबाबत बोलताना माजी पत्रकार आणि प्रोफेसर नरेंद्र बंडबे सांगतात, "या संपूर्ण प्रकरणात अनेक गोष्टींची सरमिसळ आहे. पहिली गोष्ट म्हणजे अभिनेत्याची राजकीय सोशल मीडिया पोस्ट, त्याला मालिकेमधून काढून टाकण्याची कारवाई. पोस्ट आणि कारवाईचा संबंध असता तर संबंधित अभिनेता गेल्या कित्येक वर्षांपासून अशीच भूमिका घ्यायचा हे त्याच्या सोशल मिडिया पोस्टमधून समोर येतंय.

दुसरी गोष्ट म्हणजे शूटिंगस्थळी महिला आणि इतर सहकाऱ्यांशी अभिनेत्यानं केलेलं गैरवर्तन.

हे देखील दोन गटांमध्ये विभागलं गेलंय. जे राजकीय पक्ष माने यांच्या विरोधात प्रतिक्रिया देत आहेत, त्यांचे चित्रपट क्षेत्राशी आणि टेलिव्हिजन वाहिन्यांशी संबंध आहेत.

जे राजकीय पक्ष माने यांच्या बाजूने बोलत आहेत, त्यांच्यासाठी हा एक राजकीय मुद्दा आहे. ही सर्व परिस्थिती पाहता, या घटनेचा अभिनेता आणि राजकीय नेत्यांकडून फायदा उचलण्यात येत असल्याचं दिसतंय."

"त्याचबरोबर सिरीयलमध्ये काम करताना प्रत्येक कलाकाराशी करार केला जातो. तो मोडण्याचे दोन्ही बाजूचे नियम त्यात नमूद केलेल असतात. जर संबंधित अभिनेत्याला तसं इमेल किंवा फोनवर कळवलं असल्यास त्यानं ते सार्वजनिक करावं म्हणजे कारवाई संदर्भातली संदिग्धता नाहिशी होईल.

उलट वाहिनी आणि प्रोडक्शन हाऊसनं शिस्तभंगामुळं कारवाई झाली असं पत्रक काढलंय, याला संबंधित अभिनेत्यानं पुराव्यासहित उत्तर द्यावं असं अपेक्षित आहे. त्यामुळे जर अन्याय झाला असेल तर वेगवेगळ्या चित्रपट कर्मचारी संघटनांकडे हा अभिनेता का गेला नाही? हे ही विचार करायला लावणारं आहे. त्यामुळे राजकीय पक्ष असो किंवा अभिनेते 'बहती गंगा में हर कोई आपना हात धो रहा है,' असं म्हणायला हरकत नाही," असं बंडबे यांना वाटतं.

सिनेसृष्टी आणि राजकारण

मनोरंजन क्षेत्र आणि राजकारण यांचा संबंध आज नाही तर अनेक वर्षांपासून आहे. 1972-75 च्या काळात किशोरकुमारांची 'मेरे सपनो की राणी कब आयेगी तू' , 'रूप तेरा मस्ताना' ही गाणी तुफान चालत होती. रेडीओवर फक्त किशोरकुमार यांची गाणी लागायची. 1975 साली इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्याकाळात रेडीओवर सरकारचा '20 कलमी' कार्यक्रम यायचा.

त्या कार्यक्रमाचा प्रसार सिनेसृष्टीतील कलाकारांनी करावा असं केंद्रातील मंत्र्यांनी ठरवलं. किशोरकुमारांच्या गाण्यांचे 'फॅन्स' हे सर्वाधिक होते. तेव्हाचे नभोवाणी मंत्री व्ही. सी शुक्ला यांनी सरकारच्या समर्थनार्थ कार्यक्रमांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रस्ताव किशोरकुमार यांना दिला.

किशोरकुमारांनी तो नाकारला. त्यामुळे किशोरकुमार यांच्या गाण्यांवर जवळपास वर्षभर बंदी घालण्यात आली. हा किस्सा अनेक सिनेसृष्टीतील मान्यवर आणि जेष्ठ नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितला आहे.

हे नमूद करण्याचा उद्देश इतका की आणीबाणीच्या काळापासून ते सुशांत सिंग राजपूत प्रकरणापर्यंत लोकांनी पाहीलं आहे सिनेसृष्टी आणि राजकारण हे समिकरण चांगल्या वाईट प्रकरणात अनुभवलं आहे.

पण कलाकारांना परस्पर चित्रपटातून किंवा टीव्ही मालिकांमधून काढून टाकण्याचे प्रकार कधी सुरू झाले? याबाबत बोलताना, जेष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर सांगतात, "कलाकारांना सिनेमातून किंवा मालिकांमधून परस्पर काढून टाकण्याची परंपरा आहे. हे काही आज घडत नाहीये. अगदी 1955-60 काळापासून हे सुरू आहे."

हे सांगत असताना दिलीप ठाकूर एका सिनेमाचा किस्सा सांगतात, "1957 साली बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'नया दौर' नावाचा सिनेमा आला होता. त्यात दिलीपकुमार आणि मधुबाला होते.

"दिलीपकुमार आणि मधुबालाचं अफेअर होतं. सिनेमाच्या दरम्यान त्यांचे संबंध बिघडले. मधुबालाने काही सिनेमा सोडला नाही. पण बी.आर. चोप्रा यांनी 'स्क्रिन' मासिकात एक सिनेमाची मोठी जाहीरात दिली. त्या जाहीरातीतून मधुबालाच्या नावावर फुली मारण्यात आली होती. मग मधुबालाच्या वडिलांनी स्क्रिन मासिकात मधुबालाच्या आगामी सिनेमांच्या यादीची जाहीरात दिली. त्यात नया दौर या सिनेमाच्या नावावर फुली मारली होती. हे घडलं असलं तरी त्यावर कोणताही वादविवाद झाला नाही.

"पूर्वी या गोष्टी व्यावहारिकदृष्ट्या समजून घेतल्या जात होत्या. त्याचबरोबर बॉलीवूड आणि राजकारण हे समिकरणही जुनं आहे. अनेक सिनेमांमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे सीन्स वगळले जाणं, थिएटरमध्ये जागा मिळणं, कलाकारांना राजकीय पाठिंबा किंवा त्यांच्यावर बंदी घालणं हे वर्षानुवर्षे घडत आलं आहे. आता सोशल मिडीयामुळे या अश्या घटनांना वाचा फूटू लागली आहे," असं ठाकूर सांगतात.

1974 साली 'दुनियाका मेला' नावाचा सिनेमा आला होता. त्यात रेखा आणि अमिताभ बच्चन होते. त्यात सिनेमाचं थोडं शूटींगही झालं. पण काही कारणांमुळे अमिताभ बच्चन यांना काढून अभिनेते संजय खान यांना चित्रपटात घेण्यात आलं.

त्या सिनेमामधलं अभिनेत्री रेखाबरोबर शूट झालेलं 'तौबा तौबा' हे गाणं दोन्ही अभिनेत्यांबरोबरच इंटरनेटवर उपलब्ध आहे. एकच गाणं अमिताभ बच्चन आणि संजय खान दोघांकडून शूट करण्यात आले आहे. पण त्यावर आजवर कोणताही वादविवाद झाला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)