You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र : महाराष्ट्रात जानेवारीअखेर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक येऊ शकतो - राजेश टोपे
'महाराष्ट्रात जानेवारीअखेर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक येऊ शकतो, असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा सांगताना ते माध्यांशी बोलत होते.
टोपे पुढे म्हणाले, "राज्यात खूप मोठ्या पद्धतीने मृत्यू होताहेत, ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशी परिस्थिती नाहीये. सध्या साधारण ३८, ८५० आयसीयू बेड्स आहेत. या बेड्सवर एकूण १७१० एवढे लोक अॅडमिट आहेत. आयसीयू बेड्सच्या उपलब्धतेच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी आहे.
"व्हेंटिलेटर बेड्स 16 हजार आहेत, त्यांपैकी व्हेंटिलेटरवर असेल्या रुग्णांची संख्या ७०० आहे. १ लाख ३४ हजार ऑक्सिजन बेड्स आहेत. यातून एक गोष्ट दिसतीये की पायाभूत सुविधांवर ताण येईल असं चित्र नाहीये. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबतच्या बैठकीत आम्ही हेच सांगितलं."
"आजच्या बैठकीत टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट यावरच भर देण्याबद्दल चर्चा झाली. लसीकरणावरही आपल्याला भर द्यायचा आहे," असंही टोपे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "लक्षणं नसलेले राज्यात जवळपास 85 टक्के रुग्ण आहेत. सौम्य लक्षणं असलेले 13 टक्के आहेत. एक टक्के आयसीयूत भरती आहेत आणि दोन टक्के ऑक्सिजन बेडवर आहेत. या परिस्थितीत लक्षणं नसलेले जे लोक आहेत, त्यांना काय करावं आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन करायला हवं."
दरम्यान, राज्यातील कोरोना महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारनं नवीन निर्बंध जारी केले आहेत. ते कायम राहतील, असंही टोपे यांनी म्हटलं आहे. 9 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपासून हे निर्बंध लागू झाले आहेत.
महाराष्ट्रातील नवे निर्बंध
त्यानुसार, ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येणार आहे.
पण, ही सेवा घेतेवेळी मास्क काढण्याची परवानगी नसेल. तसंच लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच ही सेवा पुरवली जाईल. सलूनमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असावं, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.
जिमही 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहेत. कोणताही व्यायाम करताना मास्क काढता येणार नाही. संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच जीम करण्याची परवानगी. जीममधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असावं, असंही सुधारित आदेशात म्हटलं आहे.
नव्या नियमांनुसार, पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात जमावबंदी असेल. याकाळात 5 जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल. या काळात अत्यावश्यक कारणांशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही
याशिवाय, दहावी-बारावीच्या परीक्षा वगळता महाराष्ट्रातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत.
याव्यतिरिक्तही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.
- दहावी-बारावीच्या परीक्षा वगळता महाराष्ट्रातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार.
- स्विमिंग पूल, स्पा, वेलनेस सेंटर बंद.
- हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 7 काळात हेअर कटिंग सलून बंद राहतील.
- क्रीडा स्पर्धात्मक कार्यक्रम होणार नाहीत. राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स या प्रेक्षकांशिवाय होतील आणि स्पर्धकांना आणि अधिकाऱ्यांना बायो बबलमध्ये रहावं लागेल.
- एन्टरटेन्मेंट पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम, किल्ले आणि तिकीट लागणाऱ्या इतर सार्वजनिक जागा बंद.
- शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्समध्ये मर्यादित प्रवेश. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
- रेस्टॉरंट्स आणि उपहारगृह 50 टक्के क्षमतेने सुरू. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
- नाट्यगृह आणि सिनेमागृहातही 50 टक्के उपस्थिती. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
- अन्नपदार्थांची होम डिलीव्हरी सुरू राहणार.
- विमान, रेल्वे वा रस्तेमार्गे राज्यात दाखल होणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांना राज्यात दाखल होताना 72 तासांमधला RTPCR रिपोर्ट दाखवणं बंधनकारक.
- UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सूचनांनुसार होणार.
- सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी. वर्क फ्रॉम होमचा पर्याय किंवा वेगवेगळ्या कामाच्या वेळांचा पर्याय वापरावा. कार्यालय प्रमुखाने हे निर्णय घ्यावे.
- खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारी क्षमतेने काम.
- लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच ऑफिसमध्ये जायची परवानगी. लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावं.
होम आयसोलेशनसाठीच्या नवीन गाईडलाईन्स
केंद्र सरकारने आयसोलेशनसाठीच्या नवीन गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत.
- टेस्ट पॅाझिटिव्ह आल्यानंतर सात दिवसांनी आणि तीन दिवस ताप नसेल तर होम आयसोलेशननध्ये असलेला रुग्ण डिस्चार्ज धरला जाईल.
- होम आयसोलेशन संपल्यानंतर पुन्हा टेस्ट करण्याची गरज नाही.
- रुग्णांच्या कुटुंबीयांना लक्षणं नसतील तर टेस्ट करणं गरजेचं नाही. घरी आरोग्य तपासणी करावी.
- होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी टृीपल लेअर मास्क सतत घालून ठेवावा.
- आठ तासांनी मास्क बदलावा. मास्क 72 तास एका पेपरमध्ये बांधून ठेवावा. मग फेकून द्यावा.
- रुग्णाने हवा खेळती राहील अशा रूममध्ये रहावं.
- रुग्णाच्या वस्तूला कोणीही हात लावू नये.
- रुग्णाने शरीरातील ऑक्सिजन चाचणी (SPO2) करावी.
- रुग्णांनी घरी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात किंवा तीन वेळा दिवसातून वाफ घ्यावी.
- ताप उतरत नसेल तर डॅाक्टरांच्या सल्ल्याने दिवसातून चार वेळा पॅरेसेटिमॅाल 650 mg ची गोळी घ्यावी.
- डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय चेस्ट X रे, रक्ततपासणी आणि CT scan करू नका. स्वतःवर औषधाचे प्रयोग करु नका.
पुण्यामध्ये कोणते निर्बंध आहेत?
"माझी पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्हाला टोकाचं कुठलं तरी पाऊल उचलायला लावू नका," असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.
अजित पवार यांनी 4 जानेवारीला पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना मांडलेले महत्त्वाचे मुद्दे-
- पुण्यात उद्यापासून (5 जानेवारी) मास्क नसेल तर 500 रुपये दंड आणि थुंकल्यास हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
- दोन डोस असेल तरच हॉटेल, सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल.
- नियमांचं तंतोतंत पालन सर्वांनी करावे.
- 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार
- पुणे जिल्ह्यात हॉटेल, मॉल अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी 2 डोस घेतले नसतील तर प्रवेश देण्यात येणार नाही.
- पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर 74 टक्के नागरिकांनीच लशीचा दुसरा डोस घेतलेला आहे.
मुंबईतले निर्बंध काय आहेत?
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. विशिष्ट इमारतीतल्या 20 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली असेल तर संबंधित इमारत किंवा विंग सील करण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांनी होम आयसोलेशनचे नियम कसोशीने पाळावेत असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर रुग्णाने 10 दिवस विलगीकरणात राहावं.
कोणतीही लक्षणं नसतील पण चाचणी पॉझिटिव्ह असेल तर 3 दिवस विलगीकरणात राहावं. हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी 7 दिवस घरी विलगीकरणात राहावं. पाचव्या आणि सातव्या दिवशी त्यांनी चाचणी करावी. चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांनी रुग्णांसाठीच्या नियमांचं पालन करावं.
इमारतीच्या कार्यकारिणी समितीने कोरोना रुग्णांना अन्न, औषधं आणि जीवनापयोगी वस्तू पुरवाव्यात. कोरोना नियमावलीचं पालन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, वॉर्ड वॉर रुम कर्मचारी यांना सहकार्य करावं असं महापालिकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
इमारत डी-सील करण्याचा निर्णय वॉर्ड पातळीवर घेतला जाईल. कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यास वॉर्ड वॉर रुमशी संपर्क करावा.
मंगळवारपासून (4 जानेवारी) हे नियम लागू करण्यात येत असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.
'कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात जानेवारीत 2 लाख केसेस येऊ शकतील', असं राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्य़ा पत्रात म्हटलं आहे.
प्रदीप व्यास आपल्या पत्रात म्हणतात, "ओमिक्रॉन सौम्य आहे असं समजू नका, लस न घेतलेल्यांसाठी आणि सहव्याधी असलेल्यांसाठी हा व्हेरिएंट जीवघेणा आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनासंसर्ग खूप मोठा असेल आणि केसेस जास्त असतील, त्यामुळे लसीकरण मोहीम वाढवा आणि जीव वाचवा"
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)