बिपिन रावत अपघात: विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय?

ब्लॅक बॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्लॅक बॉक्स
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

भारतीय संरक्षण दलाचा सर्वोच्च सेनापती सीडीएस जनरल बिपिन रावत, यांच्यासह देशाने 11 अधिकारी आणि जवान हेलिकॉप्टर दुर्घटनेत गमावले.

जनरल रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरची कमांड अनुभवी आणि साहसी पायलटकडे होती.

मग ही दुर्घटना कशी घडली? कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? पायलटमध्ये अखेरचं संभाषण काय झालं? आपात्कालीन संदेश देण्यात आला होता? असे अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित झालेत.

या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा 'ब्लॅक बॉक्स' वायूदलाने ताब्यात घेऊन तपास सुरू केलाय.

त्या दिवशी नेमकं काय घडलं? हे कोडं विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सोडवू शकेल. त्यामुळे वायूदलाने तपास सुरू केलाय. पण हा 'ब्लॅक बॉक्स' असतो तरी काय? आपण जाणून घेऊया...

'ब्लॅक बॉक्स' म्हणजे काय?

डिजीटल फ्लाईट डेटा रिकॉर्डर (DFDR) आणि वैमानिकांचा कॉकपिटमधील आवाज (CVR) रेकॉर्ड करणारं उपकरण याला सामान्य भाषेत 'ब्लॅक बॉक्स' म्हटलं जातं.

विमानाच्या उड्डाणापासून ते लॅंड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा या 'ब्लॅक बॉक्स' मध्ये स्टोअर केला जातो.

मुंबईतील पायलट अमोल यादव बीबीसीशी बोलताना सांगतात, "डिजीटल फ्लाईट डेटा रिकॉर्डरमध्ये विमानातील प्रत्येक साधनाची माहिती डिजीटल पद्धतीने रेकॉर्ड करण्यात येते."

विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. तर, 'ब्लॅक बॉक्स' च्या मदतीने तपास अधिकाऱ्यांना विमानाचा प्रवास, अपघातासाठी काही तांत्रिक कारण जबाबदार आहेत का? नक्की काय घडलं होतं याची अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळू शकते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 'ब्लॅक बॉक्स' एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. विमान दुर्घटनेनंतर शेपटीला कमी मार लागतो, म्हणून ब्लॅक बॉक्स शेपटीच्या बाजूला बसवण्यात येतो.

अमोल यादव पुढे म्हणतात, "विमान दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होऊ नये यासाठी विमानाच्या शेपटीत ब्लॅक बॉक्सला ठेवण्यात येतो."

व्हीडिओ कॅप्शन, इंडोनेशियाच्या विमान अपघाताचं गूढ उकलेल?

'ब्लॅक बॉक्स' खरंच काळ्या रंगाचा असतो?

विमानाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला हा 'ब्लॅक बॉक्स' खरंतर काळ्या रंगाचा नसतो.

हा 'ब्लॅक बॉक्स' केशरी रंगाचा असतो. जेणेकरून विमान अपघातानंतर सहजतेने तपास अधिकाऱ्यांना ओळखता यावा.

निवृत्त फायटर पायलट आणि एव्हिएशन तज्ज्ञ विपूल सक्सेना सांगतात, "ऑरेंज किंवा केशरी रंग खराब हवामान किंवा इतर परिस्थितीत डोळ्यांनी सहजतेने ओळखता येतो. त्यामुळे ब्लॅक बॉस्कचा रंग ऑरेंज ठेवण्यात आलेला असतो."

तज्ज्ञ सांगतात, बूट ठेवण्याच्या बॉक्सच्या आकाराचा 'ब्लॅक बॉक्स' असतो.

'ब्लॅक बॉक्स'च्या आतील भागात थर्मल ब्लॉक असतो. यात मेमरी बोर्ड ठेवण्यात आलेले असतात.

'ब्लॅक बॉक्स' अत्यंत महत्त्वाचा का आहे?

विमानातील 'ब्लॅक बॉक्स'मध्ये विमानाची संपूर्ण माहिती स्टोअर केली जाते.

याचे दोन महत्त्वाचे भाग असतात,

  • फ्लाईट डेटा रिकॉर्डर
  • कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर

तज्ज्ञांच्या मते, फ्लाईट डेटा रिकॉर्डरमध्ये विमानाची तांत्रिक माहिती स्टोर केली जाते. उदाहरणार्थ हवामान, विमानाचा वेग, इंधनसाठा, ऑटो-पायलट स्टेटस, विमानाची उंची आणि दिशा याची माहिती यात स्टोअर करण्यात येते.

'ब्लॅक बॉक्स'ची रेकॉर्डिंग क्षमता 25 तासांची असते.

विपूल सक्सेना सांगतात, "फ्लाईट रेकॉर्डरमध्ये हवामान काय होतं, प्रेशर काय होतं, विमानाचा स्पीड काय होता, एखादं उपकरण अचानक बंद झालं तर त्याची माहितीदेखील यात रेकॉर्ड होते."

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये विमानातील आवाज रेकॉर्ड होतो. यात विमानातील पायलटचं संभाषण आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत होणारं संभाषण रेकॉर्ड होतं. यात दोन तासांचं रिकॉर्डिंग केलं जातं.

तज्ज्ञांच्या मते, विमानाला अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला, मानवीय चुकीमुळे झाला किंवा इतर कारणांमुळे याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळू शकते.

विमान अपघातानंतर 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित राहतो?

'ब्लॅक बॉक्स' ची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. विमान अपघातानंतर याच्या मदतीनेच दुर्घटनेची माहिती मिळू शकते.

पायलट अमोल यादव याबाबत माहिती देताना सांगतात, "ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग टेपला इजा होऊ नये किंवा त्या जळू नयेत यासाठी याचं आवरण अत्यंत मजबूत बनवण्यात आलेलं असतं."

'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित रहावा यासाठी तो स्टिल किंवा टायटेनियमचा बनवण्यात आलेला असतो.

  • एक तासापर्यंत 1000 अंश सेल्सियस पेक्षाही जास्त तापमानात 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित राहतो.
  • समुद्राचं खारं पाणी किंवा इतर ठिकाणी 6000 मीटर्स खोलपर्यंत हा सुरक्षित राहतो.
  • विमान समुद्रात क्रॅश झालं असेल तर 'ब्लॅक बॉक्स' शोधण्यासाठी यावर एक बिकन किंवा सिग्नल असतो.
  • हा अल्ट्रासाउंड सिग्नल अपघातानंतर विमानात अपघातानंतर विविध विमानात 30 ते 90 दिवसापर्यंत सिग्नल पाठवतो

याची सुरक्षा चाचणीसाठी याला 750 किलोमीटर प्रतितास या वेगाने कॉक्रिटच्या भिंतीवर आपटलं जातं. पाच मिनिटांकरिता 2.5 टन वजन यावर ठेवण्यात येतं.

तपासात 'ब्लॅक बॉक्स' महत्त्वाचा दुवा कसा?

विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सापडल्यानंतर तो सर्वप्रथम प्रयोगशाळेत पाठवला जातो.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ब्लॅक बॉक्समधील संपूर्ण डेटा तपासाला उपलब्ध होण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो.

विमानाच्या स्टोअर डेटामधून आणि पायलटमधील संभाषणातून दुर्घटनेआधी शेवटच्या क्षणी विमानात नेमकं काय झालं होतं, काय सरू होतं याची माहिती तपास अधिकाऱ्य़ांना मिळते. ज्यावरून तपासाची पुढील दिशा निश्चित होते.

ब्लॅक बॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्लॅक बॉक्स

निवृत्त फायटर पायलट आणि एव्हिएशन तज्ज्ञ विपूल सक्सेना म्हणतात, "अपघातानंतर टेक्निकल आणि ऑपरेशन टीम याचा अभ्यास करते. रिडरच्या माध्यमातून ब्लॅक बॉक्सचा डेटा तपासासाठी ट्रान्सलेट करण्यात येतो. याचा अभ्यास केल्यानंतर विमानाला नक्की काय झालं याची माहिती मिळू शकते."

तज्ज्ञ म्हणतात, ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास अधिकारी विमान दुर्घटनेच्या आधीचे काही तास रिडिझाइन करतात. याच्या माध्यमातून काही गडबड दिसून आली तर त्याची तपासणी केली जाते.

'ब्लॅक बॉक्स'चा शोध कोणी लावला?

ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, संशोधक डेव्हिड वॉरेन यांनी सर्वप्रथम 'ब्लॅक बॉक्स'चा शोध लावला.

वॉरेन ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या एरोनॉटीकल रिसर्च लॅबमध्ये संधोधक होते. साल 1950 च्या मध्यात एका विमान अपघाताचा डेव्हिड वॉरेन तपास करत होते. त्यावेळी विमानात दुर्घटनेआधी नक्की काय झालं होतं याची माहिती मिळाली तर अधिक चांगलं होईल अशी कल्पना सुचल्यानंतर त्यांनी संशोधन सुरू केलं.

1960 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिला ब्लॅक बॉक्स विमानात बसवण्यात आला. भारतात 2005 पासून सर्व विमानांमध्ये ब्लॅकबॉस्क अनिवार्य करण्यात आले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)