कोरोना व्हायरस : कोव्हिड-19 संसर्ग झाल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
कोरोनो व्हायरस संसर्गातील एक धक्कादायक गोष्ट तज्ज्ञांना आढळून आलीय. कोरोना संसर्गामुळे धडधाकट आणि मधुमेह नसलेल्यांनाही, डायबिटीसचं निदान होत असल्याचं स्पष्ट झालंय. डॉक्टर याला "कोव्हिड-19 मुळे झालेला मधुमेह," असं म्हणतात.
मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे डायबेटोलॉजिस्ट डॉ. व्यंकटेश शिवणे सांगतात, "कोरोना संसर्गामुळे नव्याने मधुमेह होण्याचं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र, ही काळजी करण्यासारखी गोष्ट नक्कीच आहे."
मधुमेह, उच्च रक्तदाबाने ग्रस्त रुग्णांना, कोरोनासंसर्गाचा धोका अधिक असतो. पण, कोरोनाव्हायरस नव्याने होणाऱ्या मधुमेहासाठी कारणीभूत असल्याचे पुरावे तज्ज्ञांना मिळाले आहेत. कोव्हिड-19 संसर्गामुळे नव्याने होणाऱ्या मधुमेहावर जगभरात संशोधन सुरू आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर शुगर का वाढते?
कोरोनासंसर्गामुळे मधुमेह का होतो? याची कारण जाणून घेण्याआधी आपल्याला, कोरोनाबाधितांची शुगर का वाढते? याची तीन प्रमुख कारणं समजावून घ्यावी लागतील.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार,
- मधुमेहींमध्ये कोरोनासंसर्ग आणि आजारामुळे प्रचंड स्ट्रेस (ताण) निर्माण होतो. हे शुगर वाढण्याचं एक कारण आहे.
- स्टिरॉईडमुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं
- ज्या व्यक्तींना कधीही मधुमेह नव्हता अशांची शुगर कोरोनासंसर्गामुळे अचानक वाढलेली पहायला मिळाली
कोरोनासंसर्गामुळे नव्याने मधुमेह होण्याचा धोका आहे?
कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर म्हणतात, गेल्यावर्षभरात कोव्हिमुळे नव्याने मधुमेहाचा त्रास सुरू झालेले अनेक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनासंसर्गामुळे नव्याने मधुमेह कसा होतो याबाबत डॉ. व्यंकटेश शिवणे माहिती देतात.
- कोरोनाव्हायरस फुफ्फुसातील ACE- 2 रिसेप्टर्सना बाईंड (चिकटतो) करतो आणि वाढतो
- हेच ACE- 2 रिसेप्टर्स स्वादुपिंडातील (पॅनक्रियास) बीटा सेल्सवर (पेशी) असतात
- कोव्हिड-19 व्हायरस बीटा सेल्सवर हल्ला करतो. बीटा सेल्सच्या संपर्कात आल्याने इन्शुलिन उत्पादनाचं प्रमाण कमी होतं
- परिणामी शरीरातील साखर (शुगर) वाढू लागते
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, स्वादुपिंडात तयार होणारं इन्शुलिन शरीरातील साखरेवर नियंत्रणाचं काम करतं. पण, इन्शुलिनचं उत्पादन कमी झाल्याने शुगर वाढते. या यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णांना बाहेरून इन्शुलिन किंवा औषध द्यावी लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
बॉम्बे हॉस्पिटलचे कन्संटंट डायबेटोलॉजिस्ट डॉ. राहुल बक्षी नव्याने मधुमेहाचं निदान होण्याची तीन कारणं सांगतात,
- बऱ्याचवेळा, रुग्णांना शुगरचा त्रास असल्याचं माहित नसतं. पण, तपासणीत शुगर वाढल्यांच दिसून येतं
- काहींची शुगर अगदी काठावर असते. याला प्री-डायबिटीक म्हणतात. कोरोनासंसर्गात साखर वाढते
- तर, काहींचे तीन महिन्यांचे शुगर (HBA1C) रिपोर्ट नॉर्मल असूनही त्यांची शुगर वाढल्याचं दिसून आलंय
फोर्टिस रुग्णालयाच्या एन्डोक्रायनोलॉजिस्ट (अंत:स्रावी तज्ज्ञ) डॉ. श्वेता बुद्याल सांगतात, "कोरोनामुळे मधुमेह होत असल्याचं समोर आलंय. स्वादुपिंडात इन्शुलिन उत्पादन करणाऱ्या पेशींवर व्हायरसच्या थेट परिणामामुळे हे होऊ शकतं."
"कोव्हिडमुक्त झाल्यानंतर नव्याने मधुमेहाचा त्रास सुरू झालेले 1-2 रुग्ण दर आठवड्याला रुग्णालयात येतात," असं त्या पुढे सांगतात.
तर, एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना वरिष्ठ डायबेटोलॉजिस्ट डॉ. व्ही. मोहन म्हणतात, "संशोधनात कोरोना व्हायरस स्वादुपिंडाच्या बीटा सेल्समध्ये आढळून आलाय. व्हायरस पेशींवर हल्ला करतो."
"कोव्हिडमुळे मला सुरू झाला मधुमेहाचा त्रास"
खासगी कंपनीत काम करणारे 37 वर्षीय नितीन पराडकर (नाव बदललेलं) यांना कोव्हिडमुळे मधुमेहाचा त्रास सुरू झालाय.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "मला मध्यम स्वरूपाचा संसर्ग होता. उपचारात स्टिरॉईड देण्यात आलं नाही. पण, कोरोनामुक्त झाल्यानंतर डॉक्टरांनी शुगर जास्त असल्याचं सांगितलं. तीन आठवड्यानंतर पुन्हा तपासणी केली, शुगर जास्त होती. आता मधुमेहावरची औषध सुरु आहेत."
कोव्हिडमुळे झालेला मधुमेह कायमचा रहातो?
केईएम रुग्णालयाचे डायबेटोलॉजिस्ट डॉ. व्यंकटेश शिवणे आणि त्यांच्या टीमने "कोरोनामुळे होणारा मधुमेह" यावर संशोधन केलं होतं. रुग्णालयात दाखल काही रुग्णांची शुगर 200-250 तर काहींची 300-400 पर्यंत वाढल्याचं आढळून आली होतं.
ते म्हणाले, "कुटुंबात कोणाला मधुमेह नसलेल्या तसेच साखरेची पातळी सामान्य असलेल्यांना कोव्हिडमुळे मधुमेहाची सुरूवात झाल्याचं आढळून आलं."
मग, कोव्हिडमुळे झालेला मधुमेह कायमस्वरूपी असतो? यावर बोलताना डॉ. शिवणे सांगतात, "कोरोनामुळे मधुमेह झालेल्या रुग्णांची साखर उपचारादरम्यान काही दिवसात सामान्य झाल्याचं पहायला मिळालं. पण काही रुग्णांमध्ये टाईप-2 मधुमेहींप्रमाणे शुगर जास्त दिसून आली."
"कोरोनामुळे होणारा मधुमेह काही काळाकरिता आहे, का कायमचा. हे तपासण्यासाठी आपल्याला रुग्णांचा फॉलोअप करून अभ्यास करावा लागेल, " असं डॉ. शिवणे सांगतात.
स्टिरॉईड वाढवतात शुगर लेव्हल?
कोरोना उपचारात जीव वाचवण्यासाठी स्टिरॉईड फार महत्त्वाचे आहेत. पण स्टिरॉईडच्या वापरमुळे रुग्णाच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं.
डॉ. राहुल बक्षी पुढे सांगतात, "रुग्णाला मधुमेह असो किंवा नसो. स्टिरॉईडमुळे रुग्णाच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं." अशांना शुगर नियंत्रणासाठी डॉक्टर इन्शुलिन देतात.
"बऱ्याचदा असं लक्षात आलं की स्टिरॉईडचा डोस कमी किंवा बंद झाल्यानंतरही शुगर कमी झाली नाही. याचा अर्थ रुग्णांच्या शरीरात काहीतरी झालंय, त्यामुळे शुगर लेव्हल कमी होत नाहीये. अशांना कोरोनामुक्त झाल्यानंतरही औषध सुरू ठेवावी लागतात," असं डॉ. बक्षी पुढे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिडमुक्त झालेल्यांनी काय काळजी घ्यावी?
डॉ. शिवणे सांगतात, कोरोनामुक्त झालात म्हणजे सेलिब्रेट करण्यासारखं काहीच नाही. मधुमेही असेल तर तुम्ही फक्त अर्धीच लढाई जिंकली आहे. शरीरातील साखरेचं नियंत्रण कोरोनाविरोधातील लढाईत सर्वात महत्त्वाचं आहे.
कोरोनामुक्त झालेल्यांसाठी ते काही टीप्स देतात,
- कोरोनासंसर्ग झालेल्या 30 वर्षावरील प्रत्येकाने मधुमेहाची चाचणी केली पाहिजे
- होम क्वॉरंन्टाईनमध्ये असलेल्यांनी खासकरुन शुगर तपासणी केली पाहिजे
- कोव्हिडमुक्त झाल्यानंतर 180 दिवस साखरेवर नियंत्रण अत्यंत महत्त्वाचं आहे
- याचं कारण, बुरशीमुळे होणाऱ्या म्युकरमायकॉसिसचा संसर्ग तीन-चार महिन्यानंतरही होण्याची शक्यता असते
- यासाठी शरीरातील साखरेचं प्रमाण 70 ते 180 मध्ये ठेवलं पाहिजे
- HB1C (साखरेचं सरासरी तीन महिन्यांचं प्रमाण) 7 च्या आत असणं महत्त्वाचं
कोव्हिडमध्ये मधुमेही रुग्णांनी काय खावं?
व्होकार्ट रुग्णालयाचे एन्डोक्रायनोलॉजिस्ट (अंत:स्रावी तज्ज्ञ) डॉ. अल्तमस शेख मधुमेहींना एक महत्त्वाचा सल्ला देतात. "मधुमेहींनी वेळेवर आणि योग्य प्रमाणात जेवलं पाहिजे. एकाचवेळी पोट भरून जेऊ नका. दोन-तीन तासांच्या अंतराने खात रहा," असं ते म्हणतात.
- सर्दी, ताप असला तर टोमॅटो, पालक यांचं सूप घेऊ शकता
- हिरव्या भाज्या, कडधान्य आणि डाळ खाऊ शकता. ताक पिऊ शकता
- नाष्टा करताना दोन ते तीन एग व्हाईट (अंड्याच्या पांढरा) खाणं चांगलं
- चिकन किंवा मासे खाऊ शकता
- तळलेले आणि गोड पदार्थ मधुमेहींनी खाऊ नयेत
- भरपूर पाणी प्यावं, शरीरातलं पाणी कमी होऊ देऊ नये
कोरोनामुळे होणाऱ्या मधुमेहावर संशोधन सुरू
लंडनच्या किंग्ज कॉलेज आणि ऑस्ट्रेलियाच्या मोनॅश विद्यापिठाद्वारे कोरोनामुळे मधुमेह होतोय का, यावर संशोधन सुरू करण्यात आलंय. यासाठी संशोधकांनी "कोव्हिडॅब" रजिस्ट्री बनवली आहे.
मोनॅश विद्यापिठाच्या संशोधक आणि आंतरराष्ट्रीय डायबिटीस फेडरेशनच्या मानद अध्यक्ष प्रो. पॉल झिम्मेट सांगतात, "कोरोनामुळे नव्याने होणाऱ्या मधुमेहाचं प्रमाण किती आहे याची अजूनही पूर्ण माहिती नाही. मधुमेह कायम रहातो किंवा संसर्गानंतर जातो याबाबतही ठोस माहिती नाही. त्यामुळे ही रजिस्ट्री बनवून आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला याबाबतची माहिती देण्याची विनंती करतोय."
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना वरिष्ठ डायबेटोलॉजिस्ट डॉ. व्ही. मोहन म्हणतात, "आम्ही या रजिस्ट्रीमध्ये कोव्हिडनंतर नव्याने मधुमेह झालेल्या रुग्णांची माहिती दिलीये. जगभरात 600 पेक्षा जास्त प्रकरणं रिपोर्ट करण्यात आली आहेत आणि हा नंबर वाढतोय."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








