You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेदरलॅंडची मिरची परभणीत पिकवून गावातल्या महिलांना रोजगार देणारी वैष्णवी
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही म्हण तुम्ही पन्नास एक वेळा तरी ऐकली असेल. या म्हणीचं मूळ काय आणि कशामुळे ही म्हटली जाते ते गुपितच आहे. पण परभणीच्या तरुणीने नेदरलॅंडची मिरची घेतली आहे, सध्या पंचक्रोशीत त्याचीच चर्चा आहे.
बहुतेक तरुण-तरुणींचं स्वप्न असतं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरात जाऊन नोकरी करावी किंवा आणखी पीएचडी करून आणखी मोठी संधी शोधावी. पण मार्च 2020 ला कोरोनाची लाट आली आणि अनेक तरुण तरुणींच्या या स्वप्नांचा चुराडा झाला.
कोरोनाच्या काळात जॉब मिळवणं तर सोडाच पण फ्रेशर्सला नवा जॉब शोधणे देखील अवघड होऊन गेले होते. अशा शेकडो तरुण-तरुणींपैकी परभणी जिल्ह्यातली वैष्णवी देशपांडे देखील एक होती.
वैष्णवीला देखील एम. ए. इतिहास झाल्यावर पीएचडी करावी किंवा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून अनुभव घ्यावा असं वाटत होतं. पण लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ बंद पडले. घरातच आणखी किती काळ थांबणार? स्वतःच काहीतरी सुरू करावं, असं वैष्णवीला सतत वाटत होतं.
तिने अनेक दिवस घेतले हा विचार करण्यासाठी आणि ठरवलं की आपण शेती करायची. वैष्णवीने आपल्या गावातच पॉलीहाऊस टाकून सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली आहे. रासायनिक खतांमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं, अशावेळी सेंद्रीय शेती ही वरदान ठरू शकते असा विश्वास मनात बाळगून वैष्णवीने आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला.
पॉलीहाऊस म्हणजे काय आणि ते का उभारावं वाटलं?
सोनपेठ तालुक्यातील शेलगावमध्ये वैष्णवीच्या वडिलांची सहा एकर शेती आहे. त्याच ठिकाणी वैष्णवीने 10 गुंठ्यामध्ये पॉलीहाऊस उभं केलं आहे.
आता जरी वैष्णवी ही स्वतःच्या पायावर उभी असलेली एक शेतकरी असली तरी हा प्रवास इतका सोपा नव्हता, असं ती सांगते. अनेक अडचणींचा सामना करून तिने पॉलीहाऊस उभं केलं आहे.
पॉलीहाऊस म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी आपण नियंत्रित तापमान आणि हवामानात एखादं पीक घेऊ शकतो.
जर महागाचं बी-बियाणं घेऊन शेती करायची ठरवलं तर अवकाळी पाऊस किंवा दुष्काळाचा फटका बसू शकतो, अशा वेळी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो. पण पॉलीहाऊसच्या नियंत्रित वातावरणात पीक एकदम सुरक्षित राहतं. जेव्हा काढायचं तेव्हा काढता येऊ शकतं.
या गोष्टींचा विचार करून वैष्णवीने आपल्या भावाच्या मदतीने पॉलीहाऊस तयार करण्याचा निर्णय घेतला.
कसं उभं राहिलं पॉलीहाऊस?
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन शिथील झाल्यावर वैष्णवी तिच्या भावाकडे लोणावळ्याला गेली. भावाने पॉलीहाऊस उभारून लेट्युस, शिमला मिर्ची आणि ब्रोकोली अशा भाज्यांचं उत्पादन घेतल्याचं तिने पाहिलं. अशा प्रकारचं उत्पादन मला गावाकडं घेता येऊ शकतं का असं तिने विचारलं.
'जर तुझी मेहनत करायची तयारी असेल तर नक्कीच घेता येऊ शकेल,' असं तिच्या भावाने तिला सांगितले.
मग शेलगावला आल्यावर तिने सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. तिची मेहनत पाहून तिच्या वडिलांनी पॉलीहाऊसमध्ये गुंतवणूक करण्याचं ठरवलं. मग भावाच्या मार्गदर्शनाखाली तिने 10 गुंठ्यावर पॉलीहाऊस उभं केलं.
गावातल्या महिलांना दिलं काम
पॉलीहाऊस तयार करण्यापासून ते त्यात चरे तयार करणं, पीक घेणं ते काढणे या सर्व गोष्टी इथे महिलाच करतात.
गावातल्या महिलांना वैष्णवीने तिची योजना सांगितली आणि तुमची मला खूप मदत होऊ शकते असं ती त्यांना म्हणाली. वैष्णवीची योजना ऐकून गावातल्या महिलांनी तिला पाठिंबा दिला.
लॉकडाऊनच्या काळात त्यांचे रोजगार बंद झाले होते. त्यांना रोजगार देखील मिळाला. पहिल्यांदा वैष्णवीने शिमला मिरचीचं पीक घ्यायचं ठरवलं. नेदरलॅंडहून मागवलेलं बियाणे वापरून तिने शिमला मिरचीचं पीक घेतलं.
सेंद्रीय शेती सर्वांच्याच फायद्याची
रासायनिक खतांचा वापर न करता पीक घेतल्यास ते सर्वांच्याच फायद्याचं ठरू शकतं असा विश्वास वैष्णवीला आहे. ती सांगते, "सेंद्रीय खत घेऊन शेती केल्यास आपल्याला विषमुक्त भाज्या आणि फळं मिळू शकतात. या भाज्या रासायनिक खतांचा वापर करून घेतलेल्या भाज्यांपेक्षा चविष्ठही असतात तसेच आरोग्यदायीदेखील."
शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशींचे शेण आणि पालापाचोळा वापरून तिने घरीच खत तयार केलं आणि त्याचा वापर शिमला मिरचीचं पीक घेण्यासाठी केल्याचं ती सांगते. रासायनिक खतांची किंमत खूप जास्त असते, पण सेंद्रीय खत आपण अल्पदरात तयार करू शकतो, असं ती आत्मविश्वासाने सांगते.
पीक तर घेतलं पण लॉकडाऊनचा फटका
शिमला मिरची आल्यावर ती पुणे-मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलला पाठवण्याची वैष्णवीची योजना होती. पण सध्या लॉकडाऊन असल्यामुळे तिथून ऑर्डरच मिळाल्या नाहीत.
"पिवळ्या आणि लाल रंगाच्या शिमला मिरचीला परभणी जिल्ह्यात मागणीच नाहीये. अनेकदा लोक म्हणतात मिरची पिवळी पडली वाटतं. तेव्हा त्यांना समजावून सांगावं लागतं की मिरची पिवळी नाही पडली तर मिरचीचं पीकच तसं घेतलं आहे. ही नेदरलॅंडची मिरची आहे. पण तरीदेखील लोक ती घेत नाहीत. आम्ही हिरव्या मिरच्या विकल्या तर लाल आणि पिवळ्या मिरच्या गिफ्ट केल्या," असं ती सांगते.
"व्यवसाय म्हटलं तर कमी अधिक प्रमाणात नफा-तोटा ठरलेलाच असतो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे माझं आर्थिक नुकसान झालं आहे पण भविष्यात हीच परिस्थिती कायम राहणार नाही.
"पुढे चालून लेट्युस, ब्रोकोली असं पीक घेण्याचं माझ्या मनात आहे. काही फुलं किंवा औषधी वनस्पती देखील घेता येऊ शकते, ही तर केवळ सुरूवात आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे," असं वैष्णवी सांगते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)