कोरोना: लॉकडाऊन नसता लावला तर महाराष्ट्रात ही भीषण परिस्थिती ओढावली असती

कोरोना, लॉकडाऊन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉकडाऊनमधील दृश्य
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"लोकांनी खबरदारी घेतली नाही तर भारतात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दिवसाला मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही 2300 च्या वर असेल," हे विधान थोडं अतिशयोक्तीपूर्ण वाटत असेल पण लॅन्सेट या प्रतिष्ठित नियतकालिकात यासंबंधात अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रालाच बसला आहे. जर लॉकडाऊन नसता तर महाराष्ट्रात कशी भीषण परिस्थिती निर्माण झाली असती हे शोधण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आजपासून (22 एप्रिल) कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की राज्यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय समजावा. मग राज्यात लॉकडाऊन लागेल की नाही याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले गेले. पण शेवटी राज्यात लॉकडाऊनची घोषणा झाली.

लॉकडाऊन नसता लागला तर पंधराच दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांवर गेली असती असं देखील म्हटलं जात आहे हे अंदाज नेमके कसे काढण्यात आले आहेत ते आता आपण पाहूत.

2 मे पर्यंत रूग्णांचा आकडा 10 लाख पार करणार?

सध्या राज्यात कोरोनाचे 6,83 856 सक्रिय रूग्ण आहेत. रूग्णांचा हा आकडा 2 मे पर्यंत 10,94,996 होऊ शकतो असा अंदाज प्रशासकीय यंत्रणांकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात हॉस्पिटलमध्ये उपलब्ध बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरर्सचा तुटवडा आहे. अशातच ही इतकी रूग्ण संख्या वाढल्यानंतर हॉस्पिटलमध्ये बेडच्या सुविधा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा अधिकाधिक वाढेल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी भीती प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

2 मे पर्यंतचा अंदाज (सक्रीय रूग्ण आणि बेड संख्या)

कोरोना
फोटो कॅप्शन, तक्ता1

वरील आकडेवारीनुसार राज्यात 35 जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यांमध्ये रूग्णांसाठी बेडची संख्या ही उणे दिसत आहे. जर कठोर लॉकडाऊन लावला तर कदाचित काही प्रमाणात ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.

कोरोना
फोटो कॅप्शन, तक्ता2

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी (20 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, "सध्याची परिस्थिती पाहता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक मंत्र्यांने कठोर लॉकडाऊन पाहिजे असं मत मांडलं. कागदावर अनेक सवलती देऊन 'ब्रेक द चेन' ही मोहीम राबवता येणार नाही. खरंच जर साखळी तोडायची असेल तर कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा निर्णय लवकर जाहीर करावा असा सर्व मंत्र्यांचा आग्रह आहे.

रूग्णालयाचे बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन, औषधं आणि डॉक्टरर्स याचा 80-90% वापर आपण करतो आहोत. सध्या सामुदायिक संसर्ग होतो आहे. तो वाढतो आहे. जर साखळी तोडायची असेल तर अत्यावश्यक सेवेतील दुकानं आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वाहतूक यावरही कडक निर्बंध लागू करावे लागतील, नाहीतर आरोग्य यंत्रणेवरचा भार पेलवणं कठीण होईल".

कोरोनाचं संकट तीव्र होतं?

31 मार्चपर्यंत राज्यातल्या कोरोना रूग्णांची संख्या दिवसाला 40 हजारांच्या आसपास होती. मागच्या 20 दिवसांत हा आकडा दिवसाला 62 हजारांच्या घरात गेला. गेल्या वीस दिवसांमधली ही साधारण 22 हजार रूग्णांची दिवसागणिक वाढ आहे. हा आकडा मोठा दिसत असला तरी कोरोना चाचण्यांचीही संख्या वाढवल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

लॅन्सेट कोव्हिड19 कमिशनच्या अहवालानुसार, 'लोकांनी खबरदारी घेतली नाही तर देशात कोरोनाचे दिवसाला 1750 बळी जातील आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ही संख्या 2320 होऊ शकते' असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशाच्या या परिस्थितीची अधिक झळ ही महाराष्ट्राला पोहचू शकते.

कोरोना, लॉकडाऊन

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, कोरोना लॉकडाऊन

राज्यातल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. रूग्णांसाठीचे बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा जाणवत आहे.

नांदेड जिल्हा रूग्णालयातील अ‍ॅम्ब्युलन्स चालक सुरेश बोईनवाड सांगतात, "मागच्या आठवड्यात मला एक रूग्ण गंभीर असल्याचा फोन आला. मी त्या 80 वर्षाच्या रूग्णाला अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो. पण आल्यावर बेड नाही असं सांगण्यात आलं. त्यानंतर मी एकाच रूग्णाला घेऊन नांदेडमध्ये 3 तास फिरत होतो. कुठेच बेड मिळाला नाही. मी रूग्णाला रस्त्यावर कसं सोडणार? कुठे सोडणार? हा प्रश्न मला पडला. बराच वेळ त्या रूग्णाला अ‍ॅम्ब्युलन्समध्येच ठेवावं लागलं. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या नातेवाईकांनी काहीतरी मार्ग काढला".

हा अंदाज चुकीचाही ठरू शकतो?

राज्यातचा आकडा हा 10 लाखांच्या पार गेला तर आरोग्य यंत्रणेचं काय होईल? कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर शशांक जोशी म्हणतात, "हे आकड्यांचे अंदाज कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळीही वर्तवण्यात आले होते. पण बर्‍याचदा ते चुकीचे ठरले. कोरोना व्हायरस आणि त्याच्या रूग्णांचा अंदाज लावणं हे आताच्या परिस्थितीत कठीण आहे.

सध्या सुरू असलेल्या निर्बंधांमुळे आकडे पूर्णपणे नसले तरी काही प्रमाणात म्हणजे 60 हजारांवर स्थिर होताना दिसत आहे. तो पुढे लाखांमध्ये वाढेल असं वाटत नाही. याउलट आकडा स्थिर होऊन कमी व्हायला सुरवात होईल. पण यासाठी जर लोकांनी घरात बसून निर्बंध पाळले पाहिजेत".

कोरोना

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE

फोटो कॅप्शन, लॉकडाऊन

पूर्ण लॉकडाऊनमुळे या परिस्थितीत फरक पडू शकतो का? यावर डॉ. शशांक जोशी म्हणतात, "जेव्हा तुमची आरोग्य यंत्रणा सक्षम नसते तेव्हा पूर्ण लॉकडाऊनचा विचार केला पाहिजे. मी वैयक्तिक लॉकडाऊनच्या बाजूने नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य यंत्रणा कमी पडतेय असं वाटतं त्या जिल्ह्यात कडक निर्बंध असले पाहिजेत आणि विशेष करून लोकांनीही ते पाळले पाहीजेत."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)