नाना पटोले - राज्यातील मतदारांना EVMसह मतपत्रिकेचाही पर्याय द्या : #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. राज्यातील मतदारांना EVM सह मतपत्रिकेचाही पर्याय

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसंच विधानसभा निवडणुकीत मतदारांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह (EVM) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाने यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली.

नागपूर येथील प्रदीप उके यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन तसंच याचिका सादर केली होती. यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (2 फेब्रुवारी) मुंबई येथील विधानभवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

राज्यातील मतदानांना EVM द्वारे मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध होणे, हा मतदाराचा अधिकार असल्याचं उके यांचे वकील अॅड. सतीश उके यांनी म्हटलं. तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही EVM ला अनेक प्रगत देशांनी नाकारलं असल्याचं सांगितलं.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून कायदा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिली. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

2. शेतकरी आंदोलकांप्रमाणे मराठा आंदोलकांना का भेटला नाहीत - निलेश राणे

शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. या भेटीवर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

संजय राऊत जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले, तसे ते मराठा आंदोलकांना कधीच का भेटले नाहीत, असा सवाल निलेश राणे यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.

महाराष्ट्रातील कुठल्याही आंदोलनाला संजय राऊत कधीच उपस्थित राहिले नाहीत. त्यांना महाराष्ट्रातील आंदोलनकारी नको, फक्त महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करायला पाहिजे, असं म्हणत राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केलीय. ही बातमी लोकमतने दिली आहे.

3. हा देशाचा अर्थसंकल्प की OLX ची जाहिरात - भाई जगताप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पातील तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं चित्र आहे.

मोदी सरकारच्या खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या निर्णयावर विरोधक मोठ्या प्रमाणात आक्षेप घेताना दिसत आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही यावरून मोदी सरकारवर घणाघात केला.

हा देशाचा अर्थसंकल्प आहे की OLX वरची जाहिरात अशी टीका जगताप यांनी ट्विटवरून केली आहे.

सरकारच्या मनात आलं तर ते संसदही विकून टाकतील, 65 वर्षांत 65 रुपयांना मिळणारं पेट्रोल 65 महिन्यांत शंभरीजवळ गेलं. एकीकडे पेट्रोलवरचा अधिभार कमी केला, पण तेवढाच कृषि अधिभार लावण्यात आला, अशी टीका भाई जगताप यांनी केली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

4. हिंदू धर्म नव्हे तर एल्गार परिषदच सडक्या मेंदूची - ब्राह्मण महासंघ

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शरजील यांच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना ब्राह्मण महासंघानेही त्यांच्यावर कडाडून टीका केली.

हिंदू धर्म नव्हे तर एल्गार परिषद हीच सडक्या मेंदूच्या लोकांनी भरली आहे, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

मंगळवारी (2 फेब्रुवारी) पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दवे म्हणाले, "शरजील उस्मानी या व्यक्तीने एल्गार परिषदेत केलेली वक्तव्ये अनपेक्षित नव्हती. शरजील किंवा अरुंधती रॉय हे सडकी, कुजलेली विधाने करण्याची शक्यता आहे, अशी शंका आम्ही पोलिसांकडे व्यक्त केलीच होती, दुर्दैवाने ती शंका खरी ठरली."

ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

5. मागच्या सरकारने नव्हे तर माजी मंत्र्याने त्रास दिला होता - डॉ. तात्याराव लहाने

मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आपल्याला खूप त्रास झाल्याचं वक्तव्य ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी नुकतंच केलं होतं. पण या वक्यव्यावर लहाने यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

लहाने यांनी आपल्या वाक्यात थोडीशी दुरुस्ती केली. मागील सरकारने नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्र्याने आपल्याला खूप त्रास दिला होता, असं डॉ. लहाने यांनी आता म्हटलं आहे.

मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला सहकार्य केल्याचंही डॉ. लहाने यांनी आता म्हटलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)