शेतकरी आंदोलन: राकेश टिकैत हे आंदोलनाच्या अजेंड्यापेक्षा वेगळ्या मार्गावर आहेत का?

    • Author, सलमान रवी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की जर सरकारने कृषी कायदे परत घेतले नाहीत तर हे आंदोलन ऑक्टोबरपर्यंत चालेल. शेतकरी आंदोलनाचा चेहरा म्हणून टिकैत हे समोर आले आहेत पण त्याच वेळी इतर शेतकरी संघटना आणि शेतकरी आंदोलनाबाबतची त्यांची भूमिका वेगळी आहे का?

याचा बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रवी यांनी घेतलेला शोध.

तारीख: 29 सप्टेंबर 2013

ठिकाण: सरधाना, मेरठ

आयोजन: 40 गावांची महापंचायत

यावेळी मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीच्या चौकशीचा अहवाल समोर आला. त्यानुसार, 29 सप्टेंबर 2013 रोजी झालेल्या महापंचायतीनंतर 'पश्चिम उत्तर प्रदेशात जातीय सलोखा बिघडला' आणि त्यामुळे पश्चिमेकडील उत्तर प्रदेशातील अनेक गावांमध्ये दंगली झाल्या.

या दंगलीत दोन्ही बाजूच्या अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले. यात भारतीय किसान युनियनच्या नेत्यांचाही समावेश होता.

'गन्ना बेल्ट' या नावाने प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशातील हा भाग काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणचे राजकीय मुद्दे कायम शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांवर आधारित असतात.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पैसे देऊनच या भागात मते मिळवल्याचा आरोप विविध राजकीय पक्ष करत असतात. पण दंगलींनंतर या भागातले राजकारण पूर्णपणे बदलले आणि राजकीय समीकरणात भारतीय जनता पार्टीने जोरदार 'एंट्री' घेतली.

भाजपचे राजकीय वर्चस्व याठिकाणी एवढे वाढले की सर्वाधिक ताकदीचे शेतकरी नेते मानले जाणारे चौधरी अजित सिंह यांनाही अपयशाचा सामना करावा लागला.

दंगलीचा फटका बसलेले शेतकरी नेते गुलाम मोहम्मद जौला हे शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांचे निकटवर्तीय मानले जातात. दंगलीमुळे दुखावलेल्या जौला यांनी भारतीय किसान युनियनपासून फारकत घेत भारतीय किसान कामगार मंच ही नवीन संघटना स्थापन केली.

तारीख: 29 जनवरी 2021

ठिकाण: सिसौली, मुजफ्फरनगर

आयोजन: महापंचायत

आठ वर्षांनंतर पश्चिम उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये होणारी ही सर्वांत मोठी महापंचायत होती. यासाठी हजारो शेतकरी आणि गावकरी जमले होते. महेंद्रसिंह टिकैत यांचे निकटवर्तीय गुलाम मोहम्मद जौलाही व्यासपीठावर उपस्थित होते.

व्यासपीठावर भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत होते. शेतकरी नेते चौधरी अजित सिंह यांचा मुलगा जयंत चौधरी व्यासपीठावर आले आणि गुलाम मोहम्मद जौला यांच्या पायाला स्पर्श करून त्यांनी आशीर्वाद घेतला. नरेश टिकैत यांनीही गुलाम मोहम्मद जौला यांची गळाभेट घेतली.

महपंचायतीसाठी जमलेल्या शेतकरी आणि जाट नेत्यांना संबोधित करताना जौला म्हणतात,"जाटांनी दोन चुका केल्या. एक म्हणजे चौधरी अजित सिंह यांचा पराभव केला आणि दुसरी म्हणजे मुस्लीम बांधवांवर हल्ला केला."

गुलाम मोहम्मद जौला यांच्या या विधानानंतरही महापंचायतीत शांतता कायम होती. कोणीही त्यांच्या या वक्तव्याचा विरोध केला नाही.

भारतीय किसान युनियनच्या काही नेत्यांनी बीबीसीला सांगितले, 'महापंचायतीत सर्वजण मौन बाळगून होते कारण गुलाम मोहम्मद जौला योग्य बोलत आहेत असे सर्व शेतकरी नेत्यांना वाटले.'

बीकेयूचे नेते सांगतात की जौला जे सांगत होते त्याचा पाया 2018 मध्ये जानेवारी महिन्यातच रचला गेला होता. गुलाब मोहम्मद जौला आणि नरेश टिकैत यांनी जाट आणि मुसलमानांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी मोहीम सुरू केली.

जाणकार सांगतात, "पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट आणि शेतकऱ्यांनी समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाला अंतर देत भारतीय जनता पक्षात आपले राजकीय भवितव्य शोधण्यास सुरुवात केली. हे लक्षात घेता टिकैत बंधूंनीही उघडपणे या नव्या राजकारणात स्वत:ला झोकून दिले.

नरेश टिकैत आणि राकेश टिकैत यांच्या बीकेयूतील जवळच्या नेत्यांनी बीबीसीला सांगितले, "2018 मध्ये गुलाम मोहम्मद जौला आणि नरेश टिकैत यांनी 20 सदस्यांची समिती बनवली होती. या समितीतील सदस्यांनी गावोगावी जाऊन मुसलमान आणि जाट शेतकऱ्यांना "जुन्या गोष्टी विसरून पुन्हा एकत्र येण्यासाठी" समजवण्यास सुरुवात केली. असं असलं तरीही दोन्ही पक्षांनी आपल्या राजकीय पक्षाला समर्थन देण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी कोणावरही दबाव आणला नाही."

राकेश टिकैत यांचा व्हिडिओ

ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेमुळे तणाव निर्माण झाला असताना पत्रकारांशी बोलताना राकेश टिकैत भावूक झाले. त्यांचा हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की आंदोलन सोडून गेलेले शेतकरी पुन्हा परतले.

एवढेच नाही तर आंदोलनात नव्याने सहभागी होणारे शेतकरी थेट गाझीपूर सीमेवर पोहचत आहेत. हे लोक कोणत्याही एका जाती किंवा धर्माचे नाहीत.

शेतकरी आणि सामान्य गावकऱ्यांव्यतिरिक्त इतरही राजकीय नेते राकेश टिकैत यांना भेटण्यासाठी गाझीपूर सीमेवर पोहचत आहेत. अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उप मुख्यमंत्री सुखबीर बादल, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू, जयंत चौधरी, दीपेन्द्र सिंह हुड्डा आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांनीही टिकैत यांची भेट घेतली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,अखिलेश यादव, तेजस्वी यादव या नेत्यांनी फोनवरून टिकैत यांना आपले समर्थन जाहीर केले. राकेश टिकैत यांना मिळत असलेले राजकीय समर्थन पाहता टिकैत यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनापेक्षा वेगळा मार्ग अवलंबला आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

गाझीपूर सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या धरणा आंदोलनाचे आयोजक आशिष मित्तल यांना मात्र असे वाटत नाही. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितले, "सुरुवातीला सर्वच राजकीय पक्षांना आम्ही व्यासपीठापासून दूर ठेवले. पण 26 जानेवारीनंतर परिस्थिती बदलली. आंदोलनाचा विस्तार वाढला. यामुळेच राजकीय पक्षाचे नेते आंदोलनस्थळी येऊन समर्थन देत आहेत. आजही राजकीय नेत्यांना व्यासपीठावरुन संबोधित करू दिले जात नाही."

अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे नेते वीजू कृष्णन सांगतात, "26 जानेवारीनंतर गाझीपूर सीमेवर राजकीय नेते येऊ लागले. शेतकरी संघटनांनाही राजकीय पक्षांचे समर्थन आवश्यक आहे आणि त्यांना पाठिंबाही मिळतो आहे."

नवीन प्रस्ताव

नुकत्याच एका न्यूज एजंसीने दिलेल्या बातमीनुसार, 'राकेश टिकैत यांची नवीन मागणी समोर आली आहे. केंद्र सरकारने पुढील 36 महिन्यांपर्यंत तिन्ही कृषी कायदे स्थगित करावे अशी मागणी आता राकेश टिकैत यांनी केली आहे. म्हणजेच या सरकारच्या उर्वरित कार्यकाळापर्यंत.'

राकेश टिकैत यांनी इथेही उर्वरित आंदोलनापेक्षा आपली वेगळी भूमिका मांडली. कारण तिन्ही कृषी कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही ही आंदोलकांची मूळ भूमिका आहे.

हा प्रस्ताव नरेश टिकैत यांच्याकडूनही समोर आला. केंद्र सरकार 18 महिन्यांऐवजी 2024 पर्यंत कृषी कायदे रद्द का करत नाही? अशी भूमिका नरेश टिकैत यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली.

अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव अविक साहा सांगतात, "आतापर्यंत राकेश टिकैत यांच्या भूमिका आंदोलनला नुकसानकारी ठरल्या नाहीत. किंबहुना शेतकरी आंदोलनाचे बळ त्यांच्यामुळे आणखी वाढले आहे. ते आपली भूमिका कायम अशाचपद्धतीने मांडतात आणि म्हणूनच संघटनांना याबाबत कोणताही आक्षेप नाही."

साहा यांनी बीबीसीला सांगितले, "प्रत्येक व्यक्तीची आपली भूमिका असते आणि ती मांडण्यासाठी तो स्वतंत्र असतो. संयुक्त शेतकरी मोर्चा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ येणारी प्रत्येक संघटाना आणि व्यक्तीचे स्वागत करते."

शेतकरी आंदोलनातून बाहेर पडलेले राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष वीएम सिंह यांनी मात्र आंदोलनाचे स्वरूप बदलत असल्याचा आरोप केला आहे. आधी राजकीय कार्यकर्त्यांना व्यासपीठावर जाण्याची परवानगी नव्हती. ते व्यासपीठासमोर खाली बसत होते.

वीएम सिंह सांगतात, "26 जानेवारीनंतर आता सर्व नेते व्यासपीठावर येतात आणि आंदोलनकर्त्यांना संबोधित करतात. वीएम सिंह यांनी टिकैत बंधू सत्ताधारी पक्षासाठी काम करत असल्याचाही आरोप केला आहे."

बीकेयूचे नेते आशिष मित्तल यांनी हा आरोप फेटाळला. ते म्हणाले, "केवळ अभय चौटाला यांनीच व्यासपीठावरून संबोधित केले. इतर सर्व नेत्यांना व्यासपीठावर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांनी व्यासपीठाच्या खाली उभे राहूनच भाषण केले."

टिकरी सीमेच्या ठिकाणी आंदोलनाचे आयोजन करणारे संजय माधव सांगतात, "राकेश टिकैत यांनी 36 महिन्यांसाठी कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली असली तरी ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे. पण आंदोलनासंबंधी कोणताही निर्णय 40 शेतकरी संघटानांच्या प्रतिनिधींच्या एकत्रित मतानेच होणार."

राकेश टिकैत शेतकरी आंदोलनात उशिराने सहभागी झाले पण आज सर्वाधिक चर्चेत तेच आहेत हे वास्तव आहे.

जाणकार सांगतात, 26 जानेवारी रोजी घडलेल्या घटनांमुळे शेतकरी आंदोलनाची प्रतिमा खराब झाली. आंदोलन संपेल असेही चित्र निर्माण झाले. पण राकेश टिकैत यांनी या आंदोलनाला पुन्हा उभे केले. यामुळे त्यांची भूमिका कोणतीही असली तरी शेतकरी नेते याबाबत आक्षेप घेणार नाहीत. राकेश टिकैत आंदोलनात काही काळानंतर आले असले तरी आजच्या घडीला ते आंदोलनाचा चेहरा आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)