शरजील उस्मानीचं वक्तव्य 'आजचा हिंदू समाज सडलेला' #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'आजचा हिंदू समाज सडलेला', एल्गार परिषदेत शरजील उस्मानीचं वक्तव्य

"आजचा हिंदू समाज सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे", असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी यानं केलं आहे. शरजील उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे. ही बातमी 'एबीपी माझा'ने दिली आहे.

पुण्यात शनिवारी झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शरजील उस्मानीने म्हटलं की, "समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलीसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या केली यात सर्वजण दलित होते किंवा मुस्लीम होते. हे लोकं लिंचिंग करतात. हत्या करतात, हत्या करून हे लोकं आपल्या घरी जातात, त्यावेळी हे लोक काय करत असावेत? काही नवीन पद्धतीने हात धूत असावेत किंवा काही औषधं मिसळून स्नान करत असावेत," यावरून आता वादंग उठला आहे.

यावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही विकृत मानसिकता असल्याचं म्हटलं आहे.

2. फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला- डॉ. तात्याराव लहाने

फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला, असा आरोप प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. तसंच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर न्याय मिळाला आणि काम करायला संधी मिळाली असंही ते पुढे म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडीमध्ये (ता. नेवासा) संत वामनभाऊ आणि भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार डॉ. तात्याराव लहाने यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

डॉ. लहाने म्हणाले, "मागील सरकारने मला खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकारमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासनस्तरावर काम करण्याची संधी दिली."

3. 'पत्नीकडे पैशांची मागणी करणे हा छळ नाही' नागपूर खंडपीठाचा निकाल

बायकोकडे पैशाची मागणी केली म्हणजे छळ होत नाही त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 498 (ए)नुसार पतीनं पत्नीचा छळ केला असं मानलं जाऊ शकत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लग्नाच्या नऊ वर्षानंतर पतीला पत्नीने केलेल्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

न्यायालयात सादर झालेला पुरावा पती-पत्नीच्या भांडणाविषयी आहे, ज्यात पती पत्नीला पैशांसाठी मारहाण करत असे. पत्नीकडे पैशांची मागणी करणे ही बाब अस्पष्ट आहे आणि म्हणून भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 498 (ए) अंतर्गत छळ म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, असंही कोर्टाने पुढे म्हटलं.

4. अण्णा हजारे हे अविश्वासू आणि 'मॅनेज' होणारे व्यक्तिमत्व, डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा आरोप

अण्णा हजारे हे अत्यंत अविश्वासू आणि 'मॅनेज' होणारे समाजसेवक आहेत. ते राजकीयदृष्ट्या हास्यास्पद व्यक्तिमत्व ठरले आहेत. त्यांनी २०११ साली केलेल्या आंदोलनामागील बोलवते धनी कोण होते, हे उघड झालं आहे. हजारे म्हणजे महात्मा गांधी नव्हेत, अशी टीका नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. भाजप नेत्यांच्या शिष्ठाई नंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. त्या पार्श्वभूमीवर मुणगेकर यांनी हजारे यांच्यावर निशाणा साधला. मुणगेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अभ्यासासाठी समिती नेमलेली असताना हजारे यांनी उच्चस्तरीय समिती गठित करण्याच्या अटीवर उपोषण मागे घेतलं. ही बाब हास्यास्पद आहे.

5. नोकरी गेल्यामुळे 57 टक्के लोकांनी मुंबई सोडली, अभ्यासातून समोर आली माहिती

कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याचा कुटुंब सर्वेक्षणावर आधारित 'मुंबईत कोविड-19 चा परिणाम - उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरं आणि परिवहन' यांबाबत नागरिकांचा सर्वेक्षण अहवाल प्रजा फाऊंडेशनने तयार केला आहे.

या अहवालात लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांना कसा सामना करावा लागला याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यात लॉकडाऊनच्या काळात मुंबईबाहेर स्थलांतरित झाल्याचं सांगणाऱ्या एकूण 23 टक्के उत्तरदात्यांपैकी 57 टक्के लोकांनी काम गेल्याने मुंबई सोडत असल्याचे सांगितलं आहे. ही बातमी न्यूज18 लोकमतने दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)